500 liters of water in rural areas in three and a half times | ग्रामीण भागात ५०० लीटर पाणी साडेतीनशे रुपयांत
ग्रामीण भागात ५०० लीटर पाणी साडेतीनशे रुपयांत

- सुरेश लोखंडे

ठाणे : तलावांचा जिल्हा असूनही पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. पाण्याची गरज भागवण्यासाठी जिल्ह्यातील गावपाडे पाण्याच्या शोधात हिंडत आहेत. यापैकी शहापूर व मुरबाड तालुक्यांमधील ८४ हजार १३३ ग्रामस्थ पाणीटंचाईने त्रस्त आहेत. त्यांना ३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचा दावा होत आहे. मात्र भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यांतील शेकडो गावपाडे टंचाईला तोंड देत आहेत. त्यांची प्रशासनाने अजूनही दखल घेतलेली नाही. यामुळे तेथे अद्यापही टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याचे आढळून आले. यामुळे तेथील जनतेवर साडेतीनशे रुपयांत ५०० लीटर पाणी विकत घेण्याची पाळी आली आहे.
जिल्ह्यातील पाचही तालुक्यांच्या ग्रामीण, दुर्गम भागांत जीवघेण्या पाणीटंचाईला ग्रामस्थ तोंड देत आहेत. यापैकी केवळ शहापूर आणि मुरबाड तालुक्यांमधील पाणीटंचाईवर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. उर्वरित भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यांमधील टंचाईग्रस्त गावपाड्यांमधील टंचाईवर मात करण्यासाठी अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याची गंभीर बाब निदर्शनात आली आहे. या तीन तालुक्यांच्या पाणीसमस्येकडे राजकीय नेत्यांसह प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळेच मे महिन्यातही तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. याचा गैरफायदा घेऊन जिल्ह्यात ठिकठिकाणी पाण्याची विक्री होतानाही दिसून येत आहे.
मुरबाड व शहापूर या दोन तालुक्यांमधील ८४ हजार १३३ ग्रामस्थांना तीव्र पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. ६६ गावे आणि १६९ आदिवासीपाड्यांमधील रहिवासी या समस्येला तोंड देत आहे. या तालुक्यांमध्ये गेल्या वर्षी ३४ गावे आणि १०८ पाड्यांमध्ये टंचाई होती. त्यांना २५ टँकरने पाणीपुरवठा झाला होता. यंदा २३५ गावपाड्यांना ३६ टँकर पाणीपुरवठा करत आहेत. प्रशासनाच्या नियोजनानुसार पाऊस पडेपर्यंत ३० टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते. मात्र, या नियोजनापेक्षा सहा टँकरची वाढ करून ३६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तरीदेखील ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे त्यांना १०० रुपये प्रतिदराने बॅरलभर पाणी विकत घ्यावे लागत आहे. काही मोठ्या कुटुंबीयांना ४५०-५०० लीटरच्या पाण्याच्या ड्रमसाठी ३०० ते ३५० रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत असल्याचे वास्तव आहे.

मुरबाडमध्ये पाणीविक्री जोमात
मुरबाड तालुक्यामधील १९ हजार ७९४ ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाई आहे. त्यांना सात टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरू आहे. १८ गावे आणि ३८ पाडे या तीव्र टंचाईमुळे त्रस्त आहेत. गेल्या वर्षी केवळ पाच गावे आणि १० पाडे पाणीसमस्येने बाधित होते.
या तालुक्यांमधील गावखेड्यांतदेखील ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे एका ज्येष्ठ नागरिकाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. खोपिवली येथील ग्रामस्थ ५० ते १०० रुपयांत एक बॅरल पाणी विकत घेत आहेत.
याप्रमाणेच बेरी, तळेखळ येथील ग्रामस्थदेखील ७० रुपयांमध्ये एक बॅरल पाणी विकले जात आहे. ४५०-५०० लीटरच्या ड्रमसाठी ३०० ते ३५० रुपये मोजावे लागत असल्याचे ग्रामस्थांकडून निदर्शनात आणून दिले जात आहे. स्थानिक बैलगाडीवाल्याकडून या पाण्याचा पुरवठा करून त्या बदल्यातील मोबदला म्हणून ग्रामस्थांना पैसे मोजावे लागत असल्याचे वास्तव निदर्शनात आणून देण्यात आले आहे.

६४ हजार ग्रामस्थांना तीव्र टंचाई
जिल्हा प्रशासनाकडे शहापूर तालुक्यातील ४८ गावे आणि १३१ पाडे टंचाईग्रस्त असल्याची नोंद आहे. यातील ६४ हजार ३३९ ग्रामस्थ या जीवघेण्या टंचाईमुळे त्रस्त आहेत. मात्र, सुरू झालेल्या या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे.
मागील वर्षी या दिवसापर्यंत २२ टँकरने पाणीपुरवठा झाला होता. यंदा उन्हाच्या दाहकतेमुळे टँकरने होत असलेला पाणीपुरवठा कमी पडत आहे. यामुळे काही ठिकाणी ग्रामस्थ बैलगाडीवाल्याकडून पाणी विकत घेत आहेत. त्या बदल्यात २० ते ३० रुपये बॅरलसाठी मोजावे लागत असल्याचे जांभूळवाड येथील रमेश सोगीर यांनी लोकमतच्या निदर्शनात आणून दिले आहे.


Web Title: 500 liters of water in rural areas in three and a half times
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.