शिक्षण, रोजगार अन् आरोग्य व्यवस्थेत सुधारणा हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 04:27 PM2019-11-02T16:27:16+5:302019-11-02T16:31:41+5:30

सोलापूरकरांच्या नवीन सरकारकडून अपेक्षा;  जिल्हा पातळीवर स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू करावीत, उद्योगक्षेत्र वाढीस लावण्यासाठी जोरदार प्रयत्न हवेत

Education, employment and health care needs to be improved | शिक्षण, रोजगार अन् आरोग्य व्यवस्थेत सुधारणा हवी

शिक्षण, रोजगार अन् आरोग्य व्यवस्थेत सुधारणा हवी

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’ चमूने विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी या संदर्भात संवाद साधलासरकारने नेहमीच गोरगरीब आणि वंचितांचा विचार करूनच धोरण  आखले पाहिजेसध्या आरोग्य सेवा महागडी होत असून, सर्वसामान्यांना परवडणारी ही सेवा सरकारने अधिक दर्जेदार करायला हवी

सोलापूर : विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. महाराष्टÑातील जनतेच्या आकांक्षेप्रमाणे येत्या दोन-तीन दिवसांत सरकारही स्थापन होईल. पण या नवीन सरकारकडून आमच्या बºयाच अपेक्षा आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्राथमिक स्तरापासून दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हायला हव्यात. हेच शिक्षण जिल्हा परिषदांच्या शाळांमधूनही मिळावे. स्पर्धा परीक्षांची केंद्रे जिल्हा पातळीवर सुरू व्हावीत. पदवी संपादन केलेल्या युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण पातळीपासून सर्वच ठिकाणी शासकीय आरोग्य व्यवस्थेत आणखी सुधारणा करणे गरजेचे आहे, अशा अपेक्षा सोलापूरकरांनी नव्या सरकारकडून व्यक्त  केल्या आहेत.

‘लोकमत’ चमूने विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी या संदर्भात संवाद साधला असता त्यांनी या अपेक्षा व्यक्त केल्या. सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करतानाच विकासाकडे दुर्लक्ष व्हायला नको. सरकारने नेहमीच गोरगरीब आणि वंचितांचा विचार करूनच धोरण  आखले पाहिजे. सध्या आरोग्य सेवा महागडी होत असून, सर्वसामान्यांना परवडणारी ही सेवा सरकारने अधिक दर्जेदार करायला हवी, असेही सोलापूरकर म्हणाले.

आयुर्वेद पद्धतीने उपाययोजना शक्य
नवीन सरकारने आरोग्यविषयक समस्यांवर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील स्त्रियांच्या, बालकांच्या आरोग्यावर आयुर्वेद पद्धतीने उपाययोजना करता येणे शक्य आहे. आयुर्वेद दिनचर्या, पंचकर्म, योगासने, प्रतिबंधात्मक उपाय या माध्यमातून सर्वांनी अंगीकारला पाहिजे. यासाठी जिल्हा पातळीवर मार्गदर्शक उपक्रम सरकारने राबवायला हवे. यामुळे आरोग्यविषयक खर्च होणारा वेळ व पैसा यात निश्चित बचत होऊ शकेल़
- डॉ. स्वरूपांजली पवार, सोलापूर.

प्रत्यक्ष कामावर लक्ष द्यावे
शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतीत नवे प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सरकारने आश्वासने देणे कमी करून प्रत्यक्ष कामावर लक्ष द्यावे. ग्रामीण भागात रात्रीचे आठ तास वीज पुरविली जाते. शेतकºयांना रात्री जागरण करून पिकांना पाणी द्यावे लागते. हे टाळण्यासाठी ग्रामीण भागात पूर्णवेळ वीजपुरवठा करण्यात यावा. यामुळे ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल. 
- डॉ. विद्याधर सूर्यवंशी, सोलापूर

आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात
आरोग्यविषयक मूलभूत सुविधा सर्वत्र उपलब्ध नाहीत. विशेषत: ग्रामीण भागांमध्ये प्रत्येक गावात प्राथमिक उपचारासह प्रसूतीची सोय केली पाहिजे. महिलांच्या बाबतीत गर्भनिरोधक गोळ्या, सॅनेटरी नॅपकिन, मुलींसाठी मासिक पाळी संबंधित समस्यांवर उपचार व मार्गदर्शन, कॅन्सरच्या प्राथमिक निदानाची सोय आदी सुविधा मिळायला हव्यात. याकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची टीम व औषध आणि निदान सामुग्री मिळाली पाहिजे. त्यासाठी येणाºया सरकारकडून आरोग्य क्षेत्रामध्ये वाढीव निधी  देऊन भरीव कार्याची अपेक्षा आहे.
- डॉ. मंजूषा ननवरे, अवंतीनगर, सोलापूर

नव्या सरकारकडून अपेक्षा 
महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ यांना रोजगार देण्याचे दरवेळी नवे सरकार आश्वासन देते; मात्र पाळत नाही़ उलट मागील काही दिवसांत औरंगाबादसह काही शहरांमध्ये आॅटोमोबाईल कंपन्यांच्या शाखा बंद झाल्या आहेत़ उलट बेरोजगारी वाढली आहे़ हाताला काम असेल तर आजच्या पिढीचे भवितव्य आहे़ खूप शिकूनही भवितव्य अंधारात असेल तर अवघड आहे़ उलट कंपन्यांची संख्या वाढवून उद्योगाला चालना द्यावी आणि रोजगारही वाढवून बेरोजगारांची संख्या कमी करणे गरजेचे आहे़ 
- मेघा लंबे, सोलापूर

स्पर्धा परीक्षेबाबत नवे धोरण हवे
उच्च शिक्षणातल्या संधी, आधुनिक शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांबाबत सरकारने नवे धोरण आखणे गरजेचे आहे़ उच्च शिक्षणासाठी मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे़ तसेच शिष्यवृत्तीमधील घोटाळ्यांची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढून पारदर्शी कारभार आणावा़ प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंदे्र सुरू करावीत़ नोकरीची संधी मिळेपर्यंत निराधार योजनेच्या पार्श्वभूमीवर पदवीधरांना मानधन सुरू करावे़ तसेच आयटीआयसारख्या कौशल्य शिक्षणाचे प्रमाण वाढवावे़
- अस्मिता गायकवाड, सोलापूर

ग्रामीण भागाचा विकास होणे अपेक्षित
पाणी, वीज, रस्त्यांबाबत आजही महाराष्ट्र स्वयंपूर्ण नाही़ अनेक खेडी रस्त्यांअभावी जोडलेल्या अवस्थेत नाहीत़ काही शहरांत मेट्रो सिटी, स्मार्ट सिटीची योजना राबवित असताना ग्रामीण भागाला मागे ठेवणे अपेक्षित नाही़ या योजनांच्या धर्तीवर ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे़ तसेच आजही महाराष्ट्रात दुर्भिक्ष असते़ एकतर कोरडा दुष्काळ किंवा ओला दुष्काळ असा संकटांचा सामना करत असताना अशा संकटातून सावरण्यासाठी शेतकºयांबाबत चांगल्या आणि प्रभावी योजना राबवाव्यात़ त्याचे पुनर्वसन व्हावे़ 
- श्रीमंत ऐवळे, सोलापूर

नोकरभरतीचं काय झालं ?
नोकरभरतीवरील बंदी अनेक वर्षांपासूनची तशीच आहे़ शिक्षक भरती सुरू होईल, अशी केवळ चर्चा झाली. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही़ शिक्षणासह अनेक खात्यांमध्ये सर्वच प्रकारच्या जागा रिक्त आहेत़ पाच वर्षांत मेगाभरती राबविली पाहिजे़ ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबाचा उदरनिर्वाह आज शेतीवरच आहे. परंतु शेतीही संकटात असताना किमान त्या घरातील एकाला तरी छोटी-मोठी नोकरी असायला हवी़ बरेच तरुण वाईट मार्गाला लागत आहेत़ वेगवेगळ्या खात्यातील नोकर भरतीला सुरुवात करावी़ 
- सचिन कोलते, सोलापूर

कौशल्याधारित शिक्षण गरजेचे..
शेतकºयांसाठी कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलावीत. आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील गुणी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून द्याव्यात. आरोग्य विमा सक्तीचा करून आर्थिक दुर्बल घटकासाठी विशेष सोय करावी. सोलापूरसाठी नवीन जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर संपवून ते रुग्णालय लोकांच्या सेवेत द्यावे. कौशल्याधारित शिक्षणासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी.
- डॉ. अभिजित जगताप, वैद्यकीय अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सर्वात प्रथम रोजगाराचा प्रश्न सोडवा
येणारे सरकार कोणाचेही असो, त्यांनी रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वात आधी प्रयत्न करायला हवे. राज्यात सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. बेरोजगारीचा प्रश्न सुटला तर त्यामुळे उभे राहिलेले प्रश्न देखील सुटतील. आधीच्या सरकारने निराधारांसाठी चांगले काम केले आहे; मात्र त्याचा लाभ प्रत्येक निराधार व वंचित घटकाला झाला नाही. 
- सचिन काळे, बँक कर्मचारी, सोलापूर

औद्योगिक विकासाला प्राधान्य द्या...
सध्या राज्यात ओल्या दुष्काळाने थैमान घातले आहे. या परिस्थितीत शेतकºयांना सावरण्याचे सोडून सत्तेची खुर्ची कुणाची यावरुन वाद होत आहेत. शिवाजी महाराज- फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा त्यांनी सांगितलेल्या वाटेवर थोडेसे जरी चालता आले तरी पुरेसे आहे. यासोबतच औद्योगिक विकासात होणारी राज्याची पिछेहाट रोखण्यासाठी नव्या सरकारने ठोस पावले उचलायला हवीत.
- परशुराम कांबळे, समुपदेशक, सोलापूर

उद्योजकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात
यंत्रमाग उद्योजकांना बँकांकडून कर्ज मिळवण्यात अनेक अडचणी येतात़़ बँकांकडून त्वरित कर्ज पुरवठा व्हावा, याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे़ तसेच कर्जाच्या व्याजदरात सवलत मिळावी़ व्याजदर ५ टक्के इतका असावा़ याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा़ तसेच एमआयडीसी परिसरात पाणीपुरवठा होत नाही़ आम्हाला टँकरने पाणी विकत घ्यावे लागते.एमआयडीसी परिसरात नागरी सुविधा नाहीत़ उद्योजकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात़
- मल्लिकार्जुन कमटम, यंत्रमाग उद्योजक, सोलापूर

पेन्शन सुरू करण्याला प्राधान्य द्यावे..
तेलंगणा सरकारने वयोवृद्धांना प्रतिमहिना दोन हजार रुपये पेन्शन सुरू केली आहे़ याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील निराधार, श्रमिक तसेच गरीब वयोवृद्धांना प्रतिमहिना दोन हजार रुपये पेन्शन लागू करावी. सोलापुरात विडी महिला कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्वांना ही पेन्शन योजना लागू करावी़ तसेच सोलापूरला होणारा पाणीपुरवठा अशुद्ध आहे़ सध्या खासगी वितरकांकडून शुद्ध पाणीपुरवठा सुरू आहे़ त्याचा मोठा बिझनेस झाला आहे़ सरकारने अशी शुद्ध अर्थात मिनरल पाणीपुरवठा केंदे्र सुरू करावीत़ 
- अ‍ॅड. श्रीनिवास कटकूर, सामाजिक कार्यकर्ते, 

सोलापुरात रोजगार निर्माण व्हावा
सोलापुरात रोजगार निर्माण व्हावा़ याकरिता सर्वप्रथम सोलापुरात उद्योग उभारावेत़ सोलापुरात उद्योग निर्माण झाल्यास बेरोजगारी थांबेल़ युवकांना रोजगार मिळेल आणि पुण्या-मुंबईकडे जाणारा लोंढा थांबेल़ रोजगारासाठी युवक मोठ्या प्रमाणात परगावी जातात़ याचा फटका त्यांच्या आई-वडिलांना बसतो़ सोलापुरात आयटी पार्कची गरज आहे, शासनाने याची पूर्तता करावी़ स्मार्ट सिटीच्या योजना योग्य पद्धतीने राबवाव्यात. तसेच सोलापूरला शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा़
- डॉ. राधिका कोठे-चिलका, 
संचालिका- संभाजीराव शिंदे विद्यामंदिर, विडी घरकूल

सोलापुरात रोजगार निर्माण व्हावा
महिला सक्षमीकरणासाठी शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे़ मोलकरीण कामगार कल्याण मंडळ गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे़ याचा फटका गरीब महिलांना बसत आहे़ शासनाने असंघटित क्षेत्रातील महिलांकरिता विशेष योजना आणाव्यात़ श्रावणबाळ योजनेचे मानधन वाढवा़ किमान दोन हजार रुपये मानधन झाले पाहिजे़ शहरात शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठ्याची गरज आहे़
- अ‍ॅड. सरोजिनी तमशेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या

बेरोजगारांना नोकरी मिळावी...
सध्या मेगाभरती ज्या महापोर्टलकडे सोपवली आहे, ती रद्द करून सरकारने स्वत: जेवढ्या शासकीय जागा रिक्त आहेत, तेवढ्या भराव्यात. शासकीय योजना तळागाळातील गोरगरिबांपर्यंत पोहोचवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. सरकारने प्रामुख्याने दुष्काळी भागात शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविले पाहिजे. त्याचबरोबर कृषी व्यवस्था निर्माण करून शेतकºयांच्या पिकाला हमीभाव दिला पाहिजे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे. 
- ओंकार नागेश गिराम, विद्यार्थी, सोलापू

शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल हवा
गॅस, पेट्रोलच्या किमतीत किमान पाच वर्षे बदल होणार नाही, देशपातळीवर उद्भवलेल्या परिस्थितीनुसार दरात वाढ होणार असेल तर त्याची झळ नागरिकांना बसली नाही पाहिजे, शिक्षणातील गुणवत्ता वाढली पाहिजे, अशा पद्धतीने बदल होणे गरजेचे आहे. गरिबांना सवलतीच्या दरात औषधे मिळावीत.  
- फय्याज शेख, कर्मचारी, महावितरण, सोलापूर

औद्योगिक क्षेत्राला चालना हवी...
सध्या अनेक तरूण रोजगारांच्या प्रतीक्षेत आहेत़ शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे़ कृषिप्रधान देश असल्याने शेतमालाला योग्य भाव व पाण्याचे नियोजन करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवावा.   शेतीपूरक उद्योगावर भर देण्यात यावा. वाढती बेरोजगारी रोखण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला चालना देणारे उद्योग निर्माण करून युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
- सोमनाथ माने, 
साई हेअर स्टाईल, पार्क चौक, सोलापूर

Web Title: Education, employment and health care needs to be improved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.