Sharad Pawar : पळपुट्या नेत्यांविरुद्ध संघर्षाची सुरुवात सोलापुरातूनच, पवारांनी सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 02:46 PM2021-10-08T14:46:01+5:302021-10-08T14:48:30+5:30

Sharad Pawar : अनेक वर्ष पक्षात महत्त्वाची पदं भूषवलेले अनेक नेते पक्ष सोडून पळून गेले. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता होती. त्यावेळी या पळपुट्या नेत्यांविरोधात संघर्ष करण्याची गरज होती.

Sharad Pawar : The struggle against the fugitive leaders started from Solapur, Pawar said | Sharad Pawar : पळपुट्या नेत्यांविरुद्ध संघर्षाची सुरुवात सोलापुरातूनच, पवारांनी सांगितलं राजकारण

Sharad Pawar : पळपुट्या नेत्यांविरुद्ध संघर्षाची सुरुवात सोलापुरातूनच, पवारांनी सांगितलं राजकारण

Next
ठळक मुद्देकोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सोलापूरला आलो होतो. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधींना घेऊन सोलापूरमध्ये बैठक घेतली होती.

सोलापूर/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे निर्माते खासदार शरद पवार हे 2 दिवसीय सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरात येताच त्यांनी कोरोना कालवधीत घेतलेल्या बैठकीची आणि विधानसभा निवडणुकांच्या आठवणी जागवल्या. तसेच, राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेलेल्या नेत्यांना आता घरी बसवायचं आहे, असे म्हणत सोलापूरातून आपण संघर्षाची सुरूवात केली होती, याची आठवणही पवारांनी सांगितली.  

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सोलापूरला आलो होतो. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधींना घेऊन सोलापूरमध्ये बैठक घेतली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आज सोलापूरमध्ये येण्याचा योग आला. सोलापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याबद्दल प्रशासन, राज्य सरकार आणि आरोग्य कर्मचारी यांना धन्यवाद द्यायला हवे, असे पवार यांनी म्हटले.

तसेच, आणखी एक गोष्ट सोलापूरच्या निमित्ताने आठवली. विधानसभेच्या निवडणुकीआधी सोलापूर जिल्ह्यात अनेक नेत्यांची पळापळ सुरू होती.अनेक वर्ष पक्षात महत्त्वाची पदं भूषवलेले अनेक नेते पक्ष सोडून पळून गेले. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता होती. त्यावेळी या पळपुट्या नेत्यांविरोधात संघर्ष करण्याची गरज होती. तो निर्णय आम्ही घेतला व त्या संघर्षाची सुरुवात याच हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहातून केली. माझे पहिले भाषण येथेच झाले होते. त्यावेळी चर्चा होती की, भाजपचेच सरकार येणार. पण, आज राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण आत्मविश्वासाने लढल्याची आठवण पवार यांनी सोलापुरात करून दिली. 

पाहुण्यांची चिंता वाटत नाही

शरद पवारांनी सोलापुरात जबरदस्त बॅटिंग केली. काल अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण, पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असा टोला पवारांनी लगावला. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पवारांनी त्यांना सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) पाठवलेल्या नोटिशीची आठवण सांगितली. विधानसभा निवडणुकीआधी मला बँकेसंदर्भात ईडीची नोटीस आली होती. मी त्या बँकेचा सभासदही नव्हतो, ना त्या बँकेकडून मी कधी कर्ज घेतलं होतं. त्यानंतर काय झालं, ते सगळ्यांनी पाहिलं. मला ईडीची नोटीस दिली आणि सबंध महाराष्ट्रानं भाजपाला येडी ठरवलं, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान साधलं.

बंदमध्ये शांततेत सहभाग नोंदवा

लखमीपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर भाजपा नेत्याच्या मुलानं गाडी चढवल्याचा प्रकार घडला. त्यावरूनही पवारांनी जोरदार टीका केली. शांततेत निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपा नेत्यांनी गाड्या घातल्या; शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून एक प्रकारे त्यांची हत्याच केली, असा गंभीर आरोप पवारांनी केला. लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामध्ये सहभागी होऊन शांततेच्या मार्गानं निषेध नोंदवा, असं आवाहन त्यांनी केलं.
 

Web Title: Sharad Pawar : The struggle against the fugitive leaders started from Solapur, Pawar said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.