उजनीचे पाणी चोरणारे आता सोलापूरच्या हिश्‍श्‍याची औषधेही पळवू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 02:48 PM2021-05-14T14:48:21+5:302021-05-14T14:48:27+5:30

भाजप नेत्यांचा इशारा : दोन दिवसांत ऑक्सिजन अन् रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत न झाल्यास न्यायालयात दाद मागू

Ujani's water thieves now started stealing drugs from Solapur | उजनीचे पाणी चोरणारे आता सोलापूरच्या हिश्‍श्‍याची औषधेही पळवू लागली

उजनीचे पाणी चोरणारे आता सोलापूरच्या हिश्‍श्‍याची औषधेही पळवू लागली

Next

सोलापूर : सोलापूरकरांच्या वाट्याचे पाणी सोडणारे ‘पुणेकर’ आता सोलापूरच्या हिश्‍श्‍याची औषधेदेखील पळवताहेत, असा आरोप करत सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. पुढील दोन दिवसांत सोलापूर जिल्ह्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत न झाल्यास महाविकास आघाडी सरकारविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारादेखील भाजप नेत्यांनी दिला.

महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारविरोधात भाजप नेत्यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. औषधाअभावी निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा यावेळी भाजप नेत्यांनी दिला. बहुतांश भाजप नेत्यांचा रोष उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात दिसला.

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी पालकमंत्र्यांना बालकमंत्री म्हणून संबोधले. माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात भाजपचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे महाविकास आघाडीमधील नेते सोलापूरवर अन्याय करत आहेत. चांगल्या सेवा सुविधा देत नाहीत, असा आरोप केला. उपोषण ठिकाणी आमदार राजेंद्र राऊत यांनी सरकारविरोधात जोरदार टीका केली. ते आक्रमकपणे बोलले.

रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा दाखवून देताना पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील तफावत आकड्यांनिशी दाखवून दिली. दुपारी १२ वाजेदरम्यान सोलापूर जिल्ह्यातील दोन खासदार, तसेच आठ आमदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनमगेटजवळ एकवटले. महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला. महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘अरे... या महाविकास आघाडी सरकारचं करायचं काय... खाली मुंडी वर पाय,’ अशा जोरदार घोषणा भाजप नेत्यांनी यावेळी दिल्या.

पूनमगेटवर पाऊणतासाचे लाक्षणिक उपोषण संपवून भाजप नेते जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन द्यायला त्यांच्या कार्यालयात गेले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला. भाजप खासदार आणि आमदारांचे म्हणणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विभागीय आयुक्तांच्या कानावर घातले. विभागीय आयुक्तांना फोन लावून भाजप नेत्यांशी संवाद घडवून आणला. विभागीय आयुक्तांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर भाजप नेत्यांनी उपोषण मागे घेतले.

यावेळी सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, समाधान आवताडे, राजेंद्र राऊत आदी आमदार, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख व जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आनंद तानवडे आदी उपस्थित होते.

.......................

काय आहेत मागण्या

सोलापूरला रोज ६० टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मागणीच्या तुलनेत सोलापूरला रोज ४० ते ४५ टन ऑक्सिजनचा पुरवठा होतोय. त्यामुळे रोज ६० टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा. यासोबत रुग्णांच्या तुलनेत सोलापूरला रेमडेसिविर इंजेक्शनचा मुबलक पुरवठा व्हावा. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अँटिजन टेस्ट किट आणि लसींचा पुरवठा व्हावा, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले.

आ. राऊत म्हणाले, मुख्य सचिवांना लावा फोन

शिष्टमंडळ जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला त्यांच्या कार्यालयात गेले, त्यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. सोलापूरला कोरोना औषधांचा पुरवठा सुरळीत करू, अशी फक्त ग्वाही न देता शब्द द्या, अशी मागणी आमदारांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी विभागीय आयुक्तांना फोन लावतो, आपण त्यांच्याशी संपर्क करूयात मार्ग काढू, असे बोलले. त्यावर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे विभागीय आयुक्तांना नको, थेट राज्याच्या मुख्य सचिवांना फोन लावा, त्यांच्याशी बोलतो. त्यावर शंभरकर यांनी जास्त न बोलता विभागीय आयुक्तांना फोन लावला. जिल्हाधिकाऱ्यांच्या फोनवरून आ. राऊत यांनी संवाद साधला. त्यांच्या मागण्यांचे निवेदन केले. विभागीय आयुक्तांनी सोलापूरवर अन्याय होणार नाही, असे सांगितले. औषधांचा सुरळीत पुरवठा करू. पुन्हा आंदोलन करण्याची गरज भासणार नाही, असे सांगितले.

Web Title: Ujani's water thieves now started stealing drugs from Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.