जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
By आप्पासाहेब पाटील | Updated: November 2, 2025 05:41 IST2025-11-02T05:39:02+5:302025-11-02T05:41:31+5:30
हिमायतनगर (जि. नांदेड) येथील रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर ठरले शासकीय महापुजेचे मानाचे वारकरी

जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: आज कार्तिकी एकादशीचा सोहळा...यानिमित्ताने पंढरपुरात भाविकांचा उत्साह मोठा दिसून येत आहे. अशातच रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे अडीच वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नीक व पोटा ॥बू ।। (ता. हिमायतनगर जि. नांदेड) येथील रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर या मानाच्या वारकरी दाम्पत्यांकडून करण्यात आली.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, रोहयो मंत्री भरत गोगावले, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय महापूजेनंतर पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात झाली. आज एकादशी निमित्त मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्xयाच्या कानाकोपऱ्यातून पाच लाख भाविक दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पंढरपुरात चंद्रभागेच्या तिरी वारकरी आणि भक्तांची मांदियाळी पहायला मिळत आहे. हरी नामाचा जयघोष... मुखी विठ्ठल विठ्ठल नाम... म्हणून लाखो वारकरी चंद्रभागेच्या स्नानासाठी गर्दी केली आहे.