गावगाड्याच्या लढतीत अनेकांना ‘थोडी खुशी, थोडा गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:03+5:302021-01-19T04:25:03+5:30

तालुक्यातील नातेपुते ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच ॲड. बी. वाय. राऊत यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला असून, एकही जागा मिळवता आली ...

'A little happiness, a little sadness' | गावगाड्याच्या लढतीत अनेकांना ‘थोडी खुशी, थोडा गम’

गावगाड्याच्या लढतीत अनेकांना ‘थोडी खुशी, थोडा गम’

Next

तालुक्यातील नातेपुते ग्रामपंचायतीमध्ये माजी सरपंच ॲड. बी. वाय. राऊत यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला असून, एकही जागा मिळवता आली नाही. मात्र, १७ जागा जनशक्ती विकास आघाडीचे नेते बाबाराजे देशमुख, माउली पाटील, कवितके, ठोंबरे यांच्या एकत्र आघाडीला मिळाल्या. मोरोची ग्रामपंचायतीत पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ यांचे पानिपत झाले, त्यांना एकही जागा मिळवता आली नाही. युवा आघाडीने १३ जागा मिळवत सत्तांतर घडविले.

महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या फोंडशिरस ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने १३ जागांवर विजय मिळविला. यापूर्वी ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर १ जागा विरोधकांना जिंकता आली. मांडवे येथे जयवंत पालवे गटाची सत्ता आली असून, ९ जागांवर विजयी झाले. यातील एक जागा चिठ्ठीद्वारे निवडण्यात आली, तर विरोधक तानाजी पालवे यांनी ८ जागा मिळविल्या, १० वर्षांनंतर सत्तेची चावी फिरली आहे.

कोंडबावीमध्ये विष्णू घाडगे यांना ६ जागा तर काकासाहेब घुले यांनी ५ जागा मिळवल्या. बिजवडी ग्रामपंचायतीमध्ये काट्याची टक्कर झाली. या ग्रामपंचायतीमध्ये चिठ्ठीने सत्ता दिली. रसिका भोरे यांची चिठ्ठी निघाली होती. गेल्या निवडणुकीतही चिठ्ठी केंद्रबिंदू बनली होती. या निवडणुकीमध्ये पॅनलप्रमुख मनोज शिंदे पराभूत झाले, तर त्यांची पत्नी मोठ्या फरकाने विजयी झाली. विरोधक आण्णासाहेब शिंदे यांना ३ जागा मिळाल्या.

रेडे ग्रामपंचायतीमध्येही सत्तातर झाले असून, श्रीराम विकास पॅनलने ८ जागा मिळवत राष्ट्रवादीच्या ताब्यात सत्ता दिली. चाकोरे ग्रामपंचायतीमध्ये जि. प. सदस्य राहुल वाघमोडे यांनी ८ जागा मिळवत सत्ता अबाधित ठेवली. विरोधक संजय पाटील यांना ३ जागा मिळवता आल्या. शिंदेवाडीमध्ये मल्हारी शिंदे, चंदू शिंदे यांच्या ग्रामविकास पॅनलला ७ जागा मिळाल्या, तर यापूर्वी ४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तांदूळवाडी ग्रामपंचायतीमध्ये नागेश काकडे, संभाजी निंबाळकर यांना ११ जागा मिळाल्या. विरोधक विजय पवार यांना ६ जागा मिळविता आल्या.

उंबरे-वेळापूर येथे श्रीराम पॅनलला २ जागा तर पोपट भोकले यांच्या जय हनुमान पॅनलला ७ जागा मिळाल्या. बोरगाव येथे प्रकाश पाटील यांची सत्ता आली असून, १२ जागा मिळाल्या तर राजकुमार पाटील यांना ३ जागा मिळाल्या. माळखांबी येथे प्रभाकर गमे यांच्या गटाला ८ तर महादेव कोडग यांना १ जागा मिळविता आली. गारवाड येथे अर्जुनसिंह मोहिते-पाटील गटाला ११ जागा मिळाल्या, तर विरोधकांचा दारूण पराभव झाला. विजयवाडी ग्रामपंचायतीमध्ये जय हनुमान पॅनलला ६ जागा मिळाल्या तर आप्पासाहेब इंगळे यांची सत्ता आली असून, यापूर्वी धवलसिंह मोहिते-पाटील यांनी ही ग्रामपंचायत बिनविरोध केली होती.

येळीव ग्रामपंचायतीत सिद्धनाथ ग्रामविकास पॅनलने सर्व जागांवर विजय प्रस्थापित केला आहे. बचेरी ग्रामपंचायतीत श्री संत सद्गुरू महाराज पॅनलला ८ जागा मिळाल्या असून, यापूर्वी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. तांबवे ग्रामपंचायतीत काका इनामदार गटाला ६ तर विरोधी दीपक साबळे गटाला ५ जागावर समाधान मानावे लागले. लोणंद ग्रामपंचायतीत जय हनुमान पॅनल राष्ट्रवादीचे हनुमंत रूपनवर यांना ६ जागा मिळाल्या तर विरोधकांना ३ जागा मिळवता आल्या.

विझोरी ग्रामपंचायतीत काट्याची टक्कर झाली असून, के. पी. काळे यांच्या गटाला ५ जागा मिळाल्या तर विरोधी पोपट काळे, बाळू काळे व नाना काळे यांच्या गटाला ६ जागा मिळाल्या. जळभावी ग्रामपंचायतीत जनसेवा ग्रामविकास पॅनलला सहा जागा मिळाल्या असून, आबा सुळ यांची सत्ता अबाधित राहिली, तर विरोधकांना तीन जागांवर समाधान मानावे लागले. मांडकी ग्रामपंचायतीत सुकुमार माने यांच्या गटाला आठ जागा तर विरोधी मोहिते-पाटील गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.

एकशिव ग्रामपंचायतीमध्ये शहाजी धायगुडे यांच्या गटाला ८ जागा तर भगवान रूपनवर गटाला दोन जागा मिळाल्या. यापूर्वी १ जागा बिनविरोध झाली होती. गिरवी ग्रामपंचायतीत संत बाळूमामा परिवर्तन आघाडीला ७ जागा मिळाल्या तर राऊत गटाला ३ जागा मिळाल्या. १ अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. दसूर ग्रामपंचायतीत दत्तू सावंत गटाने सत्ता काबीज केली. तोंडले ग्रामपंचायतीत श्रीनाथ विकास पॅनलला ६ तर विरोधकांना ३ जागा मिळाल्या आहेत. कुसमोड येथे महावीर धायगुडे यांच्या जय हनुमान व भैरवनाथ आघाडी पॅनलला ८ जागा मिळाल्या, तर विरोधकांना १ जागा मिळवता आली.

शेंडेचिंच येथे रणसंग्राम पॅनलला ५ जागा मिळाल्या असून, एक जागा बिनविरोध झाली, तर विरोधकांना एका जागेवर समाधान मानावे लागले. बोंडले ग्रामपंचायतीत विजय माने-देशमुख यांच्या नऊ जागा आल्या असून, आदिनाथ जाधव हे एका मताने विजयी झाले. विठ्ठलवाडी येथे श्रीराम विकास पॅनलला धनंजय देशमुख व सुदर्शन हंबिरे यांची पुन्हा सत्ता आली आहे. मळोली ग्रामपंचायतीत पंचायत समिती सदस्य रणजितसिंह जाधव यांची सत्ता अबाधित राहिली. पिरळे ग्रामपंचायतीत विष्णू नारायण पॅनलने सर्वच्या सर्व जागा मिळवल्या.

Web Title: 'A little happiness, a little sadness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.