घरीच उपचाराच्या अट्टाहासाने झाले 600 रुग्णांचे मृत्यू, मृत्युदर नियंत्रित ठेवण्यात यशस्वी झाल्याचा आयुक्तांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 08:53 AM2021-05-12T08:53:54+5:302021-05-12T09:11:26+5:30

महापालिका हद्दीत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १ लाख २४ हजार ५११ रुग्ण आढळले असून, त्यातील १ लाख १७ हजार १५० जणांनी कोरोनावर मात केली.

600 patients die due to treatment at home in thane | घरीच उपचाराच्या अट्टाहासाने झाले 600 रुग्णांचे मृत्यू, मृत्युदर नियंत्रित ठेवण्यात यशस्वी झाल्याचा आयुक्तांचा दावा

संग्रहित छायाचित्र

googlenewsNext

ठाणे : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत काही रुग्णांनी घरीच उपचार घेण्याला प्राधान्य दिले व त्रास वाढल्यावर रुग्णालयात धाव घेतली. परिणामी ३५ टक्के मृत्यू हे उशिराने रुग्णालयात रुग्ण दाखल केल्याने झाल्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी केला. रुग्ण वेळेत दाखल झाले असते तर ६०० रुग्णांचे प्राण वाचवता आले असते, असे ते म्हणाले. त्यामुळे ज्यांना लक्षणे दिसत असतील अशा रुग्णांनी तात्काळ रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आयुक्त शर्मा यांनी हा दावा केला असला तरी ठाण्यात आतापर्यंत खासगी रुग्णालये व महापालिका कोविड सेंटरमध्ये बेड मिळत नव्हते, हे वास्तव दृष्टीआड करता येत नाही.

महापालिका हद्दीत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १ लाख २४ हजार ५११ रुग्ण आढळले असून, त्यातील १ लाख १७ हजार १५० जणांनी कोरोनावर मात केली. याच कालावधीत १ हजार ७७६ जणांचा मृत्यू झाला. यातील अनेक जण व्याधीग्रस्त असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. कोरोनामध्येच हृदयविकाराने अनेक मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण ६० टक्के आहे. ४० टक्के मृत्यू ६० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील नागरिकांचे आहेत.  त्यातील काहींना मधुमेह, दमा, रक्तदाब याचा त्रास होता. पालिकेने एकही मृत्यू लपवला नसल्याचा दावाही शर्मा यांनी केला. खाजगी रुग्णालयांकडून मृतांची संख्या मिळण्यास विलंब लागत असल्याने काही वेळा संख्या अचानक वाढल्यासारखे वाटते. काही रुग्णांनी घरात पाच ते सात दिवस उपचार घेतल्यानंतर आजार बळावल्यावर ते दाखल झाले. त्यांना व्हेंटिलेटर लावावा लागतो. अशा रुग्णाला वाचवणे फार कठीण होते, असे शर्मा म्हणाले.

मृत्युदर १.४ टक्के
ठाण्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाचे रुग्ण चारपटीने वाढूनही मृत्यूदर १.४ टक्के म्हणजे नियंत्रित असल्याचा दावा आयुक्तांनी केला. पहिल्या लाटेत रुग्णांचे प्रमाण जास्त नव्हते. पहिल्या लाटेत मागील जुलै महिन्यात २५७ जणांचे मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्याचा विचार केल्यास हे प्रमाण २९३ एवढे होते.  त्यामुळे रुग्णसंख्या चारपटीने वाढूनही ठाणे महापालिका मृत्यूदर स्थिर ठेवण्यात यशस्वी झाल्याचा दावा शर्मा यांनी केला.

तरुणांमध्ये हॅप्पी हायपोक्सिया अधिक
तरुणांना आपण घरी उपचार घेऊन कोरोनाला हरवू शकतो, असा अतिआत्मविश्वास असल्याने त्यांना हॅप्पी हायपोक्सियाचा अधिक धोका असतो. तरुणांना कोरोनाची लागण झाल्यानंतरही त्यांची ऑक्सिजन पातळी ही ९८ पर्यंत असते; परंतु ती हळूहळू खाली येते. इथेच धोक्याची घंटा वाजते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यास अचानक ऑक्सिजन पातळी ७५ च्या खाली जाते आणि अशा रुग्णांना मग रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना वाचविणे कठीण होते, त्यामुळेच मृतांमध्ये तरुणांची संख्या वाढताना दिसून येत आहे.
 

Web Title: 600 patients die due to treatment at home in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.