28 out of 148 swine flu patients in the district | जिल्ह्यातील १४८ स्वाइन फ्लू रुग्णांपैकी २८ जण रुग्णालयात
जिल्ह्यातील १४८ स्वाइन फ्लू रुग्णांपैकी २८ जण रुग्णालयात

ठाणे : जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून आतापर्यंत आढळलेल्या १४८ पैकी २८ जण अद्यापही उपचारार्थ रुग्णालयात दाखल आहेत. तर, एका महिलेसह पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

ठाणे जिल्ह्यात १ जानेवारी ते २२ एप्रिलदरम्यान स्वाइन फ्लू या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांचा आकडा १४८ वर पोहोचला आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाप्रमाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या रुग्णालयातही स्वाइन फ्लूच्या विशेष वॉर्डची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण १० वॉर्ड कार्यान्वित आहेत. तेथे १ जानेवारी ते २२ एप्रिलदरम्यान ३९ हजार १०४ जणांमध्ये फ्लूची संशयास्पद लक्षणे दिसल्याने त्यांची तपासणी केली आहे. त्यामध्ये १५५ संशयित रुग्ण पुढे आले आहेत. त्यापैकी १४८ जणांना स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीत ७८ कल्याण-२४ आणि नवी मुंबई १६ तसेच मीरा-भार्इंदर येथे २८ तर जिल्हा रुग्णालयात दोन रुग्णांचा समावेश आहे. तसेच उल्हासनगर तसेच भिवंडीत अद्याप एकही रुग्ण समावेश नसल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयात एक जण उपचारार्थ दाखल आहे. तसेच ठामपाच्या हद्दीत ६, कल्याण-१५, नवी मुंबई-२ आणि मीरा-भार्इंदर येथे चार रुग्णांवर उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कालावधीत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झालेले १४८ पैकी ११४ जण आतापर्यंत उपचार घेऊन घरी परतले आहे. त्यामध्ये ठामपा हद्दीतील ७१, कल्याण-६, नवी मुंबई-१३, तर मीरा-भार्इंदर येथील २४ रुग्णांचा समावेश आहे.

तपासणी करण्यात नवी मुंबईकर आघाडीवर
जिल्ह्यात १२७ स्क्रिनिंग सेंटर असून संशयास्पद फ्लूची लक्षणे असल्याचे समोर आल्यावर जवळपास ३९ हजार १०४ जणांची तपासणी केली. त्यापैकी २८ हजार ३७९ नवी मुंबईकरांनी तपासणी करून आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयात तीन हजार ८९०, त्यातच एकही रुग्ण न आढळलेल्या उल्हासनगर येथे तीन हजार ३२४, ठामपा-१ हजार ८३१, मीरा-भार्इंदर एक हजार १६७, भिवंडीत २९७ आणि केडीएमसी येथे १९५ जणांनी तपासणी केल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.


Web Title: 28 out of 148 swine flu patients in the district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.