Siddaram Mhatre discusses tea with BJP leaders | सिद्धाराम म्हेत्रे यांची भाजप नेत्यांसमवेत चाय पे चर्चा
सिद्धाराम म्हेत्रे यांची भाजप नेत्यांसमवेत चाय पे चर्चा

ठळक मुद्देअक्कलकोट येथे आमदार सिद्धाराम म्हेत्रे व भाजप नेते, कार्यकर्ते यांच्यासमवेत एक तासभर ‘चाय पे चर्चा’ झाल्याने तालुक्यात याची चर्चा सुरू गेल्या दीड महिन्यापासून ‘चोरी चोरी, चुपके चुपके’ चालू असलेले राजकीय कार्यक्रम आता उघड होत आहेत.

अक्कलकोट : अक्कलकोट येथे आमदार सिद्धाराम म्हेत्रे व भाजप नेते, कार्यकर्ते यांच्यासमवेत एक तासभर ‘चाय पे चर्चा’ झाल्याने तालुक्यात याची चर्चा सुरू आहे. गेल्या दीड महिन्यापासून ‘चोरी चोरी, चुपके चुपके’ चालू असलेले राजकीय कार्यक्रम आता उघड होत आहेत. त्यामुळे आजच्या घटनेवरून आ. म्हेत्रे यांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उघड झाले आहे.

सोमवारी सकाळी अचानकपणे ए-वन चौकातील जुन्या बँक आॅफ इंडियासमोर खुर्च्या टाकण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला याची कोणालाच माहिती नव्हती. टप्प्याटप्प्याने भाजप व काँग्रेसचे काही नेते, पदाधिकारी आले. त्यानंतर आ. सिद्धाराम म्हेत्रे, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय तानवडे, अक्कलकोटच्या नगराध्यक्षा शोभा खेडगी यांचे पती शिवशरण खेडगी, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, झेडपीचे पक्षनेते आनंद तानवडे, नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे, शिवसिद्ध बुळळा, गुरुसिद्ध प्रचंडे, प्रमोद मोरे यांच्यासह मल्लिकार्जुन पाटील, महेश इंगळे, अमोल भोसले, विलास गव्हाणे, सिद्धार्थ गायकवाड, जयहिंदचे बब्रुवान माने-देशमुख, सद्दाम शेरीकर, एजाज मुतवल्ली, वकील बागवान, रईस टिनवाला, काशिनाथ गोळ्ळे, विश्वनाथ भरमशेट्टी आले.

ए-वन चौकातील ‘चाय पे चर्चा’ योगायोगाने: तानवडे
शहरातील ए-वन चौकातील ए-वन हॉटेलसमोर भाजप नेत्यांबरोबर भाजपच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे आमदार यांच्याबरोबर ‘चाय पे चर्चा’ नियोजित नसून ही योगायोगाने घडलेली घटना असल्याचे मत जिल्हा परिषदेचे पक्षनेता आनंद तानवडे यांनी व्यक्त केले आहे.

अक्कलकोट शहरात शिवा संघटनेचा मेळावा मल्लिकार्जुन मंदिर परिसरत आयोजित केला होता. त्या मेळाव्याच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली निघाली होती. त्या रॅलीचे स्वागत करून रॅलीत सहभागी होण्याकरिता ए-वन चौकात पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम बिराजदार व विद्यमान सदस्य विलास गव्हाणे हे दोघे ए-वन चौकातील ए-वन हॉटेलमध्ये चहा घेत असताना तुकाराम बिराजदार यांना भाजप नेत्यांच्या फोनवरून तुम्ही कुठे आहात, अशी विचारणा झाली. त्यावेळी भाजपचे नेते दत्ता तानवडे, शिवशरण खेडगी यांच्यापाठोपाठ भाजपचे अनेक जण ए-वन चौकात जमा झाले असता, त्याचवेळी विलास गव्हाणे यांना देखील आमदार म्हेत्रे यांचा फोन आला. कुठे आहात ए-वन चौकात असल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, जयहिंदचे बब्रुवान माने देशमुख, अशी एकेक नेतेमंडळी एकत्रित आली. त्याअगोदर चहाची आॅर्डर देण्यात आली होती. योगायोगाने आलेल्या सर्व नेतेमंडळींना चहा देण्यात आला. चहा घेत असतानाच राजकीय चर्चेला उधाण आले.

शिवा संघटनेच्या रॅलीच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या नेत्यांबरोबर लोकांचीही गर्दी वाढत गेली. त्यामुळे काँग्रेसचे आमदार म्हेत्रे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असल्याने योगायोगाने आज घडलेली ‘चाय पे चर्चा’ ही घटना सोशल मीडियावर वाºयासारखी पसरल्याने चर्चेला आणखीनच उधाण आले. परंतु ही ‘चाय पे चर्चा’ नियोजित नसून योगायोग असल्याचे पक्षनेते आनंद तानवडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


Web Title: Siddaram Mhatre discusses tea with BJP leaders
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.