राती तुला शांत झोप लागली का गं???... किरण मानेंची अभिनेत्री सविता मालपेकर यांच्यासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 03:53 PM2022-01-19T15:53:45+5:302022-01-19T15:54:13+5:30

Kiran Mane :  ‘मुलगी झाली हो’ मालिकेत आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सविता मालपेकर यांनी किरण मानेंच्या विरोधात भूमिका मांडली होती. आता किरण माने यांनी या आरोपांच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली आहे.

kiran mane share post for Mulgi Zali Ho co-actress savita malpekar | राती तुला शांत झोप लागली का गं???... किरण मानेंची अभिनेत्री सविता मालपेकर यांच्यासाठी खास पोस्ट

राती तुला शांत झोप लागली का गं???... किरण मानेंची अभिनेत्री सविता मालपेकर यांच्यासाठी खास पोस्ट

googlenewsNext

सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्यामुळे अभिनेता किरण मानेंना  (Kiran Mane) ‘मुलगी झाली हो’  (Mulgi Zali Ho) या मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं बोललं जात होतं. खुद्द किरण माने यांनी तसा दावा केला होता. पण मालिकेचे दिग्दर्शक, कलाकार शिवाय स्टार प्रवाह या वाहिनीने त्यांचा हा दावा खोडून काढत, माने यांना त्यांच्या गैरवर्तुणुकीमुळे मालिकेतून काढल्याचा प्रतिदावा केला होता. तूर्तास हे प्रकरण चांगलंच तापलेलं दिसत आहे.

सध्या या प्रकरणावरून मालिकेतील कलाकारांचे दोन गट पडल्याचं चित्र आहे. काही सहकलाकारांनी किरण मानेंना पाठींबा दिला आहे तर काहींनी त्यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे.  ‘मुलगी झाली हो’ मालिकेत  आईची भूमिका साकारणाऱ्या सविता मालपेकर यांनी किरण मानेंच्या विरोधात भूमिका मांडली होती. किरण माने सतत टोमणे मारून बोलायचे. मी सीरिअलचा हिरो आहे. मी याला काढून टाकेल, त्याला काढून टाकेल, असं बोलायचा, असा आरोप त्यांनी केला होता. आता किरण माने यांनी सविता मालपेकरांच्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली आहे.

 ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत सविता मालपेकर या किरण मानेंच्या आईची भूमिका साकारताना दिसल्या होत्या.
 
  

किरण माने यांची पोस्ट-

मी लाडानं तुला 'म्हातारे' अशी हाक मारायचो... अगदी परवा-परवा शेवटच्या दिसापर्यन्त ! तू बी माझ्याशी लै प्रेमानं वागत हुतीस.. आपल्या शुटिंगच्या शेवटच्या दिसापर्यन्त !! अलीकडच्या दिवसांत कुनीतरी तुझे माझ्याबद्दल गैरसमज करून दिलेवते... "किरण लेखकांना सांगून तुझा पत्ता कट करतोय." असं तुला वाटायला लागलं... तू मेकअपरुमध्ये बसून मला लै जोरजोरात शिव्या देत हुतीस... तवाबी मी तुझ्याशी भांडलो नाही. तुला भेटून मायेनं तुझा हात हातात घिवून तुझे गैरसमज दूर केलेवते.. तुला काही फॅक्टस् सांगीतल्यावत्या... नंतर तू लेखकांना फोन केल्यावर तुला कळलं की यात किरण मानेची चूक नव्हती...प्राॅडक्शन हाऊसमधुन लेखकांना सांगीतलं गेलंवतं की सविताताईंना वगळून सीन्स लिहा. तुला कळलं काय झालं असेल ते. ते गुपित तू माझ्याशी बोललीसबी.. आपण हसलो... आणि मग पुन्हा आपलं "म्हातारेS-इलासाS " सुरू झालं...

परवा तुला टीव्हीवर तावातावाने माझ्या इरोधात बोलताना मला धक्काच बसला ! वाईट वाटलं.. काळजात आत कायतरी लै तुटल्यागत झालं...

पन म्हातारे, तुझ्यावर राग नाही धरणार.. तुझीबी कायतरी मजबूरी आसंल गं... कुनाच्या पोटावर पाय येत असताना कुनी आसं बोलंल व्हय? आत्मा शांत बसंल का त्याचा.. म्हातारे असं बोलल्यावर राती तुला शांत झोप लागली का गं??? तुझ्या स्वामी समर्थांना तू काय कारन सांगीतलंस असं बोलल्याचं???? त्यांच्या फोटोसमोर बसुन तर आपन परवा परवा आपल्यातला गैरसमज मिटवलावता...असो. त्यांची तुझ्यावर कृपा राहो.

..माझं म्हन्शील तर मी न्याय मिळवल्याशिवाय जीव सोडणार नाही !

झगडणार... लढणार...तुला ठावं हाय दुनिया इरोधात गेली तरी सत्य जिंकतं यावर तुझ्या इलासाचा इस्वास हाय... जिंकल्यावर मात्र तुला भेटायला येईन.. येताना मी प्रेमानं तुझ्यासाठी चंद्रविलासची खारी बुंदी आणून देईन.सातारी कंदी पेढे आणून देईन.. पूर्वी आणून देत होतो, तश्शीच.. तेवढ्याच मायेनं !

तुझ्यावर राग नाय गं माझा..

- किरण माने.

 

Web Title: kiran mane share post for Mulgi Zali Ho co-actress savita malpekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.