ठळक मुद्देडॉ.अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी अश्विनी याही डॉक्टर असून वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांना दोन मुले असून आद्या आणि रुद्र अशी त्यांची नावे आहेत. आद्याने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत काम देखील केले होते.

लोकसभा निवडणुकीचे काल निकाल हाती आले असून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. अमोल कोल्हे यांनी विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा ५८,४८३ मतांनी पराभव करत शिरूरचा गड जिंकला. एक अभिनेता ते यशस्वी राजकारणी हा प्रवास अमोल कोल्हे यांच्यासाठी सोपा नव्हता. पण त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आज यश मिळवले आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या इतकाच त्यांच्या पत्नीचा देखील वाटा आहे. 

डॉ.अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी अश्विनी याही डॉक्टर असून वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांना दोन मुले असून आद्या आणि रुद्र अशी त्यांची नावे आहेत. आद्याने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत काम देखील केले होते. अमोल यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांच्या पत्नीचे आणि मुलांचे फोटो पाहायला मिळतात. त्यांच्या पत्नी खंबीरपणे कायम त्यांच्या पाठिशी उभ्या राहातात. काही वर्षांपूर्वी अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक संदेश इन्स्टाग्राम पोस्ट केला होता. या पोस्टद्वारे अमोल कोल्हे यांच्या यशात त्या देखील भागीदार असल्याचे लगेचच लक्षात येते. 

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, माझी पत्नी हा माझा बोलका आरसा... माझ्या प्रसिद्धीच्या वलयाने झळाळत नाही की अपयशाने झाकोळत नाही... जे आहे ते आहे आणि नाही ते नाही... असे ठामपणे सांगणारा... माझे घरटे सांभाळून मला भरारीची उमेद देणारा... प्रत्येक धाडसी निर्णयात लढ मी आहे हा विश्वास देणारा... हरलो तर कवेत घेणारा आणि जिंकलो तर अभिमानाने माझ्याचकडे पाहाणारा... स्वतःला पारखण्याची संधी देणारा... आणि माझ्यात मिसळूनही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपणारा... तू आहेस म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे... तुला वजा केलं तर सारं जगणं व्यर्थ आहे. 

झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे संभाजीराजांच्या भूमिकेतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला 'राजा शिव छत्रपती' या स्टार प्रवाहवरील मालिकेत काम केले होते. त्यांना या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आजवर अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 


Web Title: swarajya rakshak sambhaji fame Dr Amol Kolhe real life wife pictures
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.