लिक्विड वायू अन्‌ साहित्याच्या अभावामुळे कारखान्यांच्या ऑक्सिजन प्रकल्पांना अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 01:41 PM2021-04-27T13:41:05+5:302021-04-27T13:41:08+5:30

चार साखर कारखान्यांची तयारी : निर्मिती करण्याची प्रक्रिया वेेळखाऊ

Difficulties in oxygen projects of factories due to lack of liquid gas and materials | लिक्विड वायू अन्‌ साहित्याच्या अभावामुळे कारखान्यांच्या ऑक्सिजन प्रकल्पांना अडचणी

लिक्विड वायू अन्‌ साहित्याच्या अभावामुळे कारखान्यांच्या ऑक्सिजन प्रकल्पांना अडचणी

Next

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांची ऑक्सिजन निर्मितीची तयारी असली तरी प्राणवायूच्या प्रत्यक्ष निर्मितीत यासाठी लागणारे इंपोर्टेड साहित्य अन्‌ लिक्विड स्वरूपातील वायूच्या (ऑक्सिजन) तुटवड्यामुळे प्रकल्पांना अडचणी येत आहेत.

कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. ही स्थिती लक्षात घेऊन वसंतदादा शुगर इन्टिट्युटने इथेनाॅल प्रकल्प असलेल्या साखर कारखान्यांना ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील युटोपियन, जकराया, पांडुरंग व विठ्ठलराव शिंदे या कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यासाठी या क्षेत्रातील जाणकारासोबत चर्चा सुरू केली आहे. मात्र प्रकल्प उभारणीसाठी लागणारा कालावधी, त्यासाठी आवश्यक असलेले इतर देशातून मागवावे लागणारे साहित्य व लिक्विड गॅसचा सध्या जाणवत असलेला तुटवडा, या सर्व बाबींचा विचार केला असता ऑक्सिजन प्रकल्प सुरू करणे कठीण असल्याचे साखर कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

चार प्रकारचे प्रकल्प

एक प्रकल्प म्हणजे हवेतील ऑक्सिजन घेऊन त्यावर प्रक्रिया करून तो सिलिंडरमध्ये भरणे. दुसरा प्रकल्प म्हणजे लिक्विड ऑक्सिजन इतर ठिकाणाहून मागविणे व त्यातून ऑक्सिजन तयार करून सिलिंडर भरणे. इथेनाॅल प्रकल्प बंद करून त्याच प्रकल्पाला ऑक्सिजन बनविण्याची यंत्रणा बसवून ऑक्सिजन तयार केला जातो. याशिवाय हवेतील ऑक्सिजन ओढून घेणारे लहान-लहान युनिट दवाखान्यात बसविणे.

लिक्विड गॅसचा तुटवडा

सध्या सुरू असलेल्या ऑक्सिजन प्रकल्पांना लिक्विड गॅसचा तुटवडा जाणवत आहे. हेच प्रकल्प लिक्विड कमी पडू लागल्याने काही काळ बंद ठेवावे लागत आहेत. अशात नवीन प्रकल्प उभा करून काय करायचे, हा साखर कारखान्यांचा विषय आहे. कोणत्याही प्रकारे ऑक्सिजन तयार करण्यासाठी लिक्विड तयार करावेच लागते, असे टेंभुर्णी येथील ऑक्सिजन प्रकल्प चालक राजाभाऊ शिंदे यांनी सांगितले.

कोणत्याही प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यासाठी अवधी लागणार आहे. कोरोना काळातच ऑक्सिजन देता यावा यासाठी भावनगर (गुजरात) येथील बंद प्रकल्प सुरू करून तेथूनच सिलिंडर भरून आणण्यासाठी चर्चा सुरू आहे.

- उमेश परिचारक, युटोपियन साखर कारखाना

Web Title: Difficulties in oxygen projects of factories due to lack of liquid gas and materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.