पांडव जब कौरव बन जाते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:00 PM2019-10-14T13:00:02+5:302019-10-14T13:00:09+5:30

शनिवारी मुंबईत होतो. तेथील वर्तमानपत्रात ‘मुलगी झाल्यामुळे सासरच्या लोकांनी केला विवाहितेचा छळ’ ही बातमी वाचली. प्रवास करून सोलापूरला उशिरा ...

When Pandavas become Kauravas ... | पांडव जब कौरव बन जाते...

पांडव जब कौरव बन जाते...

googlenewsNext

शनिवारी मुंबईत होतो. तेथील वर्तमानपत्रात ‘मुलगी झाल्यामुळे सासरच्या लोकांनी केला विवाहितेचा छळ’ ही बातमी वाचली. प्रवास करून सोलापूरला उशिरा पोहोचलो. सकाळी रविवारचा लोकमत उघडला आणि पहिल्याच पानावर ‘मुलगी झाल्याच्या कारणावरून सोलापुरात पत्नीस मारहाण’ ही बातमी वाचली आणि मन खिन्न झाले. वाचक हो, मुलगी होणे यात त्या मातेचा काय दोष? मुलगा होणे अगर मुलगी होणे हे पुरुषाच्या गुणसूत्रावरच अवलंबून असते. हे कधी आपल्या लोकांना कळणार? विनाकारण विवाहितेला त्रास दिला जातो. दोष द्यायचा झाला तर त्या पुरुषालाच द्यायला पाहिजे. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असाच हा प्रकार आहे. अशा बातम्या वाचल्यानंतर ती केस माझ्या डोळ्यासमोर येते. 

मोठ्या भावाला पाच मुलेच तर धाकट्या भावाला चार मुलीच होत्या. चांगले सुखी एकत्र कुटुंब होते. त्यांच्या आई-वडिलांचा मोठ्या मुलाकडे ओढा, कारण मोठ्याला पाच मुलेच होती. धाकट्याला अगर त्याच्या पत्नीला घरी दुय्यम वागणूक होती. कारण काय? तर त्यांना फक्त मुलीच होत्या. याबाबत आपल्या समाजाची धारणा खूप विचित्र आहे. मुलाला तुपाची वाटी तर मुलीला रिकामीच वाटी! मोठा भाऊ मुलांना पाच पांडव म्हणून संबोधायचा. घरी कोणी आले तर त्यांची ओळख तशीच करून देत होता. घरातदेखील मोठ्या सुनेचे वर्चस्व. धाकट्या सुनेला काही किंमत नव्हती. पदोपदी तिचा अपमान व्हायचा. कौटुंबिक समारंभात ही पाच पांडवांच्या आई-बापाला मान-सन्मान मिळत होता. चार मुलींच्या आई-बापाला दुय्यम वागणूक मिळत असे. मालमत्तेच्या वाटणीत धाकट्याला दुय्यम न्याय दिला. मोठ्याला जास्त संपत्ती दिली. कारण काय, तो ठरला पाच पांडवांचा बाप! पाच पांडवांना दर्जेदार शाळेत घातले. तर चार मुलींना साध्या शाळेत घातले. बघा किती भेदभाव. धाकट्या सुनेने याबाबत सासूला विचारले तर सासू म्हणाली, पोरींना शहाणपण आल्यानंतर त्यांचे लगेच उरकून टाकायचे. पोरी शिकून काय दिवे लावणार? सासूचे हे बोलणे धाकट्या सुनेला खूप टोचत असे. मुली हुशार होत्या. त्यांच्या शाळेतील शिक्षिका तिला सांगत होत्या, मुली हुशार आहेत. त्यांना चांगल्या शाळेत घाला. मुली मोठ्या होणार आहेत. 

धाकट्या सुनेने घरी विषय काढला. मुलींना चांगल्या शाळेत घालण्याबद्दल आग्रह धरला. घरातील सर्वांनी तिचे सांगणे उडवून लावले. तिचा नवरा गरीब स्वभावाचा़ तिने नवºयाला सांगितले, आपण आपल्या वाट्याला आलेली मालमत्ता विकू आणि माझ्या माहेरी जाऊन राहू. तेथे मुलींना चांगले शिक्षण देऊ. नवरा तयार नव्हता. पण कसाबसा तयार झाला. पडत्या किमतीला मालमत्ता विकून ते सर्वजण माहेरी जाऊन राहिले. तिने मुलींना चांगल्या शाळेत घातले. किरकोळ नोकरी-चाकरी करीत दोघाही  नवरा-बायकोंनी जिद्दीने मुलींना शिकवले.

इकडे ‘पाच पांडव’ घरात सर्वांच्या लाडात वाढत होते. नेहमी कौतुक होत असल्याने हे पाच पांडव फारच शेफारले होते. तिकडे त्या मुलींची शिक्षणाची ‘सुपरफास्ट एक्स्प्रेस’ वेगाने धावत होती. इकडे पाच पांडवांची शिक्षणाची ‘पॅसेंजर’ रखडत-रखडत कशीबशी चालली होती. आई-बापदेखील आपल्या पोरांना शिकून काय करायचे आहे? धंद्यावर तर बसायचे आहे, असे म्हणून मुलांच्या शिक्षणाबद्दल अनास्था दाखवत राहिले.  

इकडे त्या चार मुलींनी शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेतलेली होती. चारही मुली उच्चशिक्षित झाल्या. बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागल्या. पुण्याला एकाच गृहसंकुलात चारही मुलींनी फ्लॅट घेतले. आई-वडिलांसाठीदेखील त्याच संकुलात फ्लॅट घेतला. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाले. इकडे मात्र ‘पांडव नगरी’त पाच पांडवांचा अक्षरश: धुमाकूळ चालू होता. आज पांडवांचे वृद्ध आई-वडील स्वत:च्याच घरात ‘वनवासी’ म्हणून दिवस कंठत आहेत. इकडे मात्र फक्त मुलीच असलेले ते आई-वडील सुखा-समाधानात डुंबत आहेत. त्यांना मिळालेले जावई देखील तेवढेच भले आणि कर्तृृत्ववान आहेत. 
एका प्रख्यात इंग्रजी लेखकाने लिहिले आहे; त्याचे मराठी भाषांतर असे, मुलगा हा मुलगा असतो तो बायको येईपर्यंत. परंतु मुलगी ही मुलगी असते संपूर्ण आयुष्यभर.
सांगा, मुलगा पाहिजे का मुलगी? 
- अ‍ॅड. धनंजय माने

Web Title: When Pandavas become Kauravas ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.