सातासमुद्रापार गणेशोत्सव; ‘आजोबा गणपती’ बोटीतून इंग्लंडला रवाना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 01:12 PM2020-08-03T13:12:21+5:302020-08-03T13:15:58+5:30

अनिवासी भारतीयांच्या घरी प्रतिष्ठापना; दोन वर्षांपासून मागणी, शंभर मूर्ती पाठविल्या

Ganeshotsav across the seas; 'Grandfather Ganpati' leaves for England by boat! | सातासमुद्रापार गणेशोत्सव; ‘आजोबा गणपती’ बोटीतून इंग्लंडला रवाना !

सातासमुद्रापार गणेशोत्सव; ‘आजोबा गणपती’ बोटीतून इंग्लंडला रवाना !

googlenewsNext
ठळक मुद्देमूर्तिकार मधुकर कोक्कूल यांनी बनविलेल्या आजोबा गणपतीच्या प्रतिकृतीला इंग्लंड येथील अनिवासी भारतीयांनी पसंती दर्शविली इंग्लंडमधील भारतीयांच्या सोशल मीडिया ग्रुपवर विविध गणेशमूर्ती व्हायरल झाल्या यंदा आजोबा गणपतीला सर्वाधिक मागणी आहे, देश-विदेशात असलेल्या भारतीयांची आपल्या संस्कृतीशी नाळ घट्ट आहे

यशवंत सादूल

सोलापूर : आगामी गणेशोत्सवासाठी सोशल मिडियातून या मूर्ती प्रदर्शित करून आॅनलाईन विक्री करण्याचा नवा पर्याय यंदा त्यांच्यासमोर आला असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे. लहान आकाराच्या गणेशमूर्तीमध्ये लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपती हे अधिक पसंतीचे आहेत. त्यासोबतच मागील दोन वर्षांपासून शहरातील श्रद्धास्थाने असलेल्या आजोबा गणपती, ताता गणपती, कसबा गणपती, पणजोबा गणपतीच्या लहान आकारातील मूर्तींची मागणी परदेशातही वाढत आहे. 

मूर्तिकार मधुकर कोक्कूल यांनी बनविलेल्या आजोबा गणपतीच्या प्रतिकृतीला इंग्लंड येथील अनिवासी भारतीयांनी पसंती दर्शविली असून शंभर गणेशमूर्ती मागविल्या आहेत, त्यासोबत ताता, कसबा, पणजोबा या मॉडेलच्या गणेशमूर्तीही आहेत.  इंग्लंडमधील भारतीयांच्या सोशल मीडिया ग्रुपवर विविध गणेशमूर्ती व्हायरल झाल्या असून, त्यात यंदा आजोबा गणपतीला सर्वाधिक मागणी आहे.
देश-विदेशात असलेल्या भारतीयांची आपल्या संस्कृतीशी नाळ घट्ट आहे. सर्व सण-उत्सव तेथे मोठ्या आनंदाने आणि श्रद्धेने साजरे होतात. गणेशोत्सवही असाच एकत्र येऊन साजरा केला जातो. त्यासाठी भारतातून ‘श्री’च्या मूर्ती आयात केल्या जातात. सोलापूरकरांचे श्रद्धास्थान आजोबा गणपतीने देखण्या रुपाने इंग्लंडवासीय भारतीयांवर भुरळ पाडली आहे. त्यामुळे ‘श्री’च्या शंभर मूर्ती बोटीने तिकडे निघाल्या आहेत.

‘जेएनपीटी’मधून मूर्ती निघाल्या...
सोलापुरातून ११ जुलैला विशेष पॅकिंगसह कंटेनरमधून निघालेल्या गणेशमूर्ती मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये दुसºया दिवशी पोहोचल्या. पुढे तेरा दिवसांचा मुक्काम गोदीतच होऊन चोवीस जुलै रोजी बोटीतून इंग्लंडला निघाल्या आहेत. साधारणत: एकवीस दिवसांचा प्रवास करून या मूर्ती १४ किंवा १५ आॅगस्टला इंग्लंडच्या केरिस्टो पोर्टमध्ये पोहोचणार आहेत. यार्कशायर  प्रांतातील वेगवेगळ्या शहरात असलेल्या भारतीयांच्या घरी जाऊन बाप्पा विराजमान होतील. गणेशमूर्ती भक्तांपर्यंत पोहोचायला  किमतीच्या चौपट खर्च येत असून येथील मूर्तिकार मधुकर कोक्कूल यांनी नाममात्र चारशे रुपयांत ही मूर्ती दिली असून,  त्याला सोळाशे रुपये खर्च येत आहे 


सोलापुरात असताना आजोबा गणपतीचे दर्शन होत असे. त्याची सुरेख लहान छबी सोशल मीडियावर पाहिली अन् येथील भक्तांना फार आवडले.त्यासाठी खास या मूर्ती मागविल्या असून यंदा इंग्लंडमधील भारतीयांच्या घरात सोलापूरचे आजोबा गणपती विराजमान होणार आहेत. 
- गजानन बोगम, अनिवासी भारतीय,लीड्स (इंग्लंड)

Web Title: Ganeshotsav across the seas; 'Grandfather Ganpati' leaves for England by boat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.