बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊत लवकरच अडकणार लग्नबेडीत, लग्नाची तारीख केली जाहीर

By तेजल गावडे | Published: October 6, 2020 09:12 PM2020-10-06T21:12:21+5:302020-10-06T21:13:17+5:30

बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊतचा तेजस देसाईसोबत जून महिन्यात साखरपुडा पार पडला. आता ती लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे.

Bigg Boss Marathi fame Sharmishtha Raut to get married soon, wedding date announced | बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊत लवकरच अडकणार लग्नबेडीत, लग्नाची तारीख केली जाहीर

बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊत लवकरच अडकणार लग्नबेडीत, लग्नाची तारीख केली जाहीर

googlenewsNext

बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊतचा तेजस देसाईसोबत जून महिन्यात साखरपुडा पार पडला. या आनंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना खुशखबर दिली होती. त्यानंतर आता तिने सोशल मीडियावर लग्नाची तारीख जाहीर केली आहे. तिच्या लग्नाला फक्त पाच दिवस राहिले आहेत. तिचा विवाह सोहळा 11 ऑक्टोबरला पार पडणार आहे.

शर्मिष्ठा राऊतने लग्नाची तारीख जाहीर करत म्हटले की, आपण सगळ्यांनी मला आणि तेजसला मनापासून स्वीकारलेत याबद्दल आम्ही दोघेही कायम तुमचे ऋणी आहोत.आता तुमच्या आणि वडीलजणांच्या आशीर्वादाने आम्ही 11 ऑक्टोबर, 2020 रोजी लग्नाची गाठ बांधणार आहोत. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर सदैव राहोत. 

तेजस हा 'बोस' कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर आहे. शर्मिष्ठाने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शर्मिष्ठाने सांगितले की, 'आमचे अरेंज मॅरेज असले, तरी हे 'लव्ह मॅरेज' आहे असेच मी म्हणेन. माझी बहीण सुप्रियाने आमची ओळख करुन दिली. त्याला पहिल्या भेटीतच मी आवडले होते. त्याने मला लग्नाची मागणी घातली, पण मी थोडा वेळ घेतला. काही महिन्यांनी होकार दिला.'दिल तो पागल है' सिनेमासारखे फिल्मी काहीसे झाले. तुम्हाला ते आतून वाटते… हाच आपला 'मिस्टर राईट' आहे, याचा कौल अंतर्मनाने मला दिला.'


तिने पुढे सांगितले की, तेजस फार मालिका पाहत नाही. त्यामुळे मी कोण आहे, हेच त्याला माहित नव्हते. अर्थात माझीही तीच अट होती. त्याने माणूस म्हणून मला आधी ओळखावे. मग माझी अभिनेत्री म्हणून त्याला ओळख व्हावी. माझे स्थळ गेल्यावर त्याने माझा 'चि व चि. सौ. का.' हा चित्रपट पाहिला, नंतर काही मालिका वेबवर पाहिल्या. त्याला माझ्या क्षेत्राचा, इथल्या वेळांचा अंदाज आहे. तो फोक डान्सर म्हणून शो करायचा. त्याचे काही मित्रही या क्षेत्रात आहेत. त्यामुळे वेगळे क्षेत्र असून जुळवताना फारशा अडचणी आल्या नाहीत. त्याला सोशल मीडिया, लोकांशी संपर्क साधणे, हे कसे जुळवून घेता येईल, याबाबत मला साशंकता होती. पण त्याने फारच छान जमवून घेतले आहे याचा मला आनंद आहे.

शर्मिष्ठाने 'मन उधाण वाऱ्याचे‘मधील साकारलेली नीरजा ही भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीम गाठी‘मध्ये तिने अर्चनाची व्यक्तिरेखा साकारली होती. कुंपण ,सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी या मालिकांमध्ये देखील शर्मिष्ठा झळकली होती.

मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील तिने उत्तम कामगिरी बजावली. जो भी होगा देखा जयेगा, टॉम अँड जेरी, बायको असून शेजारी, शंभू राजे या नाटकात तिने काम केले आहे. दे धक्का, फक्त लढ म्हणा, ची व ची सौ कां , काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील तिने भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Bigg Boss Marathi fame Sharmishtha Raut to get married soon, wedding date announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.