मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद नको; गनिमी काव्याने आंदोलन करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 11:12 AM2020-09-16T11:12:19+5:302020-09-16T11:12:27+5:30

सरकारशी लढणारच;  मराठा क्रांती मोर्चाची भूमिका

Solapur district should not be closed for Maratha reservation; Let's agitate with guerrilla poetry | मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद नको; गनिमी काव्याने आंदोलन करु

मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्हा बंद नको; गनिमी काव्याने आंदोलन करु

googlenewsNext

सोलापूर : कोरोनामुळे सर्व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा बंद पुकारल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. गोरगरीब शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे लोकांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी फिजीकल डिस्टन्सिंग पाळून साखळी मोर्चा काढणे, गनिमी काव्याने आंदोलने करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी दिली. आमची लढाई सरकारशी आहे. न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी सरकारवर दबाव वाढवू, असेही त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक मंगळवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी  शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक अमोल शिंदे, दास शेळके, सुनील रसाळे, श्रीकांत घाडगे, तुकाराम मस्के, मिलिंद भोसले, विजय पोखरकर, अमोल भोसले, वाय.पी. पवार, संजय शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


दिलीप कोल्हे म्हणाले, मराठा आरक्षणात शासन कुठे कमी पडले याची समिक्षा होणे आवश्यक आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तीने आरक्षणासाठी आत्महत्या करणे, जीव धोक्यात घालू नये. समाजातील आणखी बळी आपल्याला नको आहेत. आपल्याला ही लढाई नेटाने पुढे न्यायची आहे. समाजातील कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये याची काळजी सर्वांना घ्यायची आहे. परंतु, समाजाच्या प्रश्नाची तीव्रता शासनाला लक्षात यावी यासाठी गनिमी काव्याने आंदोलन करावे. समाजाचा पुन्हा एकदा मोर्चा काढायचा. फिजीकल डिस्टिन्सिंग पाळून हा मोर्चा काढण्यात यावा. मागील मोर्चावेळी सर्व समाजाने मराठा समाजाला साथ दिली होती. कोरोनाच्या अडचणीच्या काळात बंद केल्यास इतर समाजाचेही नुकसान होणार आहे. मराठा समाज हा आपल्या न्याय हक्कासाठी लढायला मागे सरकणार नाही, मात्र इतरांचे नुकसान होऊ देणार नाही, असेही कोल्हे म्हणाले.
 
उद्या पुन्हा बैठक
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे. समाज बांधवांनी या बैठकीला हजर राहावे, असे आवाहन प्रताप चव्हाण आणि तुकाराम मस्के यांनी केले.
 
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न...
मराठा समाजातील तरुणांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाकडून होत असल्याचा आरोप राम जाधव आणि किरण पवार यांनी केला. आम्ही समाजासाठी आंदोलन करतोय. पण पोलिसांकडून आम्हाला नाहक त्रास दिला जात आहे. याविरुध्द आवाज उठविण्यात येणार असल्याचे जाधव आणि पवार यांनी सांगितले. 

Web Title: Solapur district should not be closed for Maratha reservation; Let's agitate with guerrilla poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.