Yeh Hai Mohabbatein's Neeru Agarwal passes away, Divyanka Tripathi mourns her sudden demise | ये है मोहोब्बते या मालिकेच्या टीममधील या सदस्याचे झाले निधन
ये है मोहोब्बते या मालिकेच्या टीममधील या सदस्याचे झाले निधन

ये है मोहोब्बते या मालिकेला आज अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेतील एका सदस्याचे नुकतेच निधन झाले आहे. या मालिकेत रोमीची भूमिका साकारणाऱ्या एली गोलीने सोशल मीडियाद्वारे ही दुःखद बातमी दिली आहे. 

ये है मोहोब्बते या मालिकेत नीलूची भूमिका साकारणाऱ्या नीरू अग्रवालचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या चार-पाच दिवसांपासून तिला ताप होता. त्याच्यावर उपचार सुरू असले तरी काही केल्या तिचा ताप उतरत नव्हता. तिचा ताप प्रचंड वाढल्याने ती घरीच बेशुद्ध पडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. नीरूच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आणि पती आहेत. 

ये है मोहोब्बते या मालिकेचा नीलू गेल्या कित्येक महिन्यांपासून भाग आहे. आपल्या या सहकलाकाराच्या निधनाने या मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला आहे. या मालिकेत इशिताची भूमिका साकारणाऱ्या दिव्यांका त्रिपाठीने आपल्या या मैत्रिणीच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, नीलू तू अचानक आमच्यातून निघून गेलीस. आज मला आपल्यात शेवटचे झालेले संभाषण चांगलेच आठवत आहे. तुला सोन्याचे दागिने खूप आवडतात. यावरूनच आपल्यात चर्चा झाली होती. तसेच तुझ्या मुलांबद्दल आपण बोललो होतो, तुझा एक मुलगा बॉक्सर आहे. तुझ्या मुलांबद्दल असलेला गर्व तुझ्या बोलण्यातून मला जाणवत होता. तुला तुझ्या मुलीसोबत आणखी वेळ घालवायला मिळायला पाहिजे होता. तू माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहेस, हे मला तुला सांगायला हवे होते. तू जिथे आहेस, तिथे खूश राहा... तू नेहमीच माझ्या स्मरणात राहशील...

नीरू अग्रवालने ये है मोहोब्बते या मालिकेत इशिता आणि रमण यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. 


Web Title: Yeh Hai Mohabbatein's Neeru Agarwal passes away, Divyanka Tripathi mourns her sudden demise
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.