Migration to Railway Police Post at Solapur Railway Station | सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे पोलीस चौकीचे होणार स्थलांतर
सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे पोलीस चौकीचे होणार स्थलांतर

ठळक मुद्देभारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे स्थानकलवकरच खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक होणार

सुजल पाटील

सोलापूर : भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या मध्य रेल्वेच्यासोलापूर रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेला बाधा ठरणाºया रेल्वे पोलीस चौकीचे स्थलांतर होणार आहे़ यासाठी लवकरच खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़
भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाच्या विशेष योजनेतून सोलापूर रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे विस्तारीकरण, प्रवेशद्वारासमोर आकर्षक पोर्च,  वाहन पार्किंगसाठी व्यवस्था,  रिक्षा थांबविण्यासाठी रकाने,  प्रवेशद्वारासमोर बागबगीचा आदी विकासकामे करण्यात आली़ त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात भर पडली असून सोलापूर रेल्वे स्थानक देशातील सर्व प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे़ अशात स्थानकाच्या डाव्या बाजूला असलेल्या आरक्षण केंद्रासमोरील रेल्वे पोलीस चौकी स्थानकाच्या सुंदरतेला बाधा आणत असल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आले.

दरम्यान,  चौकीसमोर होणारी गाड्यांची गर्दी, सातत्याने होणाºया वाहतुकीच्या कोंडीमुळे रेल्वे प्रशासनाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेली रेल्वे पोलीस चौकी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार रेल्वे प्रशासनाने महापालिका व शहर पोलीस आयुक्तालयास पत्रव्यवहार करून त्वरित स्थलांतर करून रेल्वेच्या जागेत नवी पोलीस चौकी स्थापन करावी अशी विनंती केली़ दरम्यान, महापालिका आयुक्त दीपक तावरे हे कार्यक्रमासाठी रेल्वे स्थानक परिसरात आले असता त्यांनी रेल्वे पोलीस चौकी परिसराची पाहणी केली़  त्यावेळी त्यांनीही चौकी स्थलांतर करण्यासाठी महापालिका सहकार्य करेल असे सांगितले होते; मात्र मागील काही दिवसांपासून हा प्रश्न मार्गी लागत नव्हता़ मंगळवारी सोलापूरचे खासदार डॉ़ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी रेल्वेच्या अधिकाºयांसोबत रेल्वेच्या विविध प्रश्नाबाबत बैठक घेतली़ त्या बैठकीत रेल्वे पोलीस चौकी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी खासदार महास्वामी यांना सांगितले़ त्यावेळी महास्वामी यांनी लवकरच सोलापूर महापालिका, शहर पोलीस आयुक्तालय व रेल्वेच्या अधिकाºयांची बैठक घेऊन निर्णय घेऊ असे सांगितले़ 

जागा अन् बांधून देण्याची जबाबदारी रेल्वेचीच
- रेल्वे पोलीस चौकी स्थलांतर करण्याचा अंतिम निर्णय झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे पोलीस चौकीला रेल्वे स्थानक परिसरातच जागा देण्यात येणार आहे़ याशिवाय चौकीसाठीचे बांधकाम व उभारणीचा खर्चही रेल्वे प्रशासन करणार आहे़ त्यासाठी सोलापूर महापालिका किंवा पोलीस आयुक्त कार्यालयास कोणत्याही प्रकारची व्यवस्था करावी लागणार नसल्याची माहिती माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल अधिकारी प्रदीप हिरडे यांनी दिली़

रेल्वेच्या विविध प्रश्नासंदर्भात परवाच रेल्वेच्या अधिकाºयांसोबत बैठक झाली़ त्या बैठकीत रेल्वे पोलीस चौकी स्थलांतर करण्याची अपेक्षा रेल्वेच्या अधिकाºयांनी माझ्यासमोर व्यक्त केली़ लवकरच पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त व  रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेता येईल़ प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याठिकाणी पोलीस चौकी असणे गरजेचेच आहे.
- डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार, सोलापूर

Web Title: Migration to Railway Police Post at Solapur Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.