ठळक मुद्देया आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे.

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न हा कार्यक्रम दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

या आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या कित्येक आठवड्यापासून या रिपोर्टमध्ये माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर आहे. 

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका यंदाच्या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे मुख्य भूमिका साकारत आहेत.

चौथ्या क्रमांकावर राणा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका आहे. या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरची मुख्य भूमिका आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. पण गेल्या दोन आठवड्यापासून या मालिकेच्या टीआरपीत काहीसा फरक पडलेला आहे. कारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असलेली ही मालिका थेट चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. 

पाचव्या क्रमांकावर सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची तुला पाहते रे ही मालिका आहे. या मालिकेतील गायत्री दातार, शिल्पा तुळसकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. इतके दिवस ईशा निमकरला पडलेले स्वप्न खरे आहे की खोटे, याचा उलगडा होत असताना आता ईशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सिद्ध झाल्यामुळे मालिकेला चांगलेच वळण मिळाले आहे. 

विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत. 


Web Title: Zee marathi's Mazya Navryachi Bayko is on no 1 this week as per barc india report
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.