भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापुरात वापरलेल्या वस्तूचा गंगा निवासात ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:35 PM2021-01-14T12:35:15+5:302021-01-14T12:35:21+5:30

तैलचित्राचे अनावरण होणार : महामानवाच्या शेवटच्या सोलापूर दौऱ्याचा आज अमृत महोत्सव

Keep the items used by Bharat Ratna Babasaheb Ambedkar in Solapur in Ganga Niwas | भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापुरात वापरलेल्या वस्तूचा गंगा निवासात ठेवा

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापुरात वापरलेल्या वस्तूचा गंगा निवासात ठेवा

googlenewsNext

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा सोलापूर शहर व जिल्ह्यात दौरा करून सभा घेतल्या. ते जेंव्हा शेवटचे सोलापुरात आले होते, त्याला आता ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. शेवटच्या भेटीत ते फॉरेस्ट येथील गंगा निवासमध्ये उतरले होते. त्यांच्या या भेटीत त्यांनी वापरलेल्या वस्तूंचा ठेवा आजही गंगा निवासने जपून ठेवला आहे.

सोलापुरात १४ जानेवारी १९४६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. यावेळी त्यांचे आदरातिथ्य करण्याचा मान हणमंतू सायण्णा गार्ड यांना मिळाला होता. त्यांनी त्यांच्या घरी म्हणजे गंगा निवास येथे बाबासाहेबांच्या राहण्याची सोय केली होती. गंगा निवाससारखे चांगले घर त्यावेळी आसपासही नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मद्रास मेलने सोलापुरात आले. समता सैनिक दलाच्या जवानांनी त्यांचे जंगी स्वागत केले. बाबासाहेबांना गंगा निवासमध्ये आणण्यासाठी हणमंतू गार्ड यांनी हिलमन कंपनीची कार आणली होती. या कारमध्ये बसून ते गंगा निवास येथे आले, अशी माहिती आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक दत्ता गायकवाड यांनी दिली.

सोलापूरच्या या भेटीत त्यांनी सावरकर मंडळाच्या तिळगूळ समारंभात भाषण केले. हे भाषण लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. मात्र, कोणत्याही पुस्तकात या भाषणाचा उल्लेख आला नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या भेटीत बाबासाहेबांनी रॅडिकल पार्टीच्या बैठकीत उपस्थिती लावली होती. सरकारी वकील अ‍ॅड. जी. आर. देशपांडे यांचे निधन झाल्याने बाबासाहेबांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर हरिभाई देवकरण शाळेतील मुळे सभागृहात जिल्हा लोकल बोर्ड, नगरपालिका यांच्यातर्फे त्यांना मानपत्र देण्यात आले. या भेटीमध्ये डॉ. बाबासाहेबांनी बी. सी. होस्टेल येथील दलित विद्यार्थी फेडरेशनच्या सभेत ५० हजारांहून अधिक सोलापूरकरांना मार्गदर्शन केले होते. या सभेस दादासाहेब गायकवाड, पा. ना. राजभोज यांची उपस्थिती होती. सभेत त्यांनी जीवप्पा ऐदाळे यांना निवडून देण्यासाठी आवाहन केले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सोलापुरातील गंगा निवास येथे येऊन ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. याअनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे या वास्तूचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात येत आहे. तिथे कोनशिलेचे अनावरण करण्यात येणार असल्याचे शहाराध्यक्ष अतुल नागटिळक यांनी सांगितले.

गंगा निवासमधील आठवणी

बाबासाहेबांनी गंगा निवासामध्ये वापरलेल्या वस्तू आजही जपून ठेवल्या आहेत. तांब्या, फुलपात्र, चमचा, ताट, डायनिंग टेबल आदी वस्तूंचा यात समावेश आहे. बाबासोहबांनी गंगा निवासात वास्तव्य केल्याचा गार्ड कुटुंबीयांना अभिमान आहे. त्यामुळे त्यांनी आजही हा ठेवा जपून ठेवला आहे. सध्या या घरामध्ये हणमंतू गार्ड यांचे नातू प्रशांत व प्रकाश हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत आहेत. गंगा निवास आत खूप जुने झाले आहे. या घराला आता डागडुजी करावी लागत आहे. शासनाने गंगा निवासाचा ठेवा जपण्यासाठी साहाय्य करण्याची गरज आहे.

बाबासाहेबांचा पदस्पर्श लाभल्याने ऐतिहासिकदृष्ट्या या घराचे विशेष महत्त्व आहे. आंबेडकरी चळवळीचा साक्षीदार म्हणून याकडे पाहता येईल. बाबासाहेबांचा सहवास लाभून या इमारतीला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा वारसा पुढेही जपणे आवश्यक आहे.

- दत्ता गायकवाड, सोलापूर, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक.

 

 

----------

 

फोटो - १२गंगा निवास, १२ गंगा निवास०१, १२ गंगा निवास०२, १२ चेअर

Web Title: Keep the items used by Bharat Ratna Babasaheb Ambedkar in Solapur in Ganga Niwas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.