एटीपी क्रमवारी : नोव्हाक जोकोविच पुन्हा अव्वल स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 04:41 AM2018-11-08T04:41:48+5:302018-11-08T04:42:12+5:30

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने दुखापतीतून सावरल्यानंतर, जबरदस्त पुनरागमन करताना पुन्हा एकदा इतिहास रचला. जोकोविचने जबरदस्त कामगिरी करताना, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले.

ATP Rankings: Novak Djokovic tops again | एटीपी क्रमवारी : नोव्हाक जोकोविच पुन्हा अव्वल स्थानी

एटीपी क्रमवारी : नोव्हाक जोकोविच पुन्हा अव्वल स्थानी

googlenewsNext

पॅरिस - सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने दुखापतीतून सावरल्यानंतर, जबरदस्त पुनरागमन करताना पुन्हा एकदा इतिहास रचला. जोकोविचने जबरदस्त कामगिरी करताना, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले.
नुकत्याच जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत स्पेनच्या दिग्गज राफेल नदालला मागे टाकत, जोकोविचने पहिल्या स्थानावर कब्जा केला. नुकत्याच झालेल्या पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत, जोकोविचने क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली होती. दुर्दैवाने या स्पर्धेत त्याला रशियाच्या कैरन खाचानोवविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागल्याने, उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
१४ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलेल्या जोकोविचने २ वर्षांनी अव्वल स्थान पटकावताना नदालची मक्तेदारी संपुष्टात आणली. त्याच वेळी स्वित्झर्लंडचा टेनिस सम्राट रॉजर फेडररने आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे, गेल्या १४ वर्षांतील एटीपी क्रमवारीवर नजर टाकल्यास, अव्वल स्थान जोकोविच, नदाल, फेडरर आणि मरे या ‘बिग फोर’ खेळाडूंकडेच राहिल्याचे दिसून येईल. त्याचप्रमाणे, २०१५ नंतर पहिल्यांदाच जोकोविच जागतिक अव्वल स्थानासह मोसमाची सांगता करण्यास सज्ज झाला आहे. यंदा त्याने दुखापतीतून सावरल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत आपला हिसका दाखविला. (वृत्तसंस्था)

तिन्ही दिग्गज अव्वल

यंदाच्या सत्राच्या सुरुवातीस फेडररने ८ आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी कब्जा केला. यानंतर, नदाल आणि जोकोविचने हे स्थान मिळविले.
दखल घेण्याची बाब म्हणजे, पहिल्यांदाच जागतिक टेनिसमधील तिन्ही दिग्गज एकाच मोसमात
अव्वल स्थानी राहिले आहेत.

तिसऱ्या स्थानी असलेल्या फेडररनंतर अर्जेंटिनाचा जुआन मार्टिन डेल पोत्रो चौथ्या स्थानी असून, यानंतर जर्मनीचा अलेक्झांडर झेवेरेव (पाचवा), दक्षिण आफ्रिकेचा केविन अँडरसन (सहावा), क्रोएशियाचा मारिन सिलिच (सातवा), आॅस्ट्रियाचा डॉमनिक थिएम (आठवा) आणि जपानचा केई निशिकोरी (नववा) यांचा क्रमांक आहे. दहाव्या स्थानी अमेरिकेचा जॉन इस्नर आहे.
राफेल नदालने गुडघादुखीमुळे एटीपी फायनलमधून माघार घेतल्याने जोकोविचला आपले अव्वल स्थान भक्कम करण्याची नामी संधी आहे.

Web Title: ATP Rankings: Novak Djokovic tops again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.