अशिक्षित आईनं पतीच्या निधनाचे दु:ख पचवून मुलाला पाठवलं परीक्षेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:01 AM2020-03-06T11:01:55+5:302020-03-06T11:05:51+5:30

बालभारती कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाºया अनिलकुमार मादगुंडीची ही हेलावून टाकणारी करुण कहाणी

An uneducated mother sent her child to the test after grieving her husband's death | अशिक्षित आईनं पतीच्या निधनाचे दु:ख पचवून मुलाला पाठवलं परीक्षेला

अशिक्षित आईनं पतीच्या निधनाचे दु:ख पचवून मुलाला पाठवलं परीक्षेला

Next
ठळक मुद्देघरातील कर्ते असलेल्या विलास यांच्या आकस्मिक निधनामुळे एकच आक्रोश सुरू झालाअक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीत अनिलकुमारने वडिलांवर अग्निसंस्कार केलेअनिलकुमारचे वडील हे टॉवेल कारखान्यात काम करत होते तर आई उमा मादगुंडी या विडी कामगार आहेत

शीतलकुमार कांबळे 
सोलापूर : बाळा, तुझे वडील आता आपल्या सर्वांना सोडून गेलेत. आपल्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय...बारावीचा तुझा आज शेवटचा पेपर आहे; पण बेटा तू धीरानं घे, पेपर बुडवू नको...परीक्षा दे; मग आपण तुझ्या बाबांना निरोप देऊ...जिजाचा आयुष्याचा जोडीदार गेला. कपाळावरचं सौभाग्याचं लेणं पुसलं गेलं. ती अशिक्षित आई अत्यंत वेदनादायी स्थितीतही आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल सजग होती...आईच्या खंबीरपणामुळे मुलालाही बळ आलं अन् दु:खाचा डोंगर अंगावर पेलून त्या धीट मुलानं परीक्षेचं ओझं उलथवून लावलं...अर्थशास्त्राचा पेपर दिल्यानंतर त्यानं गुरुवारी दुपारी वडिलांवर अंतिम संस्कार केले.

बालभारती कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाºया अनिलकुमार मादगुंडीची ही हेलावून टाकणारी करुण कहाणी...अनिलकुमारचे वडील विलास मादगुंडी हे टॉवेल कारखान्यातील कामगार. त्यांना गुरुवारी पहाटे हृदयविकाराचा धक्का बसला अन् त्यांची प्राणज्योत मालवली. अनिलकुमार त्यावेळी बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तयारी करीत होता; पण आजची पहाट मादगुंडी परिवारावर दु:खाचा पहाड घेऊन कोसळली..

घरातील कर्ते असलेल्या विलास यांच्या आकस्मिक निधनामुळे एकच आक्रोश सुरू झाला...पण त्या माऊलीने अर्थात अनिलकुमारच्या आईनं स्वत:चं  दु:ख काही क्षणापुरतं लगेचच बाजूला सारलं अन् मुलाच्या शिक्षणासाठी ती मानसिक पातळीवर खंबीर झाली..आपल्या पतीनंतर भविष्यात मादगुंडी परिवाराचा गाडा अनिलकुमारलाच हाकायचा असल्यामुळे तो शिक्षणसंपन्न झालाच पाहिजे, यासाठी तिने मुलाची समजूत काढली...पहाटेपासून सकाळी १०.४५ वाजेपर्यंत अनिलकुमार हा आई आणि बहिणीसोबतच दु:खात सामील होता; पण आईच्या खंबीरपणामुळे त्यानं परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मामानंही त्याला आईचं सांगणं ऐकण्याचा सल्ला दिला. मग लगेचच त्याने पेपर देण्यासाठी लागणारं साहित्य घेतलं अन् अनिलकुमार परीक्षा केंद्रावर पोहोचला...दोन वाजेपर्यंत पेपर लिहून त्याने थेट घर गाठलं. दरम्यान, घराजवळ नातेवाईक, शेजारचे जमले. अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीत अनिलकुमारने वडिलांवर अग्निसंस्कार केले.

अनिलकुमार हुशार अन् कष्टाळू विद्यार्थी
- अनिलकुमारचे वडील हे टॉवेल कारखान्यात काम करत होते तर आई उमा मादगुंडी या विडी कामगार आहेत. हे काम करतच कुटुंबाचा चरितार्थ चालतो. घराला आपलाही हातभार लागावा म्हणून अनिलकुमार हा कपडे शिलाईचे काम करतो. महाविद्यालयातून घरी आल्यानंतर अभ्यासासोबतच तो शिलाईचे काम करतो. दहावीमध्ये तो प्रथमश्रेणीतून उत्तीर्ण झाला. त्याची बहीण देखील पदवीचे शिक्षण घेत आहे. आई जरी अशिक्षित असली तरी आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्याचे ध्येय असल्याने तिने मुलाला धीर देत परीक्षेला पाठविले.

अश्रू ढाळतच परीक्षा केंद्रावर दाखल
आई आणि मामांनी समजाविल्यानंतर अनिलकुमार परीक्षा केंद्रावर अश्रू ढाळतच आला. आपल्या शिक्षकांना त्याने वडिलांचे निधन झाल्याचे सांगितले. परीक्षा देण्याची तयारीही दाखविली. शिक्षकांनी त्याची अवस्था पाहून धीर दिला. तुझ्यावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. हीच तुझ्या परीक्षेची खरी वेळ आहे. परीक्षा देणे ही वडिलांना श्रद्धांजली वाहिल्यासारखेच आहे. अर्थशास्त्राचा पेपर झाल्यानंतर तो रडतच परीक्षा केंद्रातून बाहेर आला. बालभारती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आय. एस. मुल्ला, संस्थेचे सचिव शब्बीर शेख, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रिजवान शेख, शिक्षक संतोष गायकवाड यांनी परीक्षा केंद्रावर अनिलकुमारला धीर दिला.

Web Title: An uneducated mother sent her child to the test after grieving her husband's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.