वजन वाढल्याने लॉकडाऊनच्या काळात वाढल्या गुडघादुखीच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:44 PM2020-12-22T12:44:14+5:302020-12-22T12:45:42+5:30

वाढलेले वजन प्रमुख कारण : गुडघ्यावर वाढला ताण

Weight gain increased knee pain complaints during lockdown | वजन वाढल्याने लॉकडाऊनच्या काळात वाढल्या गुडघादुखीच्या तक्रारी

वजन वाढल्याने लॉकडाऊनच्या काळात वाढल्या गुडघादुखीच्या तक्रारी

googlenewsNext
ठळक मुद्देगुडघेदुखी अधिक जाणवू लागल्यावर रुग्णांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजेज्येष्ठ नागरिकांनी विश्रांती घ्यावी, जमिनीवर मांडी घालून किंवा पाय मुडपून बसू नये

सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना घरातच बसावे लागले होते. या काळात वजन वाढल्यामुळे अनेकांना गुडघेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

कोरोना महामारीमुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. सतत घरात बसून राहिल्याने ज्येष्ठ नागरिकांमधून तक्रारी वाढल्या आहेत. घराबाहेर पडावे तर कोरोनाची भीती होती त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पाय मोकळे करण्याची संधीच मिळाली नाही. या कारणामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना आता गुडघेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे अनेक आजारांकडे दुर्लक्ष झाले. कोरोना हा एकमेव आजार समोर असल्याने नागरिकांनी इतर आजारांना मनावर घेतले नाही.

लॉकडाऊनमध्ये व्यायाम करत नसले तरी खाणे पूर्वीसारखेच होते. खाण्यामुळे निर्माण झालेल्या कॅलरीज न घटल्यामुळे वजनात वाढ झाली. सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढू लागला.

वजनावर हवे नियंत्रण

वजन वाढणे हा चिंताजनक आजार आहे. वजन नियंत्रित न ठेवल्यास सांध्याची झीज लवकर होते. वयस्क लोकांना याचा अधिक त्रास होतो. गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी आदी तक्रारी वाढत जातात. वजन जास्त असणे हे आजाराचे प्रमुख कारण आहे. तसेच इतर अनेक आजारांना निमंत्रण देते. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील अस्थिरोग विभागाच्या ओपीडीत रोज १५० ते २०० रुग्ण उपचारांसाठी येत असल्याचे डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. सुनील हंदराळमठ यांनी सांगितले.

गुडघादुखीची अशी घ्यावी काळजी

गुडघेदुखी अधिक जाणवू लागल्यावर रुग्णांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी विश्रांती घ्यावी, जमिनीवर मांडी घालून किंवा पाय मुडपून बसू नये. शक्यतो खुर्चीवर बसावे, पायाचा विशिष्ट व्यायाम करावा. व्यक्तीचे वय लहान असताना अपघात होणे, संधिवात होणे, युरिक ॲसिड वाढलेले असणे, सोरायटिक ॲथ्रायटिस असणे या कारणांमुळे गुडघेदुखी होऊ शकते; पण गुडघा झिजल्यानंतर झालेली गुडघेदुखी साधारणपणे वयाच्या साठीनंतरच डोके वर काढते.

कोट

लॉकडाऊनमध्ये घरी राहिल्याने अनेकांनी व्यायाम केला नाही. त्यामुळे काही जणांचे वजन १० किलोने वाढले आहे. या वाढलेल्या वजनाचा भार हा गुडघ्यावर पडतो त्यामुळे गुडघेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. आता थंडी आल्यामुळे गुडघेदुखी असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.

 

- डॉ. सुनील हंदराळमठ, अस्थिरोगतज्ज्ञ

-------

Web Title: Weight gain increased knee pain complaints during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.