आधी शाओमी अॅपलचे फिचर्स पळवायची, आता अॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 21:04 IST2025-06-10T21:03:33+5:302025-06-10T21:04:28+5:30
Apple WWDC 2025 : काही वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने विंडोज व्हिस्टा नावाचे ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्जन आणले होते. ते देखील असेच पाणीदार होते.

आधी शाओमी अॅपलचे फिचर्स पळवायची, आता अॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
अॅपलने डेवलपर कॉन्फरन्समध्ये आयओएसच्या थेट २६ व्या व्हर्जनला लाँच केले. लिक्विड डिस्प्ले अशी या व्हर्जनची ख्यातीही सांगितली. परंतू, आयफोन युजरच या लिक्विड डिस्प्लेवरून अॅपलला नको नको म्हणत असताना आता नेटकऱ्यांनी शाओमीचे डिझाईन, फिचर्स चोरल्याचा आरोप केला जात आहे.
काही वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने विंडोज व्हिस्टा नावाचे ऑपरेटिंग सिस्टीम व्हर्जन आणले होते. ते देखील असेच पाणीदार होते. नेटकऱ्यांनी तर अॅपलने शाओमीची फिचर्स घेतल्याचे पुराव्यासकट दाखविण्यास सुरुवात केली आहे. iOS 26 मध्ये AI पॉवर्ड इमेज सर्च फीचरबद्दल सांगण्यात आले. युजर आयफोनवरील कोणत्याही स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो आणि तो गुगलवर सर्च करू शकतो. Xiaomi फोन वापरणारे लोक हे फीचर बऱ्याच काळापासून वापरत आहेत, असा दावा या नेटकऱ्यांनी केला आहे.
लॉक स्क्रीनवरील घड्याळ कस्टमाइझ करण्यासाठी अॅपलने नवीन फीचर्स दिले आहेत. हे अगदी Xiaomi च्या HyperOS च्या पहिल्या आवृत्तीसारखेच दिसत आहेत. लॉक स्क्रीनवरील घड्याळ त्याचा आकार बदलू शकते आणि उपलब्ध जागेनुसार दिसू शकते. HyperOS सादर करताना Xiaomi ने पहिल्यांदाच असेच फीचर दिले होते. XiaomiTime नावाच्या वेबसाइटवरील चित्रांसह हा दावा करण्यात आला आहे. शाओमीने अॅपलच्या नव्या लिक्विड ओएसबाबतही असाच दावा केला आहे, शाओमीने अशाच डिस्प्ले थीम याआधीच वापरलेली आहे.
फोटो अॅपमध्येही अॅपलची चोरी नेटकऱ्यांनी पकडली आहे. गॅलरी अॅपला दोन टॅबमध्ये विभागून वापरता येते, हे शाओमी आपल्या फोन्समध्ये बऱ्याच आधीपासून देत आहे. तेच आता इंटरफेसमध्ये दोन टॅब जोडले आहेत.
शाओमी सुरुवातीला अॅपलपासून प्रेरणा घेऊन अॅपलसारखेच फोन बनवत होती. परंतू आता अॅपल शाओमीपासून प्रेरणा घेऊन फोन बनवू लागल्याची खिल्ली नेटकरी उडवत आहेत. तसेच नव्या डिस्ल्पेबाबत आयफोन, मॅक युजर्स आपली मते मांडत आहेत. एवढी ट्रान्सपरन्ट स्क्रीन ठेवली तर आपल्याला टेक्स्ट वाचताना त्रास होईल, असेही काहीजण सांगत आहेत. आता अॅपल काय निर्णय घेते हे पाहणे जगातील सर्वाधिक विकत घेणाऱ्या स्मार्टफोन धारकांकडून पाहिले जात आहे.