Bigg Boss Marathi 2 Winner: शिव ठाकरे सांगतोय, मिळालेल्या १७ लाखांमधून करणार या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 12:19 AM2019-09-02T00:19:17+5:302019-09-02T00:20:25+5:30

शिवला मिळालेल्या या यशामुळे तो चांगलाच खूश असून आता भविष्यात या पैशांचा कशाप्रकारे उपयोग करायचा हे देखील त्याने ठरवले आहे.

Bigg Boss Marathi 2 Winner: Shiv Thakare will do this from Prize money of bigg boss marathi 2 | Bigg Boss Marathi 2 Winner: शिव ठाकरे सांगतोय, मिळालेल्या १७ लाखांमधून करणार या गोष्टी

Bigg Boss Marathi 2 Winner: शिव ठाकरे सांगतोय, मिळालेल्या १७ लाखांमधून करणार या गोष्टी

googlenewsNext
ठळक मुद्देबिग बॉस मराठी २ चे विजेतेपद मला मिळाल्याबद्दल मी प्रचंड खूश आहे. माझ्यासाठी हा दिवस खूपच खास असून या दिवसाचे स्वप्न मी अनेकवेळा पाहिले होेते. मला मिळालेले हे १७ लाख रुपये मी माझ्या आईकडे सुपूर्त करणार आहे.

बिग बॉस मराठी 2 या कार्यक्रमाचे विजेतेपद शिव ठाकरेला मिळाले असून त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 17 लाख रुपये मिळणार आहेत. शिव हाच बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमाचा विजेता ठरेल असा अंदाज कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच लावला जात होता. शिवला मिळालेल्या या यशामुळे तो चांगलाच खूश असून आता भविष्यात या पैशांचा कशाप्रकारे उपयोग करायचा हे देखील त्याने ठरवले आहे.

शीवने लोकमतशी बोलताना सांगितले की, बिग बॉस मराठी २ चे विजेतेपद मला मिळाल्याबद्दल मी प्रचंड खूश आहे. माझ्यासाठी हा दिवस खूपच खास असून या दिवसाचे स्वप्न मी अनेकवेळा पाहिले होेते. मला मिळालेले हे १७ लाख रुपये मी माझ्या आईकडे सुपूर्त करणार आहे. मी काही वर्षांपूर्वी अमरावतीमध्ये एक घर घेतले होते. त्या घरासाठी मी बँकेकडून कर्ज घेतले होते. या पैशांने मी ते कर्ज फेडणार आहे. मला महेश मांजरेकर यांनी चित्रपटाची ऑफर दिली याचा मला प्रचंड आनंद होत आहे. मराठीसोबतच हिंदी चित्रपटात काम करायला मिळाले तर मला नक्कीच आवडेल.

बिग बॉसच्या घरात असताना शिव आणि वीणा जगताप यांच्या प्रेमकथेची देखील चांगलीच चर्चा झाली होती. ते या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते. लग्नाविषयी विचारले असता तो सांगतो, आता बाहेर आल्यानंतर या विषयावर माझ्या कुटुंबियांशी मी बोलणार आहे. माझ्या आईचे या सगळ्यात मत काय आहे हे महत्त्वाचे आहे.  

शिव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती. या कार्यक्रमामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. पण खऱ्या अर्थाने लोकप्रियता त्याला बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमामुळे मिळाली. शिवला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला असल्याचे त्याने या कार्यक्रमात अनेकवेळा सांगितले आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 2 Winner: Shiv Thakare will do this from Prize money of bigg boss marathi 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.