‘मातोश्री’वरही महेश कोठे पोहोचण्यापूर्वी दिलीप माने यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 08:22 PM2019-09-28T20:22:44+5:302019-09-28T20:24:51+5:30

रस्सीखेच रंजक वळणावर : ठाकरे म्हणाले, सर्व्हेत नाव येईल त्याला तिकीट

Dilip Mane talks to Uddhav Thackeray before reaching Mahesh on 'Matoshree' | ‘मातोश्री’वरही महेश कोठे पोहोचण्यापूर्वी दिलीप माने यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा

‘मातोश्री’वरही महेश कोठे पोहोचण्यापूर्वी दिलीप माने यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देशहर मध्यच्या जागेवरुन शिवसेनेत आगामी काळात बºयाच उलथापालथी होण्याची चिन्हेफारुक शाब्दी यांच्या उमेदवारीवरुन एमआयएमचे चार नगरसेवक नाराजनाराज नगरसेवकांना आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न कोठे गटाच्या नगरसेवकांनी सुरू केला

सोलापूर : शहर मध्य मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हाप्रमुख महेश कोठे आणि दिलीप माने यांच्यातील रस्सीखेच रंजक वळणावर आहे. महेश कोठे यांनी १८ नगरसेवक, पदाधिकाºयांसोबत गुरुवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तत्पूर्वी कोठे यांची दिलीप माने यांच्यासोबत भेट झाली. मी तीन कंपन्यांकडून सर्व्हे करुन घेतोय. त्याचा अहवाल दोन दिवसांत येईल. त्यात ज्याचे नाव येईल त्याला उमेदवारी मिळेल, असे ठाकरे यांनी दोघांनाही सांगितले. 

कोठे गटाचे नगरसेवक दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला मातोश्रीवर पोहोचले. उद्धव ठाकरे काही नेत्यांसोबत पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा घेत होते. त्यामुळे या नगरसेवकांना वेटींगवर ठेवण्यात आले. स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिथे बसायचे त्या सिंहासनासमोर या सर्वांना बसण्यासाठी सांगण्यात आले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमाराला उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. तुम्ही कशासाठी आलात, असे ठाकरे यांनी विचारले. गेल्या काही दिवसांपासून महेश कोठे यांच्याऐवजी इतरांना उमेदवारी दिली जाईल, अशी सोलापुरात चर्चा आहे. त्यासंदर्भात बोलावे म्हणून आल्याचे नगरसेवकांनी सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, उमेदवारीसाठी मी कुणालाही शब्द दिला नाही. शब्द दिला असता तर तुम्हाला स्पष्ट सांगायला मला काही वाटले नसते. मी दिलेला शब्द पाळतो. मी शब्द न पाळायला शरद पवार नाही. दिलीप माने यांना आपण विनाअट प्रवेश दिला. त्यांच्यामुळे आपल्याला तीन मतदारसंघात मदत होणार असल्याचे मला सांगण्यात आले होते. त्याचा प्रवेश सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघासाठी झालाय ना. उमेदवारीचा विषय दोन दिवसांत क्लिअर होऊन जाईल. मी यादी जाहीर करतोय. बाकी चर्चांना काही अर्थ नाही. तुम्ही पूर्ण दिवस इथे घालवला. एक-एक दिवस महत्त्वाचा आहे. इथे यायची काही गरज नव्हती. पण तुम्ही कामाला लागा.

यावेळी नगरसेवक अमोल शिंदे, गुरुशांत धुत्तरगावकर, राजकुमार हंचाटे, कुमुद अंकाराम, विनायक कोंड्याल, विठ्ठल कोटा, देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, उमेश गायकवाड, शशिकांत केंची, भारतसिंग बडूरवाले, उपजिल्हाप्रमुख सुरेश कोकटनूर, परिवहन सदस्य तुकाराम मस्के, विजय पुकाळे, परशुराम भिसे, विष्णू बरगंडे, रामदास मगर, किरण पवार, नागनाथ सामल, श्रीकांत गुर्रम, बाबुराव जमामदार, सुरेश बिद्री, ब्रह्यदेव गायकवाड, अक्षय वाकसे, ज्ञानेश्वर शिंदे, मोहन सलगर आदी उपस्थित  होते. 

सावंतांनी केवळ पाणी पाजले, मातोश्रीवर मिठाई मिळाली
- शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांची भेट घेण्यासाठी कोठे समर्थक बुधवारी रात्री सावंत यांच्या सोनारी येथील निवासस्थानी गेले होते. सावंत यांनी रात्री १२ वाजता त्यांना भेट दिली. अवघी काही मिनिटे बोलून त्यांना परत पाठविले होते. पक्षाचे काम केले नाही तर आठ तासात त्याचा निर्णय घेईल, असा इशारा सावंतांनी दिला होता. सावंत यांना भेटण्यापूर्वी त्यांच्या शिपायाने नगरसेवकांना पाणी पाजले होते. मात्र  गुरुवारी मातोश्रीवर या नगरसेवक आणि पदाधिकाºयांना नाश्ता, मिठाई देण्यात आली. या गोष्टींची चर्चा नगरसेवकांमध्ये सायंकाळी सुरू होती.

दोघांनाही कामाला लागण्याचे आदेश
- मातोश्रीवर पोहोचल्यानंतर दुपारी तीनच्या सुमाराला दिलीप माने आणि महेश कोठे यांची भेट झाली. पक्षप्रमुखांनी अद्याप कोणालाही शब्द दिलेला नाही. कामाला लागा, असे आदेश दिल्याचे माने यांनी कोठे यांना सांगितले. 

उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस वाट पाहण्यास सांगितले आहे. २८ सप्टेंबरला राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांची रंग शारदेला बैठक होणार आहे. या बैठकीनंतर उमेदवाराचे नाव निश्चित होणार आहेत. 
- महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.  

गुरुवारी दुपारी १ च्या सुमाराला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. आगामी निवडणुकीत सर्वांनी मिळून काम करावे. संघटना वाढविण्यासाठी काम करायला हवे, असे सांगितले. 
- दिलीप माने, माजी आमदार.

एमआयएमच्या संपर्कात सेना
- शहर मध्यच्या जागेवरुन शिवसेनेत आगामी काळात बºयाच उलथापालथी होण्याची चिन्हे आहेत. त्याचा परिणाम महापालिकेच्या राजकारणातही होणार आहे. फारुक शाब्दी यांच्या उमेदवारीवरुन एमआयएमचे चार नगरसेवक नाराज आहेत. या नाराज नगरसेवकांना आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न कोठे गटाच्या नगरसेवकांनी सुरू केला आहे.  महापालिकेत आपण स्वतंत्र गट करु. त्या बदल्यात तुम्ही आमच्या उमेदवाराला मदत करा. महापालिकेत स्वतंत्र गट केल्यास विरोधी पक्षनेतेपद अबाधित ठेवण्यात मदत होईल, असा नगरसेवकांचा कयास आहे.

Web Title: Dilip Mane talks to Uddhav Thackeray before reaching Mahesh on 'Matoshree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.