जाणून घ्या आमच्यासोबत, मालिकेच्या कथानकात चॅनल करत असलेल्या हस्तक्षेपाबाबत काय मत आहे लेखक चिन्मय मांडलेकरचे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 04:58 PM2016-12-19T16:58:00+5:302016-12-24T14:24:41+5:30

प्राजक्ता चिटणीस लेखक, अभिनेता, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरने जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मिनी सिरिजची निर्मिती केली आहे. आता सख्या ...

Know what is the opinion of the interlocutors about the channel in the story of the series with us, writer Chinmay Mandlekar ... | जाणून घ्या आमच्यासोबत, मालिकेच्या कथानकात चॅनल करत असलेल्या हस्तक्षेपाबाबत काय मत आहे लेखक चिन्मय मांडलेकरचे...

जाणून घ्या आमच्यासोबत, मालिकेच्या कथानकात चॅनल करत असलेल्या हस्तक्षेपाबाबत काय मत आहे लेखक चिन्मय मांडलेकरचे...

googlenewsNext
ong>प्राजक्ता चिटणीस
लेखक, अभिनेता, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरने जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मिनी सिरिजची निर्मिती केली आहे. आता सख्या रे या मालिकेद्वारे तो मालिकेच्या निर्मितीक्षेत्रात उतरत आहे. त्याच्या या अनुभवाबाबत त्याने सीएनएक्सशी मारलेल्या गप्पा...

एखाद्या मालिकेची निर्मिती करण्याचा विचार कसा केलास?
मालिकेची निर्मिती करावी असे माझ्या डोक्यात कित्येक दिवसांपासून सुरू होते. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले या मिनी सिरिजची निर्मिती करण्याची संधी मिळाली, त्यावेळीच आपण हे काम चांगल्याप्रकारे केले तर आपल्याला भविष्यात आणखी संधी मिळतील असे माझ्या मला वाटत होते. ही मालिका प्रेक्षकांना आवडली आणि कलर्स मराठी याच वाहिनीने पुन्हा एकदा निर्मिती करण्यासाठी विचारले. सख्या रे या मालिकेची संकल्पना ही वाहिनीचीच आहे. केवळ मी कथेचा विस्तार केला.

एखादी मालिका लिहिताना प्रेमकथा लिहिणे आणि रहस्यकथा लिहिणे यात तुला काय फरक जाणवतो?
रहस्यकथा लिहित असताना मालिकेचा शेवट काय असणार याची लेखकाला खात्री असणे आवश्यक आहे. डेली मालिकेची रहस्यकथा लिहिणे हे खूप आव्हानात्मक असते. कारण या कथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवणे गरजेचे आहे आणि त्यातही सुरुवातीच्या काही भागांमध्ये कथेतील कोडी सुटत नसल्यास प्रेक्षक मालिका पाहाणे सोडून देतात. त्यामुळे कोणते रहस्य कधी उलगडायचे हे ठरवणे गरजेचे असते आणि त्यातही रहस्य उलगडल्यानंतर प्रेक्षकांना हेच रहस्य असणार असे आपल्याला आधीच वाटले होते असे वाटायला नको. त्यामुळे कथेत वेळोवेळी प्रेक्षकांना धक्के देणे गरजेचे आहे. हे सगळे केल्यासच प्रेक्षक इंटरेस्टने रहस्य मालिका पाहातो असे मला वाटते. 

या मालिकेतील कलाकारांची निवड कशी केलीस?
सुयश टिळकने आतापर्यंत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मला एकाच साच्यातील भूमिका साकारणारा अभिनेता नको हवा होता. सुयशच्या आधीच्या मालिकांचा विचार करूनच त्याची निवड करण्यात आली. या मालिकेतील माँसाहेबांच्या भूमिकेसाठी रोहिणी हट्टंगडीच योग्य आहेत असे माझे पहिल्या दिवसापासूनचे मत आहे. पण या मालिकेची नायिका शोधायला खूप वेळ लागला. सखी या मालिकेत रुचीने पूर्वी काम केले होते. या मालिकेतील तिची भूमिका मला आवडली असल्याने तिचा आपण या मालिकेसाठी विचार करूया असे म्हणणे होते. पण काही केल्या तिच्याशी संपर्क होत नव्हता. दुसरीकडे नायिकेसाठी ऑडिशन्स सुरूच होते. पण कोणतीही मुलगी या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हती आणि अचानक एकदा रुची तिचा पती अभिनेता अंकित मोहनसोबत मला भेटली. मी अंकितला भेटल्यावर त्याने माझी रुचीशी ओळख करून दिली. खरे तर पूर्वी मी रुचीला भेटलो होतो. पण त्यादिवशी रुची वेस्टर्न कपड्यांमध्ये असल्याने मी तिला ओळखलेच नाही. अंकितने ओळख करून दिल्यानंतर रुची सखी या मालिकेतील नायिका असल्याचे मला लगेचच कळले. त्यावर सध्या तू काय करत आहे हा पहिला प्रश्न मी तिला विचारला आणि माझ्यासोबत मालिका करायला आवडेल का असे विचारले त्यावर तिने लगेचच माझ्यासोबत काम करायला होकार दिला आणि मला माझ्या मालिकेची नायिका भेटली. 

तू सध्या तू माझा सांगाती या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेस, सरस्वती ही मालिका लिहित आहेस, तसेच विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेस आणि आता मालिकेची निर्मिती. या सगळ्या गोष्टी तू कशा पद्धतीने सांभाळतोस?
एक लेखक म्हणून तर माझे काम सतत सुरू असते. मी घरात बायकोशी बोलत असेल तरी माझ्या डोक्यात मालिकेच्या पुढच्या भागात काय दाखवायचे हेच सुरू असते. त्यामुळे एक लेखक म्हणून मला वेगळा वेळ द्यावा लागत नाही तर एक अभिनेता म्हणून दिवसातील काही तास मी चित्रीकरणाला देतो. तू माझा सांगाती या मालिकेचे चित्रीकरण तर खूप हेक्टिक असते. या चित्रीकरणाच्यावेळी मी चप्पल घालत नाही. त्यामुळे आता तर माझ्या पायांना भेगा पडल्या आहेत. खरे तर याचे चित्रीकरण करताना शारिरीक मेहनत खूप होते. पण मी हे सारे एन्जॉय करतो तर हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या तरी रात्रीच्या वेळात सुरू आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि मालिकेच्या निर्मितीच्या कामात माझी टीम मला खूप सांभाळून घेत आहे. माझ्या टीममुळेच हे काम करणे सोपे जात आहे.

मालिकेच्या कथानकात कोणत्याही चॅनलचा हातभार किती असतो?
मालिकेच्या टिआरपीनुसार अनेकवेळा मालिकेच्या कथानकात बदल केला जातो. कोणत्या व्यक्तिरेखा लोकांना अधिक आवडत आहेत याचा अभ्यास चॅनलची मंडळी सतत करत असतात आणि त्यानुसार कथानकात त्या व्यक्तिरेखेला अधिक महत्त्व दिले जाते. त्यानुसार कथानकात काही बदलही केले जातात. पण या सगळ्याचा मालिकेला फायदाच होतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे. 

Web Title: Know what is the opinion of the interlocutors about the channel in the story of the series with us, writer Chinmay Mandlekar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.