तज्ज्ञांचे मत; म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी पोस्ट कोविड तपासणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 01:58 PM2021-05-17T13:58:15+5:302021-05-17T13:58:20+5:30

  मधुमेह असणाऱ्या प्रत्येकांनी घ्यावी काळजी

Expert opinion; Post-covid examination is required to prevent mucormycosis | तज्ज्ञांचे मत; म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी पोस्ट कोविड तपासणी आवश्यक

तज्ज्ञांचे मत; म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी पोस्ट कोविड तपासणी आवश्यक

Next

सोलापूर : कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस आजार झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हा आजार होऊ नये म्हणून कोरोना होण्याआधीपासून ज्यांना मधुमेह होता अशा रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतर लगेच कान-नाक-घसा तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

एखाद्या रुग्णाला कोरोना झाल्यानंतर काही वेळेस डॉक्टर त्या रुग्णाला स्टेरॉईड देतात. यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतरही अशा रुग्णांना म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता असते. घरीच क्वारंटाईन असणारे रुग्ण किंवा रुग्णालयात ऑक्सिजन न लावलेल्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता खूपच कमी असते. ज्यांना हाय डोस स्टिरॉईड, ऑक्सिजन मास्क लावण्यात येतो त्यांनाच हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

जे एक महिन्याआधीच कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच त्यांना नाक-दात दुखणे, डोळ्यांतून पाणी येणे अशा समस्या नसतील तर त्यांनी म्युकरमायकोसिससाठी पुन्हा तपासणी करण्याची गरज नाही. पण, त्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य कसे राहील याची काळजी घेण्याची गरजेचे आहे. डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, नाक दुखणे, दात दुखणे अशी लक्षणे असल्यास म्युकरमायकोसिस हा आजार पुढे गेलेला असतो. हे होण्याआधीच मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

ऑक्सिजन मास्क किंवा पाईपमध्ये असू शकतो म्युकर

साधारणपणे ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना स्टेरॉईड दिले, ज्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला अशाच रुग्णांना म्युकरमायकोसिस होतो. रुग्णाला ऑक्सिजन देताना वापरण्यात येणाऱ्या ऑक्सिजन मास्क, ऑक्सिजनच्या नळी (पाईप) यामध्ये म्यूकर असू शकतो. म्हणून रुग्णालयांनी हे साहित्य निर्जंतुक करून वापरणे गरजेचे आहे.

 

कोरोना होण्याआधीच मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी कोरोनातून बरे झाल्यानंतरही तपासणी करून घ्यावी. कान-नाक- घसा तज्ञ हे दुर्बिणीच्या माध्यमातून रुग्णाला म्युकरमायकोसिसचा धोका आहे की नाही हे सांगू शकतात. आजार आधीच कळाला तर तो लवकर व कमी औषधांच्या वापराने बरा होतो.

- डॉ. जलील मुजावर, कान-नाक- घसा तज्ज्ञ

Web Title: Expert opinion; Post-covid examination is required to prevent mucormycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.