ठळक मुद्देनच बलियेचा यंदाचा कॉन्सेप्ट पूर्णपणे वेगळा असून आता पूर्व प्रेयसी आणि पूर्व प्रियकर या कार्यक्रमात येऊन डान्स परफॉर्मन्स देणार आहेत. त्यामुळेच नच बलिये एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

नच बलिये हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड आवडता असून या कार्यक्रमाचा प्रत्येक सिझन हिट गेला आहे. या कार्यक्रमाचा पुढचा सिझन कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमात एक मोठा बदल होणार असल्याचे या कार्यक्रमाच्या निर्मात्याने सांगितले आहे.

नच बलिये या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनचा निर्माता दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आहे. या कार्यक्रमात नेहमीच आपल्याला खऱ्या आयुष्यातील जोडपी विविध गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करताना दिसतात. पण यंदाच्या सिझनमध्ये पती-पत्नी, प्रेयसी-प्रियकर यांसारख्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाहीत तर पूर्वप्रियकर-पूर्वप्रेयसी या कार्यक्रमात झळकणार असून ही गोष्ट सलमानने एका मुलाखतीत सांगितली आहे.

मुंबई मिररशी बोलताना सलमानने सांगितले की, नच बलियेचा यंदाचा कॉन्सेप्ट पूर्णपणे वेगळा असून आता पूर्व प्रेयसी आणि पूर्व प्रियकर या कार्यक्रमात येऊन डान्स परफॉर्मन्स देणार आहेत. त्यामुळेच नच बलिये एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

नच बलिये या कार्यक्रमाचा नवा सिझन जुलै महिन्यात सुरू होणार असल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे. सलमानने स्वतः या कार्यक्रमाच्या कॉन्सेप्टवर काम केले आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार याची त्याला खात्री आहे. नच बलियेच्या गेल्या सिझनचे विजेतेपद दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांना मिळाले होते. त्यामुळे आता या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रेटी हजेरी लावणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 

सलमान खान सध्या छोट्या पडद्यावर प्रचंड रस दाखवत आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा सलमान निर्माता आहे. तसेच गामा पेहलवान यांच्या आयुष्यावरील एका मालिकेची देखील तो निर्मिती करणार आहे. तसेच पोलिसांच्या आयुष्यावर आधारित त्याची एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत मुकुल देव आणि पूजा गौर यांच्या मुख्य भूमिका आहेत.


Web Title: Salman Khan CONFIRMS getting ex couples together for Nach Baliye 9; says this year is all about entertainment
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.