महाराष्ट्राची हास्य जत्राचा विजेता ठरणार या दिवशी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 07:15 AM2018-12-27T07:15:00+5:302018-12-27T07:15:01+5:30

‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’च्या टीमला आणि मनोरंजनाच्या एका तासाला निरोप देण्याची वेळ आली असली तरी या हास्यजत्रेचं दुसरं पर्व देखील लवकरच येणार आहे.

maharashtrachi hasya jatra winner will be declared soon | महाराष्ट्राची हास्य जत्राचा विजेता ठरणार या दिवशी...

महाराष्ट्राची हास्य जत्राचा विजेता ठरणार या दिवशी...

googlenewsNext
ठळक मुद्दे या पर्वातील विजेत्या जोडीला दुसऱ्या पर्वात डायरेक्ट संधी मिळणार असून त्यातील बाकी कलाकार मात्र गुलदस्त्यात आहे. 

महाराष्ट्राला पोटधरुन हसवणाऱ्या सोनी मराठी वरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ आणि त्यामधील विनोद अतिशय चलाखीने सादर करणारे कलाकार यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. आपले स्ट्रेस विसरुन भन्नाट मनोरंजन करवून घेण्यासाठी प्रेक्षक आठवड्यातील दोन दिवस हक्काने या कार्यक्रमाला देतात. बुधवार आणि गुरुवार म्हटलं की, एक तास हा मनोरंजनाचा ठरलेला असायचाच...

काही महिन्यांअगोदर सुरू झालेल्या या हास्य जत्रेचा फिनॅले येत्या २६ आणि २७ डिसेंबरला रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी केलेल्या कलाकारांची निवड ही अचूक होती. कारण या कलाकारांनी प्रत्येकवेळी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे, त्यांना हसवले आहे. कॉमेडी रिऍलिटी शो असणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मध्ये स्पर्धकांच्या चार टीम नेमण्यात आल्या होत्या आणि विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, समीर चौघुले हे चार विनोदवीर त्या चार टीमचे प्रमुख आहेत. 

‘कॉमेडीचा जहागिरदार’ हा किताब मिळवण्यासाठी या चारही टीमने एकापेक्षा एक मजेशीर आणि अफलातून स्किट सादर केले. अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हे या शोचे जजेस् या नात्याने त्यांनी दरवेळी प्रत्येक स्किटला आणि कलाकारांच्या परफेक्ट कॉमिक पंचला अथवा वेळेला दिलखुलापसपणे दाद दिली. जजेस, स्पर्धक आणि प्रेक्षकांना अतिशय गोड पद्धतीने बांधून ठेवणारी या कार्यक्रमाची होस्ट म्हणजे प्राजक्ता माळी. अशा या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’च्या टीमला आणि मनोरंजनाच्या एका तासाला निरोप देण्याची वेळ आली असली तरी या हास्यजत्रेचं दुसरं पर्व देखील लवकरच येणार आहे. या पर्वातील विजेत्या जोडीला दुसऱ्या पर्वात डायरेक्ट संधी मिळणार असून त्यातील बाकी कलाकार मात्र गुलदस्त्यात आहे. 
या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार हा कॉमेडी ऍक्टमध्ये तरबेज आहे, त्यामुळे सवय झालेल्या मनोरंजनाची प्रेक्षकांना नक्कीच आठवण येणार पण त्याचबरोबर ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये ‘कॉमेडीचा जहागिरदार’ हा किताब कोण मिळवणार याकडे देखील प्रेक्षकांचे लक्ष हमखास असेल.

अंतिम निकाल प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चा फिनॅले मध्ये येत्या २६ आणि २७ डिसेंबरला रात्री ९ वाजता सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे.


 

Web Title: maharashtrachi hasya jatra winner will be declared soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.