शिवसेना-काँग्रेस शरण.. भाजपचे विजयाचे तोरण; कुटुंब धर्माला प्राधान्य देणाºयांचे एकमेकांवर आरोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 10:58 AM2019-12-05T10:58:48+5:302019-12-05T11:01:00+5:30

सोलापूर महापालिकेत महाआघाडी फसली; कुरघोडींच्या राजकारणाचा भाजप वगळून सर्वच पक्षांना फटका; शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, माकपचे सदस्य तटस्थ

Shiv Sena-Congress asylum .. BJP's victory streak; Two accused of giving priority to family religion! | शिवसेना-काँग्रेस शरण.. भाजपचे विजयाचे तोरण; कुटुंब धर्माला प्राधान्य देणाºयांचे एकमेकांवर आरोप !

शिवसेना-काँग्रेस शरण.. भाजपचे विजयाचे तोरण; कुटुंब धर्माला प्राधान्य देणाºयांचे एकमेकांवर आरोप !

Next
ठळक मुद्देशिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी महापौर निवडीत भाजपला मतदान केलेउपमहापौर निवडीत महाआघाडीचा धर्म म्हणून काँग्रेस उमेदवाराला मतदान केलेबसपाच्या स्वाती आवळे यांनी महापौर आणि उपमहापौर निवडीत भाजपला मतदान केले

राकेश कदम 

सोलापूर : शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांनी तर उपमहापौरपदाच्या निवडीत राजेश काळे यांनी सहज विजय मिळविला. यन्नम यांनी एमआयएमच्या तर काळे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेसच्या नेत्यांनी वाजत-गाजत महाआघाडी केली होती. मात्र कुरघोड्यांच्या राजकारणात हे दोन्ही पक्ष भाजपला शरण गेल्याचे पाहायला मिळाले. 

महापौर व उपमहापौर निवडीसाठी बुधवारी सकाळी ११.३० वाजता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सभेला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी काम पाहिले. त्यांना झेडपीचे मुख्य वित्त व लेखाधिकारी महेश आवताडे, नगरसचिव रऊफ बागवान यांनी सहकार्य केले.

महापौरपदासाठी यन्नम यांच्याविरुद्ध शिवसेनेकडून सारिका पिसे, काँग्रेसच्या फिरदोस पटेल, एमआयएमच्या शाहजिदाबानो शेख यांनी अर्ज दाखल केले होते. महाविकास आघाडीने शिवसेनेच्या सारिका पिसे यांची उमेदवारी निश्चित केली होती. परंतु, पिसे यांच्यासोबतच काँग्रेसच्या फिरदोस पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. एमआयएमच्या सदस्यांनी ही निवड बिनविरोध न करता निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय जाहीर केला. श्रीकांचना यन्नम यांना ५१ मते मिळाली. शाहजिदाबानो शेख यांना ८ मते मिळाली. शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, माकपचे ३९ सदस्य तटस्थ राहिले. चार सदस्य गैरहजर होते. 

सेना-बसपाच्या नगरसेवकांचे भाजपला मतदान 
- शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी महापौर निवडीत भाजपला मतदान केले तर उपमहापौर निवडीत महाआघाडीचा धर्म म्हणून काँग्रेस उमेदवाराला मतदान केले. बसपाच्या स्वाती आवळे यांनी महापौर आणि उपमहापौर निवडीत भाजपला मतदान केले. 

महाआघाडीत अशी झाली बिघाडी 
भाजप विरुध्द महाविकास आघाडी करण्याचा निर्णय झाला तेव्हा एमआयएमच्या नगरसेवकांनी सोबत येण्याची तयारी दाखविली. परंतु, हैदराबाद येथील नेत्यांनी तटस्थ राहण्याचे आदेश दिले. शिवसेना आणि काँग्रेसच्या काही नगरसेवक भाजपला सामील होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे आणि इतर दोघांनी कुटुंब धर्म म्हणून भाजपला मदत करायची तयारी दाखविली. त्यातून महाआघाडीचे बहुमत होईल की नाही, याबद्दल शंका होती. सभागृहात आल्यानंतरही तीच परिस्थिती राहिली. 

उपमहापौर निवडीतही  बसपा भाजपसोबत
- उपमहापौरपदासाठी भाजपचे राजेश काळे, नागेश वल्याळ, काँग्रेसच्या फिरदोस पटेल, नरसिंग कोळी, शिवसेनेचे भारतसिंग बडूरवाले, अमोल शिंदे, एमआयएमच्या तस्लीम शेख, शाहजिदाबानो शेख, राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. सहा जणांनी माघार घेतली. काळे, पटेल आणि तस्लीम शेख यांच्यात लढत झाली. राजेश काळे यांना ५०, शेख यांना आठ तर पटेल यांना ३४ सदस्यांनी पाठिंबा दर्शविला. काळे यांना भाजपच्या ४९ सदस्यांसह बसपाच्या स्वाती आवळे यांनी पाठिंबा दिला. पटेल यांना काँग्रेसच्या १३, राष्ट्रवादीच्या चार, शिवसेना १७ सदस्यांनी पाठिंबा दिला. मतदान होण्यापूर्वी शिवसेनेचे दोन सदस्य बाहेर पडले.

माझ्या पक्षाने मला न्याय दिला. सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम करेन. रस्ते, पाणी, ड्रेनेजच्या समस्या प्राधान्याने सोडवेन. विरोधी पक्षालाही सोबत घेऊन काम करेन. 
- श्रीकांचना यन्नम, महापौर.

भाजपने एका आदिवासी समाजातील कार्यकर्त्याला उपमहापौरपदाची संधी दिली. आमच्यात कोणतीही गटबाजी नाही. मी पक्षासाठी आणि शहराच्या विकासासाठी काम करेन. 
- राजेश काळे, उपमहापौर. 

काल दोन मालकांची बँकेत बैठक झाली. तिथे आमच्या उमेदवाराला पाडायचे कट शिजले. काँग्रेसच्या सदस्यात एकी नव्हती. शिवसेनेतही एकी नसेल तर आमच्या घरातील उमेदवार आम्ही पराभूत का होऊ द्यायचा. इकडे एक बोलायचे मागे एक करायचे, असे सुरू होते. म्हणून आमच्या उमेदवाराने माघार घेतली.
- अमोल शिंदे, नगरसेवक, शिवसेना.

आम्हाला विश्वासात न घेता सारिका पिसे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. एमआयएमला साथ देण्याऐवजी मी समविचारी भाजपच्या सदस्याला पाठिंबा दिला. माझे मत मी वाया जाऊ दिले नाही. उपमहापौर निवडीत मी महाआघाडीच्या निर्णयानुसार उपमहापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला.
- राजकुमार हंचाटे, नगरसेवक, शिवसेना.

  • एकूण १०२ सदस्य
  • महापौर निवड :
  • श्रीकांचना यन्नम    - ५१
  • शाहजिदाबानो शेख    - ८
  • तटस्थ     - ३९
  • गैरहजर     - ४
  • उपमहापौर निवड
  • राजेश काळे    - ५०
  • तस्लीम शेख    - ८
  • फिरदोस पटेल    - ३४
  • तटस्थ    - ४
  • गैरहजर    - ६

Web Title: Shiv Sena-Congress asylum .. BJP's victory streak; Two accused of giving priority to family religion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.