छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा शिवा काशिदच्या भूमिकेत दिसणार विशाल निकम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 12:19 PM2021-07-16T12:19:12+5:302021-07-16T12:19:51+5:30

शिवा काशिद हे स्वराज्याच्या इतिहासातलं महत्त्वाचे पान. शिवरायांचा हा जिगरबाज मावळा हुबेहुब शिवरायांसारखा दिसायचा असे म्हटले जाते.

Vishal Nikam will be seen in the role of Chhatrapati Shivaji Maharaj's Jigarbaaz Mawla Shiva Kashid | छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा शिवा काशिदच्या भूमिकेत दिसणार विशाल निकम

छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा शिवा काशिदच्या भूमिकेत दिसणार विशाल निकम

googlenewsNext

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका लवकरच स्टार प्रवाहवर भेटीला येत आहे.


छत्रपती शिवरायांची भूमिका भूषण प्रधान, बाजीप्रभू देशपांडेंच्या रुपात अजिंक्य देव आणि नेताजी पालकरांची भूमिका कश्यप परुळेकर साकारणार असून अभिनेता विशाल निकम शिवा काशिद यांची भूमिका साकारणार आहे. शिवा काशिद हे स्वराज्याच्या इतिहासातलं महत्त्वाचे पान. शिवरायांचा हा जिगरबाज मावळा हुबेहुब शिवरायांसारखा दिसायचा असे म्हटले जाते. महाराजांची पन्हाळ गडावरुन सुटका करण्यासाठी शिवा काशिद यांनी छत्रपती शिवरायांचे सोंग घेऊन आपल्या राजाचा जीव वाचवला होता. याच जिगरबाज शिवा काशिद यांच्या शौर्याची गाथा साकारण्यासाठी अभिनेता विशाल निकम सज्ज झाला आहे.

जय भवानी जय शिवाजी मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना अभिनेता विशाल निकम म्हणाला, ‘स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीसाठी मी खूपच आभारी आहे. याआधी स्टार प्रवाहच्या साता जल्माच्या गाठी आणि दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. आता जय भवानी जय शिवाजी मध्ये शिवा काशिद साकारण्याची जबाबदारी आहे. स्वराज्य हे एकच स्वप्न उराशी बाळगून हजारो मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. याच लढवय्या मावळ्यांची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. इतिहास जिवंत होतोय असे म्हटले तरी चालेल. शिवा काशिद यांच्या शौर्याविषयी आपण ऐकले आहे. जय भवानी जय शिवाजी मालिकेच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मी या नव्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. अशी भावना विशाल निकम याने व्यक्त केली.’


स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची आहे. २६ जुलैपासून रात्री १० वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट भेटीला येणार आहे. 

Web Title: Vishal Nikam will be seen in the role of Chhatrapati Shivaji Maharaj's Jigarbaaz Mawla Shiva Kashid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.