स्टार प्लस वाहिनीवरील नच बलियेच्या नवव्या सीझनमध्ये येत्या वीकेण्डच्या भागात बॉलिवूड अभिनेत्री हेलन सहभागी होणार आहे. या वीकेण्डच्या भागात हेलनने काही रंजक आणि उत्कंठावर्धक किस्से सांगितले. 

नच बलिये हा नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रम असल्याने सूत्रधार मनीष पॉलने त्यांना त्यांच्या आवडत्या गाण्याविषयी प्रश्न विचारला. त्यावर हेलन म्हणाल्या, “मला स्वत:ला ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ हे गाणं खूप आवडतं. ज्या क्षणी मी सर्वप्रथम हे गाणं ऐकलं, तेव्हाच मला जाणवलं की हे गाणं सुपरहिट होणार. त्यामुळे त्याचं चित्रीकरण करतानाही मला खूप मजा आली. तसंच आ जाने जा गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी मीसुद्धा काही सूचना केल्या.”

गेली अनेक दशके आपल्या नृत्याने हेलनने प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून आता या नृत्यसम्राज्ञीवर आपला ठसा उमटविण्याची वेळ यातील स्पर्धक जोड्यांवर होती. त्यांचे नृत्याविष्कार पाहून प्रभावित झालेल्या हेलन म्हणाल्या, “मी आजच्या काळात जन्माला आले नाही, ही देवाची कृपाच म्हणायची. कारण मी जर तशी असते, तर तुमच्यासारख्या अफलातून नर्तकांच्या स्पर्धेत मी टिकूच शकले नसते.”


अमिताभ बच्चन आणि शम्मी कपूर यांच्या जबरदस्त चाहत्या असलेल्या हेलन यांना नच बलिये-9च्या सेटवर त्यांची एक मोठी चाहती भेटली. तिचे नाव आहे परीक्षक रवीना टंडन.

रवीना म्हणाली, मी हेलन मॅडमची सर्वात मोठी चाहती आहे. त्यांनी आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आहे. पण मी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण फॅशनचीही खूप मोठी चाहती आहे. त्याबद्दल मला त्यांचा हेवा वाटतो आणि आज त्या आमच्याबरोबर एकाच मंचावर उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.


Web Title: Actress Helan came as guest in Nach Baliye 9 Show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.