ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेना, हालेप यांची तिसऱ्या फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:44 AM2019-01-18T06:44:45+5:302019-01-18T06:44:54+5:30

राओनिच याने दिला स्टॅन वावरिंकाला पराभवाचा धक्का

Serena and Halep in third round of the Australian Open | ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेना, हालेप यांची तिसऱ्या फेरीत धडक

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेना, हालेप यांची तिसऱ्या फेरीत धडक

Next

मेलबर्न : सेरेना विलियम्सने विक्रमी २४ वे ग्रँडस्लॅमच्या दिशेने पाऊल टाकताना युजीनी बूचार्ड हिचा पराभव करताना आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठली. पुरुषांमध्ये अव्वल खेळाडू नोव्हाक जोकिविच यानेही सरळ तीन सेटमध्ये बाजी मारत सहज विजयी आगेकूच केली.


अमेरिकेची दिग्गज सेरेना हिने कॅनडाच्या बूचार्ड हिचा ७० मिनिटांत ६-२, ६-२ असा लीलया पराभव केला. सेरेनाला मार्गारेट कोर्टच्या २४ व्या ग्रँडस्लॅमच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून एका विजेतेपदाची गरज आहे. ती आॅस्ट्रेलियन ओपन जिंकली तर मेलबर्न पार्कवर तिचे हे आठवे विजेतेपद ठरेल. तिने २०१७ मध्ये गर्भवती असताना या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.


जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित हालेपने अमेरिकेच्या सोफिया केनिन हिचा ६-३, ६-७, ६-४ पराभव केला. ही लढत करण्यासाठी तिला खूपच परिश्रम घ्यावे लागले. आता तिचा सामना व्हिनस विलियम्सशी होईल. व्हिनसने फ्रान्सच्या एलिज कोर्नेटला नमवले.
चौथ्या मानांकित जपानच्या नाओमी ओसाकाने स्लोव्होनियाच्या तमारा जिदानसेकचा ६-२, ६-४ असा पराभव केला. पावसामुळे बंद छताखाली ही लढत झाली. आता ओसाका तैवानच्या सियेह सू वेईबिरुद्ध खेळेल.


पुरुष गटात अव्वल मानांकीत नोवाक जोकोविचने अपेक्षित आगेकूच करताना फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगाविरुद्ध ६-३, ७-५, ६-४ असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला. २००८ साली याच स्पर्धेत हे दोघेही अंतिम फेरीत खेळले होते. त्यावेळीही जोकोविचनेच बाजी मारली होती. पुढील फेरीत जोकोविच कॅनडाच्या २५व्या मानांकीत डेनिस शापोवालोवविरुद्ध खेळेल. (वृत्तसंस्था)

पुरुषांमध्ये कॅनडाच्या १६व्या मानांकीत मिलोस राओनिचने २०१४ चा चॅम्पियन स्टॅन वावरिंकाला चुरशीच्या लढतीत नमविले. ५ सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत राओनिच याने वावरिंकावर ७-६, ६-७, ६-७, ७-६, ७-६ अशी मात केली. आता राओनिच याचा सामना फ्रान्सच्या पियरे हुगुएस हर्बर्ट याच्याशी होईल. जपानच्या केई निशिकोरी रोमांचक सामन्यात क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याचा ६-३, ७-६, ५-७, ५-७, ७-६ असा पराभव केला.

Web Title: Serena and Halep in third round of the Australian Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.