Australian Open: Djokovic-Nadal, expecting a colorful match | ऑस्ट्रेलियन ओपन: जोकोविच-नदाल जेतेपदासाठी भिडणार; रंगतदार लढतीची अपेक्षा
ऑस्ट्रेलियन ओपन: जोकोविच-नदाल जेतेपदासाठी भिडणार; रंगतदार लढतीची अपेक्षा

मेलबोर्न : नोव्हाक जोकोविच व राफेल नदाल यांच्यादरम्यान आज रविवारी १०७ व्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. या लढतीच्या निमित्ताने आधुनिक युगातील अतुलनीय प्रतिस्पर्धा अनुभवायला मिळणार आहे.
टेनिस जगतात या दोन अव्वल खेळाडूंच्या नावावर एकूण ३१ ग्रँडस्लॅम विजेतेपदाची नोंद आहे. हे दोन्ही खेळाडू आज आपल्या जेतेपदाच्या संख्येमध्ये भर घालण्यास इच्छुक आहेत.

जोकोविचने जर जेतेपद पटकावले तर ते त्याचे या स्पर्धेतील विक्रमी सातवे जेतेपद ठरेल तर ३२ वर्षीय नदालने २००९ नंतर येथे पुन्हा विजेतेपदाचा मान मिळवला तर ओपन युगात तो चार ग्रँडस्लॅम किमान दोनदा जिंकणारा पहिला खेळाडू ठरेल. नदालचे हे १८ वे ग्रँडस्लॅम जेतेपद राहील.

तो सार्वकालिक सर्वाधिक ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या रॉजर फेडररच्या (२० जेतेपद) समीप जाईल. जोकोविचने जेतेपद पटकावले तर तो १५ व्या विजेतेपदासह पीट सॅम्प्रासचा विक्रम मोडेल आणि सर्वाधिक ग्रँडस्लॅम पटकावणाºया खेळाडूंच्या यादीत तिसºया स्थानी येईल.
जोकोविच व नदाल यांच्यादरम्यान ही ५३ वी लढत आहे तर उभय खेळाडू आठव्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत झुंजणार आहेत. उभय खेळाडूंदरम्यान आतापर्यंत खेळल्या गेलेल्या लढतीत जोकोविचने २७ वेळा बाजी मारली आहे तर नदालने २५ सामने जिंकले आहेत. ग्रँडस्लॅम फायनलमध्ये मात्र नदालचे पारडे वरचढ आहे. त्याने चारवेळा जेतेपद पटकावले तर तीनवेळा जोकोविचविरुद्ध त्याला पराभव स्वीकारावा लागला. नदाल जोकोविचविरुद्ध गेल्या तीन ग्रँडस्लॅम फायनलमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
ग्रँडस्लॅममध्ये सर्व प्रकारच्या लढतींमध्ये नदालने जोकोविचविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. नदालने नऊ सामने जिंकले आहे तर पाच सामन्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला आहे. या दोघांचा अपवाद वगळता ओपन युगामध्ये कधीच उभय खेळाडूंदरम्यान एवढ्या लढती झालेल्या नाहीत आणि कधीच एवढ्या रंगतदार लढती झालेल्या नाहीत.

उभय खेळाडूंदरम्यान आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये २०१२ ला खेळल्या गेलेली अंतिम लढत विक्रमी ५ तास ५३ मिनिट रंगली होती. ग्रँडस्लॅम इतिहासातील ही सर्वांत प्रदीर्घ काळ रंगलेली अंतिम लढत होती. काहींच्या मते हा सर्वांत शानदार अंतिम सामना होता.
जोकोविचने अंतिम सेटमध्ये ७-५ ने सरशी साधत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते, पण यानंतर दोन्ही खेळाडू एवढे थकले होते की, पुरस्कार वितरण समारंभादरम्यान त्यांना उभे राहणे कठीण जात होते. (वृत्तसंस्था)


Web Title: Australian Open: Djokovic-Nadal, expecting a colorful match
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.