एकविसाव्या शतकात ओळखली स्त्रीनं स्वत:ची शक्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:46 AM2019-07-11T10:46:04+5:302019-07-11T10:47:55+5:30

शीलाताई मिस्त्री : लोकमत सखी मंच, धूत सारीज, राजमुद्रा लाईफ स्टाईल, शाहू शिक्षण संस्था आयोजित सखी सन्मान सोहळा, आठ सेवाव्रतींचा झाला सन्मान

The twenty-first century woman identified herself with power | एकविसाव्या शतकात ओळखली स्त्रीनं स्वत:ची शक्ती 

एकविसाव्या शतकात ओळखली स्त्रीनं स्वत:ची शक्ती 

Next
ठळक मुद्देलोकमत सखी मंच आणि धूत सारीज, राजमुद्रा लाईफ स्टाईल, शाहू शिक्षण संस्था प्रस्तुत सखी सन्मान दिमाखदार सोहळा‘लोकमत’चे संस्थापक आणि थोर स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन ‘लोकमत’ने आजपर्यंत समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचे कलागुण व काम पाहून स्त्री सखी सन्मान पुरस्कार दिला

सोलापूर: एकविसाव्या शतकात स्त्रीने स्वत:ची शक्ती ओळखली आहे. ती आपल्या अधिकारांसाठी झगडणेही शिकली आहे. आजच्या स्त्रीने हे सिद्ध केले आहे़ आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करीत आहे, त्यामुळे स्त्री सशक्त आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही़ ‘लोकमत’ने केलेल्या लोकमत सखी सन्मान सोहळ्याने खºया अर्थाने स्त्री शक्तीचे दर्शन झाले, त्याचा सन्मान झाल्याचं मत सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा शीलाताई मिस्त्री यांनी व्यक्त केले.

लोकमत सखी मंच आणि धूत सारीज, राजमुद्रा लाईफ स्टाईल, शाहू शिक्षण संस्था प्रस्तुत सखी सन्मान दिमाखदार सोहळा मंगळवारी श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात मोठ्या जल्लोषात पार पडला, यावेळी शीलाताई मिस्त्री बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ़ रोहिणी देशपांडे, बी़ के. एंटरप्रायझेसच्या माधुरी पाटील, श्री धूत सारीजचे पुरुषोत्तम धूत, शोभा धूत, जनकल्याण मल्टिस्टेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशाताई हजारे, शाहू शिक्षण संस्थेच्या अनुराधाताई ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘लोकमत’चे संस्थापक आणि थोर स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना मिस्त्री म्हणाल्या की, आज सखी सन्मान सोहळ्यात सोलापूर, उस्मानाबाद व लातूर येथील ज्यांना पुरस्कार मिळाला त्या प्रत्येक स्त्रींनी आपापल्या क्षेत्रात योग्य व जिद्दीने काम केले आहे़ समाजात वावरत असताना कोणाचीही पर्वा न करता फक्त समाजसेवेचे व्रत अंगी बाळगले़ सखींनो आयुष्यात खूप काही मिळविण्यासाठी परिश्रमाला फार महत्त्व आहे. त्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले.

‘लोकमत’ने आजपर्यंत समाजातील विविध क्षेत्रातील महिलांचे कलागुण व काम पाहून स्त्री सखी सन्मान पुरस्कार दिला़ या पुरस्कारामुळे सखींना खºया अर्थाने समाजात यापुढे जगण्यासाठी खरी दिशा व उमेद मिळाली असल्याचे मत महाराष्ट्र स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ़ रोहिणी देशपांडे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वर्षा चिटणीस, शारदा बंडगर, निकिता भट्टड, माधवी उप्पीन, श्रद्धा अध्यापक, आरती वागावकर, रंजना माने यांनी सहकार्य केले़ कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी मानले. या सोहळ्यासाठी सोलापूर, उस्मानाबाद, लातूर शहर-जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर, सखी मंचच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित  होत्या.

या पुरस्कार सोहळ्यासाठी सोलापूर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांनी प्रस्ताव पाठविले होते़ या आलेल्या प्रस्तावातून निवड समितीने विविध विभागातील महिलांच्या कामांची पडताळणी करून पुरस्कारासाठी घोषणा केल्याचे यावेळी सांगण्यात आले़

सरीवर सरी कार्यक्रमाने आणली रंगत
- या ‘सखी सन्मान सोहळा-२०१९’च्या निमित्ताने पुरस्कार वितरणापूर्वी संदीप काळे निर्मित अनघा काळे, औरंगाबाद प्रस्तुत हिंदी, मराठी गीतांचा ‘सरीवर सरी’ हा बहारदार कार्यक्रम झाला़ आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या गाण्यांनी सभागृह विठ्ठलमय झाले होते़ भावपुष्पे, भावभक्ती, नाट्यगीताने चांगलीच रंगत आणली़ विठ्ठल आवडी प्रेमभाव, विठ्ठल़़़ विठ्ठल़़़ झाल्या तिन्ही सांजा़़़ करुनी शृंगार माझा़..वाट पाहते मी गं येणार साजन माझा़़़ निशाना तुला दिसला ना़़़ माऊली़़़ माऊली़़़ रूप तुझे़़़ आदी भक्तीगीतांना श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ 

यांचा झाला सन्मान.....
- या दिमाखदार लोकमत सखी सन्मान पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते डॉ़ संजीवनी केळकर, सांगोला (सामाजिक), सहायक पोलीस निरीक्षक सोनाली पाटील, सोलापूर (शौर्य), गंगासागर श्ािंदे, उस्मानाबाद (क्रीडा), डॉ़ अरुणा राठोड, हिंगोली (आरोग्य), माया सिद्धे, सोलापूर (व्यवसाय), उषा शिंदे, लातूर (शिक्षण), दर्शना देशमुख, लातूर (साहित्यिक), मंगलताई शहा, पंढरपूर (जीवनगौरव) या सखींना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले़ यावेळी पुरस्कारप्राप्त सेवाव्रतींना लाल रंगाचे फेटे बांधण्यात आले होते़ 

लोकमत सखी सन्मान सोहळा पुरस्कार विजेत्यांच्या प्रतिक्रिया
कोणतेही काम करीत असताना तो एकटा किंवा ती एकटी करीत नसते़ त्याला त्याचे मित्र, मैत्रिणी, घरातील मंडळी साथ व मदत करीत असतात़ आमच्या संस्थेने काम करीत असताना समाजातील प्रत्येक घटकातील स्त्रियांना पुढे घेऊन जाण्याचे काम केले़ महिला सबलीकरण, बचत गटाच्या माध्यमातून उद्योगांची निर्मिती, स्वयंरोजगार निर्मितीवर भर दिला़ संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांना स्वावलंबी बनविण्याचे काम केले़ ‘लोकमत’ने सखी सन्मान पुरस्कार देऊन माझाच नव्हे माझ्याबरोबर काम करणाºया प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला आहे़ ‘लोकमत’चे शतश: आभाऱ
- डॉ़. संजीवनी केळकर, पंढरपूर

पोलीस खात्यात काम करीत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते़ समाजात घडणाºया अप्प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस सतत दक्ष असतात़ पोलीस खातं तसं सातत्याने शिव्या खाणारं खातं असे मी मानते़ या क्षेत्रात काम करीत असताना माझ्या कार्याची माहिती घेऊन ‘लोकमत’ने दिलेला सखी सन्मान पुरस्कार मला देऊन आणखीन जास्तीचे काम करण्याची ऊर्जा दिली आहे़ आता स्त्रियांनी फक्त स्वतंत्र असणे हे महत्त्वाचे राहिलेले नाही तर स्वत:चे स्वातंत्र्य मिळविणे आणि जपणे हाच खरा लढा आहे, असे म्हणायला हरकत नाही. 
- सोनाली पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, सोलापूर

मी लहानपणापासून क्रीडा क्षेत्रात काम करण्याचं ठरवलं होतं़ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आटापाट्या या खेळात मी राज्य, विभागीय व जिल्हास्तरावरील विविध पदके प्राप्त केली आहेत़ सध्या आटापाट्या हा खेळ महाराष्ट्रात फारसा दिसत नाही़ माझ्या यशात माझ्या मैत्रिणी, मार्गदर्शक शिक्षक, कुटुंबातील मंडळींसह माझ्या संघात काम करणाºया खेळाडूंचा मोलाचा वाटा आहे़ लोकमतसारख्या मोठ्या परिवारानं मला हा पुरस्कार देऊन माझ्या खेळाची उंची वाढविली आहे, त्याबद्दल मी ‘लोकमत’ची कायम आभारी आहे़ 
- गंगासागर शिंदे, उस्मानाबाद, राष्ट्रीय खेळाडू, आटापाट्या़

मी आरोग्य केंद्रात काम करीत असताना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे गेले आहे़ ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रात काम करणं चांगलं मानलं जात नाही़ तरीही वडिलांच्या प्रोत्साहनाने मी आरोग्य क्षेत्रात काम करण्याचे धाडस केले़ काम करीत असताना अनेकांनी या माझ्या कामात मदत केली. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य सेवा पुरविण्यात मला यश आले़ माझ्या या यशात माझे वडील, पती, ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली़ त्यामुळेच मी या क्षेत्रात चांगले काम करू शकले़ ‘लोकमत’ने केलेला सन्मान म्हणजे खºया अर्थाने आणखीन चांगले काम करण्याची ऊर्जा दिली़
- अरुणा राठोड, वैद्यकीय, हिंगोली

लोकमत परिवारानं आज माझा जो सन्मान केला आहे, त्याबद्दल खूप आनंद होतोय. ‘लोकमत’ची मी नियमित वाचक आहे. लोकमत हे राष्टÑीय पातळीवरचं दैनिक आहे. त्यांनी सखी मंचच्या माध्यमातून माझ्यासारख्या शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणासाठी मी करीत असलेल्या छोट्या-मोठ्या कामाची दखल घेऊन एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझा सन्मान केला. माझ्यासारख्या अनेक सखींना प्रोत्साहनाचे बळ देत सन्मान केला. आमच्या भावी वाटचालीसाठी हा सन्मान निश्चितच दिशादर्शक ठरेल.
- उषा शिंदे, लातूर

माझ्या कुटुंबाची परिस्थिती तशी चांगली आहे़ एकेदिवशी मला पैशाची गरज होती, त्यामुळे मी माझे पती यांना पैशाची मागणी केली असता त्यांनी मला नकार दिला़ त्यावेळी ठरवलं होतं की, आता यापुढे मी कुणालाच पैसे मागणार नाही़ त्या दिवसापासून व्यवसाय करण्याचा ध्येय ठेवले़ सुरुवातीला शेंगा विकण्याचा व्यवसाय सुरू केला़ कालांतराने हा व्यवसाय वाढत गेला़ त्यानंतर शेंगा चटणी विक्री सुरू केली़ त्यातही भरपूर फायदा झाला़ आज माझा व्यवसाय सातासमुद्रापार गेला आहे़ माझ्या व्यवसायात २० ते २५ महिला या काम करतात़ ‘लोकमत’ने माझ्या कार्याची दखल घेऊन दिलेला पुरस्कार कायम लक्षात राहणारा आहे़
- माया सिद्धे, व्यावसायिक, सोलापूर

आमची संस्था ही एड्सग्रस्त बालकांसाठी काम करणारी संस्था आहे़ आमच्या संस्थेत १५० हून अधिक लहान मुलांसह महिलांचा देखील समावेश आहे़ आमच्या संस्थेने आजपर्यंत वेगळे काम करून समाजात नेहमीच चांगली कामगिरी केली आहे़ पालवी संस्थेच्या माध्यमातून वंचित, दुर्बल, तळागाळातील स्त्रियांना सन्मान देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनविण्याचे काम केले़ ‘लोकमत’ने केलेला आजचा हा सन्मान आमच्या संस्थेच्या वाटचालीत माझ्याबरोबर काम करणाºया सर्वांचा हा सन्मान आहे़ या पुरस्कारानं आमच्यावरची जबाबदारी आणखी वाढली आहे. गेल्या काही वर्षापासून आमच्या संस्थेकडून केलेल्या कामाची पोहचपावतीच जणू ‘लोकमत’ सखी सन्मान अवार्डच्या रुपाने आम्हाला मिळाली आहे. आगामी काळात नक्कीच नवं काहीतरी करण्याची उर्मी या पुरस्कारातून मिळाली आहे.
मंगलताई शहा, पालवी संस्था, पंढरपूर

Web Title: The twenty-first century woman identified herself with power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.