अरे व्वा...सोलापुरातील प्रिसिजनने भारतात बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 05:20 PM2021-09-22T17:20:37+5:302021-09-22T17:20:48+5:30

नव्या इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा कमी खर्चात रेट्रोफिटिंग शक्य, प्रिसिजनची नवी झेप

Wow ... retrofitted electric bus made in India by Precision in Solapur | अरे व्वा...सोलापुरातील प्रिसिजनने भारतात बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस

अरे व्वा...सोलापुरातील प्रिसिजनने भारतात बनविली रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस

googlenewsNext

सोलापूर : जगभरातील नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशाफ्ट्सचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योगसमूहाने भारतात पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनविली आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील ही अत्यंत ऐतिहासिक घटना आहे. वाहतूकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रिसिजन उद्योगसमूहाने मोठं पाऊल टाकलं आहे.

प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक करण शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी कंपनीचे चेअरमन यतिन शहा उपस्थित होते. 

प्रिसिजनने डिझेलवर चालणाऱ्या २३ आसन क्षमतेच्या प्रवासी बसचे रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये केले आहे. मध्यम आकाराची प्रवासी बस इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतरित होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. ही वातानुकूलित बस एका चार्जिंगमध्ये १८० किलोमीटर धावेल. प्रिसिजनची इलेक्ट्रिक व्हेईकल टीम वर्षभर या प्रोजेक्टवर पुणे येथे काम करत होती. यासाठी पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) संस्थेने या बसचे टेस्टिंग करत प्रिसिजनला सहकार्य केले. या बसचे लवकरच शासनासमोर सादरीकरणही केले जाणार आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय पुढे येत आहे. मात्र संपूर्ण नवे इलेक्ट्रिक वाहन बनविण्याचा खर्च मोठा असतो. त्यामुळे जुन्या वाहनाचे 'रेट्रोफिटिंग' ही संकल्पना पुढे आली. यामध्ये वाहनाचे इंजिन काढून त्याला इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन बसविली जाते. अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुरुवातीची गुंतवणूक मोठी असली तरी ऑपरेटिंग कॉस्ट खूप कमी असणार आहे.

प्रिसिजनने मे २०१८ मध्ये नेदरलँड्समधील 'इमॉस मोबील सिस्टिम्स बी. व्ही.' ही इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन उत्पादक कंपनी संपादित केली. इमॉसमुळे प्रिसिजन समूहाकडे इंधनावर चालणाऱ्या वाहनाचे इलेक्ट्रीफिकेशन करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले. इमॉसने आतापर्यंत ६०० पेक्षाही अधिक जड वाहनांचे इलेक्ट्रिफिकेशन केले आहे. त्यानंतर ही वाहने एकूण १६ कोटी किलोमीटर्सपेक्षाही अधिक अंतर यशस्वीरीत्या धावली आहेत, असेही करण शहा यांनी सांगितले.

"इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेतील संधी ओळखून प्रिसिजनने नेदरलँड्समधील 'इमॉस' कंपनी संपादित केली होती. रेट्रोफिटेड वाहन म्हणजे माननीय पंतप्रधानांच्या 'आत्मनिर्भर भारत' योजनेला अनुसरून टाकलेले पाऊल आहे. संपूर्णतः देशी बनावटीची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस भारतीय बाजारात आणून खऱ्या अर्थाने 'मेड इन इंडिया' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न आहे."
- यतिन शहा  (चेअरमन, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लि.) 

"प्रिसिजन ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत मजबूत ताळेबंद असणारी कंपनी आहे. भविष्यातील व्यवसायवाढीच्या दृष्टीने आम्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात नियोजनबद्ध गुंतवणूक करणार आहोत. यामुळे देशातील इलेक्ट्रिक पार्ट्स बनविणाऱ्या उद्योगांनाही चालना मिळेल."
- रविंद्र जोशी  (मुख्य वित्तीय अधिकारी, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लि.)

"प्रिसिजनची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या बसच्या इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईनचे ६० टक्के पार्ट्स हे भारतातच तयार झाले आहेत. आगामी काळात संपूर्णपणे स्वदेशी पार्ट्स वापरण्याचे उद्दिष्ट प्रिसिजनने बाळगले आहे. युरोपातील अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेच्या दृष्टीने योग्य किंमतीत उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 'लास्ट माईल डिलिव्हरी' अर्थात शेवटच्या ग्राहकापर्यंत मालवाहतूक करणारी हलकी वाहने इलेक्ट्रिक करण्यावर आमचा भर असेल."
- करण शहा (कार्यकारी संचालक, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लि.)

Web Title: Wow ... retrofitted electric bus made in India by Precision in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.