स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:21 IST2025-06-06T18:20:59+5:302025-06-06T18:21:15+5:30
Starlink India: स्टारलिंकचा वापर गेल्या काही काळात समुद्रातून अंमली पदार्थांची तस्करी, परदेशातील देशविघातक शक्तींशी संपर्क साधण्यासाठी केला गेल्याचेही समोर आले आहे. परंतू, जसे अणु उर्जेचे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहे. त्याचा वापर कोण कशासाठी करतो यावर अवलंबून आहे.

स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
स्टारलिंकला भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा पुरवण्यास लायसन्स मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून एलन मस्क यांची कंपनी यासाठी धडपडत होती. सुरुवातीला तरी स्टारलिंकला विरोध करणारे रिलायन्स जिओ आणि एअरटेल हे भागीदार असणार आहेत. स्टारलिंक भारतात लाँच झाली तर मोठमोठ्या कंपन्यांसह ग्रामीण भागाला मोठा फायदा होणार आहे. फायद्यासारखेच काही तोटे देखील आहेत.
स्टारलिंकचा वापर गेल्या काही काळात समुद्रातून अंमली पदार्थांची तस्करी, परदेशातील देशविघातक शक्तींशी संपर्क साधण्यासाठी केला गेल्याचेही समोर आले आहे. परंतू, जसे अणु उर्जेचे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहे. त्याचा वापर कोण कशासाठी करतो यावर अवलंबून आहे. तसेच स्टारलिंक भारताला किती फायद्याचे ठरेल हे पाहणे गरजेचे आहे.
दुर्गम ठिकाणी, ग्रामीण भागात आजही मोबाईलला रेंज घेत फिरावे लागते अशी स्थिती आहे, तिथे इंटरनेट तर दूरच राहिले. अनेक गावांत बीएसएनएल सेवा पुरविते, परंतू ती असल्यापेक्षा नसलेली बरी इतकी वाईट परिस्थितीत आहे. अशावेळी या ग्रामीण भागाला सॅटेलाईट इंटरनेट सेवा वरदान ठरणार आहे. या सेवेचा दर जर आवाक्यात ठेवण्यात स्टारलिंकला यश आले तर त्याचा खरोखरच देशभरात फायदा होणार आहे. शाळा, कॉलेज आणि ऑनलाइन शिक्षण आदींसाठी ही वरदान ठरणार आहे. शेती आणि कृषी व्यवसायासाठी देखील स्टारलिंक फायदा देणार आहे. गावखेड्यातील शेतकरी याद्वारे विविध कामे तसेच माहिती गोळा करू शकणार आहेत.
आता बऱ्याच ठिकाणी ऑनलाईन वैद्यकीय तपासणी, उपचार केले जातात. गावात आधीच रस्त्यांची वाणवा असते, त्यात दवाखान्यांसाठी तर पायपीट करावी लागते. कित्येक फोटो, बातम्या आपण रोजच पाहतो. अशावेळी उपचाराचा सल्ल्यासारख्या गोष्टी करता येणार आहेत. लहान उद्योग आणि स्टार्टअप्सना याचा फायदा होणार आहे. डिजिटल व्यवहार करणे सोईचे होईल. स्टारलिंकचा आणखी एक फायदा म्हणजे पूर, भूकंप, वादळं यावेळी सामान्य नेटवर्क बंद पडते. परंतू Starlink सुरू राहू शकते. यामुळे अशा भागात संपर्क साधणे सोपे जाणार आहे.
स्टारलिंकचे काही तोटेही आहेत...
जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. ही सेवा महागडी तर असणारच आहे. परंतू, खराब हवामान असेल किंवा ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे कनेक्टीव्हीटीमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. हजारो छोटे छोटे सॅटेलाइट्स अंतराळात असल्याने कचऱ्याची समस्याही वाढीला लागणार आहे. वैज्ञानिकांनाही काम करणे कठीण जाणार आहे. स्टारलिंक सध्या ६० हून अधिक देशांत इंटरनेट पुरवत आहे. यामुळे आधीच ६००० हून अधिक सॅटेलाईट अवकाशात घिरट्या घालत आहेत.
कसे काम करणार...
स्टारलिंक भारतात लाँच झाले की स्टारलिंकचे सॅटेलाईट भारतावर घिरट्या घालण्यास सुरुवात करतील. ज्या लोकांनी कनेक्शन घेतले असेल त्यांच्याकडे स्टारलिंकचा रिसिव्हर म्हणजेच अँटेना असणार आहे. तो तुमच्या घरातील राऊटरवरून मोबाईल, संगणक, टीव्ही आदीला कनेक्ट असणार आहे. आता जसे वायरद्वारे किंवा मोबाईल टॉवरद्वारे तुम्ही इंटरनेट वापरता तसेच हे देखील काम करणार आहे, फक्त फरक हाच की ते २४ तास सॅटेलाईटशी कनेक्ट असणार आहे. जिथे ब्रॉडबँड, मोबाईल टॉवर उभारू शकत नाही त्या ठिकाणी हे सॅटेलाईट इंटरनेट नेटवर्क देणार आहे.