Rafael Nadal, Roger Federer's Winning Coach | राफेल नदाल, रॉजर फेडरर यांची विजयी कूच
राफेल नदाल, रॉजर फेडरर यांची विजयी कूच

इंडियन वेल्स (अमेरिका) : जागतिक क्रमवारीतील द्वितीय क्रमांकाचा टेनिसपटू राफेल नदाल याने एटीपी इंडियन वेल्स मास्टर्सच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. त्याचप्रमाणे स्वित्झर्लंडच्या दिग्गज रॉजर फेडररनेदेखील विक्रमी सहाव्या विजेतेपदाकडे यशस्वीपणे वाटचाल सुरू केली आहे. इंडियन वेल्समध्ये तीन वेळेसच्या विजेत्या नदालने रविवारी अवघ्या ७२ मिनिटांत जेयर्ड डोनाल्डसन याचा ६-१, ६-१ असा पराभव केला. तो पुढील फेरीत अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्ट्जमनशी लढेल. श्वार्ट्जमन याने स्पेनच्या रॉबर्टो कारबरेल्सवर ६-३, ६-१ अशा सेटने मात केली. फेडररने जर्मनीच्या पीटर गोजोविकविरुद्ध ६-३, ७-५ अशा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. दुसऱ्या फेरीच्या लढतीत गोजोविकने फेडररला कडवी झुंज दिली.

फेडररचा पुढील फेरीतील सामना स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंका व हंगेरीचा २९ व्या मानांकित मार्टन फुकोविच यांच्यातील विजयीविरुद्ध होईल. अन्य लढतीत जपानच्या केई निशिकोरी याने फ्रान्सच्या एड्रियन मनारिनो याचा संघर्षपूर्ण लढतीत ६-४, ४-६, ७-६ असा पराभव केला. सामना बरोबरीत आल्यानंतर अंतिम सेटमध्ये निशिकोरीने टायब्रेकमध्ये बाजी मारली. पोलंडच्या हर्बर्ट हुरकाज याने फ्रान्सच्या लुकास पाउली याच्यावर ६-२, ३-६, ६-४ अशी मात केली. पुढील फेरीत निशिकोरी व हर्बर्ट आमने-सामने असतील. (वृत्तसंस्था)


Web Title: Rafael Nadal, Roger Federer's Winning Coach
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.