आई माझा गुरु... शेतात केलेल्या कष्टाचं झालं चिज; UPSC परीक्षेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या हर्षलनं व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 08:58 PM2019-10-26T20:58:10+5:302019-10-26T20:58:34+5:30

'आजपतोर केलेल्या कष्टाचं मोल झालं. पोरानं मोठं नाव काढलं.'

UPSC IES 2019 Final Result Announced; Mechanical engineering top 10 rankers are Bhosale Harshal Dnyaneshwar | आई माझा गुरु... शेतात केलेल्या कष्टाचं झालं चिज; UPSC परीक्षेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या हर्षलनं व्यक्त केल्या भावना

आई माझा गुरु... शेतात केलेल्या कष्टाचं झालं चिज; UPSC परीक्षेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या हर्षलनं व्यक्त केल्या भावना

googlenewsNext

- मल्लिकार्जुन देशमुखे

मंगळवेढा:  पाच वर्षांचा असतानाच वडिलांचं छत्र हरपलं... आईनंच सारं केलं. तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं.. प्रसंगी शेतात काबाडकष्ट करताना आईच्या हातावरील फोडं आज हे सारं आठवताना डोळ्यांतील अश्रू दाटताहेत. वडिलाविना पोर म्हणून त्याचं शिक्षण अपूर्ण राहता कामा नये यासाठी तिनं घेतलेल्या कष्टाचं चिज झाल्याच्या भावना आयईएस परीक्षेत भारतातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविलेल्या तांडोरसारख्या (ता. मंगळवेढा) छोट्याशा गावातल्या हर्षल भोसले यानं ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

हर्षल पाच वर्षांचा असताना त्याचे वडील वारले. त्यानंतर आईने शेती करून हर्षलचे शिक्षण पूर्ण केले. त्याचे शालेय शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा, नववी ते दहावी माध्यमिक आश्रमशाळा देगाव, डिप्लोमा गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक बीड, डिग्री गव्हर्न्मेंट कॉलेज, कराड येथे पूर्ण झाल्यानंतर भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई येथे एक महिन्याचे ट्रेनिंग घेऊन राजीनामा दिला.

त्यानंतर ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, पुणे येथे त्याची निवड झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (इंजिनिअर सर्व्हिसेस) प्रिलीम जानेवारी महिन्यात व मेन्स परीक्षा जून महिन्यात दिली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखत झाली. शुक्रवार, २५ आॅक्टोबर रोजी निकाल लागला अन् हर्षलने देशात पहिला येण्याचा मान मिळविला. 

आपल्या गावचा तरुण प्रतिष्ठित अशा परीक्षेत उत्तीर्ण होऊन यशाला गवसणी घातल्याचं अप्रूप सा-यांनाच असल्याचं जाणवलं. ऐन दिवाळीत ही गोड बातमी समजताच शनिवारी तांडोर ग्रामस्थ व मित्रमंडळींकडून फटाक्यांची आतषबाजी करुन व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृहात ग्रामपंचायतीतर्फे माजी सरपंच रामचंद्र मळगे यांच्या हस्ते हर्षलचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी दयानंद सोनगे, नागनाथ कोळी, केराप्पा मळगे, मेजर मळगे, नवनाथ कांबळे, तानाजी गायकवाड, अहमद शेख, इसाक मिस्त्री, ग्रामस्थ उपस्थित होते.

पोरानं नाव काढलं
- पाच वरसाचा असल्यापास्रं सांभाळलं.. शाळंत गुरुजीकडून पोरगं लई हुशार हाय म्हनून सांगायचे. ऐकून लई आनंद व्हायचा. म्हणून हर्षलला लई मोठा साह्येब बनल्याचं बगायचं होतं. आजपतोर केलेल्या कष्टाचं मोल झालं. पोरानं मोठं नाव काढलं. 
- कमल भोसले, हर्षलची आई

हर्षल भोसले संपूर्ण भारतातून यूपीएससी इंजिनिअरिंग परीक्षेत पहिला आला. ही आम्हा तांडोर ग्रामस्थांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या या ऐतिहासिक निकालामुळे तांडोर गावाच्या नावलौकिकात भर पडली आहे. भविष्यात तांडोर गावात असेच अधिकारी निर्माण व्हावेत म्हणून तांडोर ग्रामपंचायतीतर्फे स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालय चालू करुन संदर्भ पुस्तके युवकांना उपलब्ध करुन देऊ.
- रामचंद्र मळगे, माजी सरपंच, तांडोर

मी सामान्य कुटुंबातून जि.प शाळेत व माध्यमिक शिक्षण आश्रमशाळेत घेऊन इंजिनिअरिंग सरकारी कॉलेज कराड येथे पूर्ण करून पहिल्या प्रयत्नात इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस परीक्षेत भारतातून पहिला  आलो. त्याबद्दल मला माझ्या आईचे आशीर्वाद व ग्रामस्थांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे मी हे यश प्राप्त करु शकलो.
- हर्षल भोसले, तांडोर.

ग्रामस्थांनी पेढे वाटून केला आनंदोत्सव
गावात दिवाळीत ही गोड बातमी येताच तांडोर ग्रामस्थांतर्फे व मित्रमंडळीकडून आतषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शनिवार २६ ऑक्टोबर रोजी माजी सरपंच रामचंद्र मळगे व ग्रामस्थांतर्फे हर्षल भोसलेचा यशवंत सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला.

Web Title: UPSC IES 2019 Final Result Announced; Mechanical engineering top 10 rankers are Bhosale Harshal Dnyaneshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.