घरच्यांचे आशीर्वाद अन् पोलीस खात्यातील वरिष्ठांनी दिलेला धीर यामुळेच मी कोरोनामुक्त

By appasaheb.patil | Published: June 5, 2020 01:04 PM2020-06-05T13:04:55+5:302020-06-05T13:07:52+5:30

पोलीस कर्मचाºयाच्या भावना : दहा दिवसांत जीवघेण्या आजारावर मात

Coronation-free only because of the blessings and support of the family | घरच्यांचे आशीर्वाद अन् पोलीस खात्यातील वरिष्ठांनी दिलेला धीर यामुळेच मी कोरोनामुक्त

घरच्यांचे आशीर्वाद अन् पोलीस खात्यातील वरिष्ठांनी दिलेला धीर यामुळेच मी कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देसोलापूर शहर पोलीस दलातील एमआयडीसी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागणबंदोबस्तावर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस अधिकाºयांच्या संपर्कात आल्यानंतर कोरोनाची  लागणमित्रांनो रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर, नर्स, त्यांचे कर्मचारी २४ तास काम करतात

सुजल पाटील 

सोलापूर : आम्हाला आमची काळजी नाही रे, तू तुझ्या जीवाला सांभाळ... मागील पंधरा दिवसांपासून तू अहोरात्र बंदोबस्तावर आहे, त्यामुळे आमच्यासोबत तुझा संपर्कच आला नाही, त्यामुळे आमचा कोरोना अहवाल निगेटिव्हच येणार आहे... तू पॉझिटिव्ह आहे... तू काळजी घे, असे आई व बहीण सारखं म्हणत होते. शिवाय मुलगाही पप्पा कधी येणार असंही विचारत होता. घरच्यांचे आशीर्वाद अन् पोलीस खात्यातील वरिष्ठांनी दिलेला धीर यामुळेच मी कोरोनामुक्त झालो, अशा भावना कोरोनामुक्त झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलने व्यक्त केल्या.

सोलापूर शहर पोलीस दलातील एमआयडीसी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली होती. लॉकडाऊन काळात सतत बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस अधिकाºयांच्या संपर्कात आल्यानंतर कोरोनाची  लागण झाली. ११ मे रोजी स्वॅब घेण्यात आले, १३ मे रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्या  पोलीस कर्मचाºयावर सिंहगड इन्स्टिट्यूट येथे उपचार करण्यात आले. दहा दिवसांतील उपचाराबाबत सांगताना ते पोलीस कॉन्स्टेबल म्हणाले की, माझा १३ मे रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मला सिंहगड इन्स्टिट्यूट येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सुरुवातीला लोकांप्रमाणे मलाही कोरोनाची भीती वाटली. मात्र माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी पोलीस कर्मचारी व शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाºयांनी सातत्याने फोन करून धीर दिला. डॉक्टरांकडून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीचे देण्यात येणारे औषध, जेवण, योगासन, प्राणायाम असे दहा दिवस नियमित करीत होतो. किती तरी लोक बरे होऊन घरी परतले आहेत, मीही लवकर बरा होऊन घरी परतेन, असे मनात सतत वाटत होते. घरच्यांचे आशीर्वाद अन् वरिष्ठांनी सातत्याने घेतलेली काळजी यामुळेच मी कोरोनाला हरवू शकलो, असे मत त्या कोरोनामुक्त झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलने ‘लोकमत’ला सांगितले.

कोरोना जात-धर्म अन् लहान-मोठा पाहत नाही...
- मला कोणतीही लक्षणे नसताना माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना हा विषाणूजन्य आजार जात-धर्म, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव करीत नाही. कोरोना हा आजार सौम्य आहे, तो लवकर बरा होतो, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, योग्य उपचार घेतल्यास लवकर बरे होता येते, असे मत कोरोनामुक्त झालेल्या पोलिसाने व्यक्त केले.

मी सिंहगडला, तर परिवार आॅर्किडला...
- घरच्यांविषयी बोलताना कोरोनामुक्त पोलीस कॉन्स्टेबलने सांगितले की, मी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने माझ्यावर सोलापूर-पुणे महामार्गावरील सिंहगड कॉलेजच्या आयसोलेशन वॉर्डात उपचार करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून माझी आई, पत्नी व दोन लहान मुलांसह बहीण व भावजींना महापालिकेच्या आरोग्य पथकाने तपासणीसाठी ताब्यात घेतले. त्या सर्वांना क्वारंटाईनसाठी सोलापूर-तुळजापूर रोडवरील आॅर्किड कॉलेजमध्ये ठेवले. घरच्यांचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले. आता सर्व जण सुखरूप बरे, ठणठणीत आहोत, असेही कोरोनामुक्त पोलिसाने सांगितले.

मित्रांनो रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर, नर्स, त्यांचे कर्मचारी २४ तास काम करतात. त्यावेळी रुग्णांना दिलासा देणे, हेही त्या काळात औषधाएवढेच महत्त्वाचे असते. एवढेच नव्हे तर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, या काळजीपोटी आमच्या सोलापूर शहर पोलीस दलातील सर्वच अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांचा सन्मान करा, ते तुमच्या भल्यासाठीच रस्त्यांवर उभे आहेत. पोलीस व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा.
- कोरोनामुक्त पोलीस कॉन्स्टेबल
एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहर 

Web Title: Coronation-free only because of the blessings and support of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.