Maharashtra Election 2019; लोकशाही उत्सवात मतदान गरजेचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:56 PM2019-10-15T12:56:09+5:302019-10-15T12:58:35+5:30

देशाचे भवितव्य आपल्या मतावर अवलंबून आहे. तरी सर्वांनी प्रतिज्ञा करू ‘मी मतदान करणारच’...

Need to vote at democracy festival ... | Maharashtra Election 2019; लोकशाही उत्सवात मतदान गरजेचे...

Maharashtra Election 2019; लोकशाही उत्सवात मतदान गरजेचे...

googlenewsNext

आपली लोकशाही बळकट, सदृढ व सक्षम करण्यासाठी, देशाच्या विविधांगी विकासाला चालना देण्यासाठी, गती देण्यासाठी देशाचा नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावावा़ निवडणुकीत आपल्या जाती-पातीचा, धर्माचा उमेदवार आहे़ या भावनिकतेत अडकून पडू नका़ ना जातीवर ना धर्मावर बटन दाबा कार्यावऱ या सर्वांपेक्षा देश मोठा आहे.

आपल्या देशाची अनेक गोष्टींपैकी जमेची बाब म्हणजे ‘लोकशाही’. या लोकशाहीला बळकट करणारी प्रणाली म्हणजे ‘मतदान’. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. ‘जनतेचे राज्य’ ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जाते. योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे. निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे.

‘भारत निवडणूक आयोगाची’ स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. त्यानिमित्ताने दरवर्षी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून देशभरात राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा, बळकट लोकशाहीतील मोठा सहभाग नोंदवता यावा, सर्वसामान्य लोकांना लोकशाही विषयी आकर्षण व्हावे, मतदानाच्या हक्काची, जबाबदारीची जाणीव व्हावी, मतदानावरच देशाचे हित व विकास अवलंबून आहे हे कळावे हा यामागील उद्देश आहे. 

लोकशाहीमध्ये केवळ हक्काला महत्त्व देऊन चालणार नाही. तर जबाबदारीला महत्त्व आहे. मतदान हा आपला हक्क तर आहेच पण ती आपली जबाबदारी देखील आहे. हे समजून घेऊन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून देशाचे कायदे, नियम, शिस्त यांचे पालन केले पाहिजे. प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सकारात्मक मतदान करून लोकशाही सुदृढ आणि बळकट करणे ही आपली जबाबदारी आहे. भारताची राज्यघटना तयार करताना देशातील प्रत्येक नागरिकास मतदानाचा हक्क असावा असे धोरण ठरवले.

लोकशाहीत मतदाराला ‘राजा’ असं म्हटलं जातं. मतदारांनी आपण ‘राजा’ आहोत हे विसरू नये. आपल्या मतदानाच्या हक्काचा वापर करायला हवा. आपल्या एका मतामुळे काय होणार आहे? हा विचार सोडून मतदान करावे. अनेक जण मतदानास जाण्याचे टाळतात. सुट्टीचा दुरुपयोग करतात. आपले एक मत देशासाठी अमूल्य आहे याची जाणीव ठेवून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. संविधानाने जो मताचा अधिकार आपल्याला दिला आहे. तो काही गोष्टींच्या प्रभावाला बळी पडून विकू नका. कारण ही वेळ प्रत्येक पाच वर्षांनी येते. त्यामुळे जो तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करेल, अशा सक्षम, योग्य पात्रतेच्या उमेदवारालाच मतदान करा. अंगीकृत विचार आणि कार्यावर ठाम असणारा, कुठल्याही वादळ वारं आणि प्रलोभनांनी विचलित न होणारा, निस्पृह, प्रतिबद्ध, आत्मविश्वासाने ओतप्रोत, नेतृत्वावर गाढ श्रद्धा आणि राष्ट्र हाच देव हा भाव जगणारा असा माणूस निर्माण करणारी सध्या अस्तित्वात असलेली एकमेव रचना म्हणजे मतदान प्रक्रिया.. मतदारांनी तुम्हाला बरोबर घेऊन लोकशाही मार्गाने जाईल व विचार करेल त्यालाच मतदान करणे गरजेचे आहे. 

मतदान १००% होण्यासाठी जी व्यक्ती मतदान करणार नाही ही त्यांच्या काही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करायलाच हव्यात. निवडणुकीच्या ओळखपत्राचा वापर वेगवेगळ्या कामासाठी करत असतात परंतु प्रत्यक्षात जेव्हा मतदान करण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्याकडे पाठ फिरवली जाते. ते मतदान करतील अशी काही व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. या महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. तेव्हा आपले मत नोंदवणे महत्त्वाचे आहे. कारण देशाचे भवितव्य आपल्या मतावर अवलंबून आहे. तरी सर्वांनी प्रतिज्ञा करू ‘मी मतदान करणारच’...
(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत)

Web Title: Need to vote at democracy festival ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.