ईदच्या शिरखुर्म्यासाठी ड्रायफ्रूटची तर अक्षय तृतीयेसाठी हापूस आंब्यांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 03:57 PM2021-05-13T15:57:17+5:302021-05-13T15:57:28+5:30

मंड्याही बहरल्या : संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशीची शिथिलता

Purchase of dried fruits for Eid Shirkhurma and hapus mangoes for Akshay III | ईदच्या शिरखुर्म्यासाठी ड्रायफ्रूटची तर अक्षय तृतीयेसाठी हापूस आंब्यांची खरेदी

ईदच्या शिरखुर्म्यासाठी ड्रायफ्रूटची तर अक्षय तृतीयेसाठी हापूस आंब्यांची खरेदी

googlenewsNext

सोलापूर : शुक्रवारी एकाच दिवशी साजरा होणाऱ्या अक्षय तृतीया अन्‌ रमजान ईदनिमित्त साहित्य खरेदीसाठी बुधवारी बाजारपेठा ग्राहकांनी गजबजून गेल्या होत्या. शिरखुर्मा बनवण्यासाठी लागणाऱ्या ड्रायफ्रूट्‌सची मोठी विक्री झाली. अक्षय तृतीयेला आंब्यांचा मान असल्याने त्याचाही बुधवारी सुवास दरवळला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये ८ मेपासून १५ मेपर्यंत पूर्णत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, रमजान ईद व अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त ११ व १२ मे रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेमध्ये भाजी मार्केट, किराणा दुकान व भुसार मालाच्या दुकानांना खरेदी-विक्रीसाठी सुटी देण्यात आली होती. शहरातील कस्तुरबा मंडई, सुपर मार्केट, रेल्वे स्टेशन येथील भाजी मंडई, दमाणी नगर येथील भाजी मंडई, ७० फूट रोडवरील भाजी मंडई, लक्ष्मी मार्केट आदी छोट्या-मोठ्या भाजी मंड्या सकाळी ७ वाजल्यापासून सुरू करण्यात आल्या होत्या.

खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली होती. लोक भाजीपाला मोठ्या प्रमाणात खरेदी करत होते. भाजी मार्केट व परिसरातील किराणा दुकान व भुसार मालाच्या दुकानातून लोक मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य भरत होते. रमजाननिमित्त मुस्लीम बांधव मालाची खरेदी करत होते, तर दुसरीकडे अक्षय तृतीयेनिमित्त आंबे व अन्य फळे खरेदी करत होते. सकाळी १०.४५ नंतर हळूहळू गर्दी ओसरण्यास सुरुवात झाली.

११ वाजताच बाजारपेठा झाल्या बंद

शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये असलेल्या मंड्या व किराणा - भुसार मालाच्या दुकानाच्या परिसरात संबंधित अधिकारी व कर्मचारी सकाळी ७ वाजल्यापासून गर्दीवर लक्ष ठेवून होते. वेळोवेळी व्यापाऱ्यांना व नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन करीत होते. दुचाकी व चारचाकी वाहनांना भाजी मार्केट असलेल्या परिसरात प्रवेश देत नव्हते. नागरिकांना वारंवार मास्क तोंडावर लावण्याचे आवाहन करीत होते. पावणेअकरा वाजताच संबंधित पोलीस ठाण्याची वाहने बाजारपेठ व भाजी मंडई परिसरात फिरून दुकाने बंद करण्यास सांगत होते.

Web Title: Purchase of dried fruits for Eid Shirkhurma and hapus mangoes for Akshay III

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.