कोरोनामुळे आठ लाख ग्राहकांनी थकविली साडेपाच हजार कोटींची वीज बिले

By appasaheb.patil | Published: November 12, 2020 01:16 PM2020-11-12T13:16:11+5:302020-11-12T13:16:14+5:30

महावितरण- घरगुती व कृषी ग्राहक सर्वाधिक थकबाकीदार

Corona exhausted eight lakh customers with electricity bills of Rs 5,000 crore | कोरोनामुळे आठ लाख ग्राहकांनी थकविली साडेपाच हजार कोटींची वीज बिले

कोरोनामुळे आठ लाख ग्राहकांनी थकविली साडेपाच हजार कोटींची वीज बिले

Next

सुजल पाटील

सोलापूर : कोरोनामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील ८ लाख ३० हजार ६८६ ग्राहकांनी साडेपाच हजार कोटी रुपयांची वीज बिले थकविल्याची माहिती महावितरणचे सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली. वीज बिलात सवलत मिळणार ही पसरलेली अफवा व चुकीच्या बिलामुळे ग्राहक बिले भरण्यास तयार होत नसल्याचे सांगण्यात आले.

२३ मार्चपासून संपूर्ण देशात कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला हाेता. रोजगार, व्यापार व कामधंदे बंद असल्याने वीजग्राहक असलेले नागरिक आर्थिक संकटात सापडले. यावेळी सरकारनेसुद्धा वीज बिल भरण्यासाठी वीजग्राहकांना सवलत दिली. तसेच सक्तीने वीज बिल वसुली करू नये, असे आदेश दिले. त्यामुळे वीज बिलाची थकबाकी वाढली. कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारल्याने जनजीवन व विविध कंपन्या बंद पडल्या. एवढेच नव्हे तर अनेकांचे पोट भरणेही मुश्कील झाले. त्यामुळे सर्व क्षेत्रांसह सर्वमान्य लोकांचे आर्थिक नियोजन कोलमडले. कोरोनामुळे मीटर रीडिंग घेता आले नाही, चार ते पाच महिन्यांनंतर ग्राहकांना मागील वापराच्या आधारावर सरासरी बिले दिली. मात्र त्यातही चुका असल्याचे दिसल्याने शेकडो ग्राहकांनी वीज बिले भरण्यास नकार दिला. त्यामुळे थकीत बिलांचा आकडा वाढला.

००००००००००

ग्राहक - थकबाकीची रक्कम

  • घरगुती - १५४.७५ कोटी
  • वाणिज्यिक - ३७.५८ कोटी
  • औद्योगिक - २८.१३ कोटी
  • कृषी - ५०२२.२० कोटी
  • पथदिवे - ३८२.४४ कोटी
  • सार्वजनिक पाणीपुरवठा - ६०.४० कोटी
  • सार्वजनिक ग्राहक सेवा - ३.३२ कोटी
  • इतर - १.९७ कोटी

सार्वजनिक सेवा वर्गवारीतील ग्राहकही थकबाकीदार...

सोलापूर जिल्ह्यात अकलूज, बार्शी, पंढरपूर, सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर असे पाच विभाग येतात. यापैकी सर्वाधिक वीज बिलाची थकबाकी ही बार्शी विभागाची आहे. पंढरपूर व सोलापूर ग्रामीण विभागाची थकबाकीही मोठ्या प्रमाणात आहेत. सोलापूर शहरातील काही प्रमाणात ग्राहकांनी वीज बिले भरली आहेत, तरीही थकबाकीचा आकडा ७१२१.३० कोटींवर गेला आहे. घरगुती व कृषी ग्राहकांनी सर्वाधिक बिले थकविल्याचे महावितरणने सांगितले. शेतीची थकबाकी ५०२२.२० कोटींवर तर घरगुती ग्राहकांची थकबाकी १५४.७५ कोटींवर गेली आहे. सार्वजनिक सेवा वर्गवारीतील ग्राहकांनीही वीज बिले थकविली आहेत.

ग्राहक वीज बिल सवलतीच्या प्रतीक्षेत...

लॉकडाऊननंतर हाताला काम नाही त्यामुळे वीज बिले भरणे परवडत नसल्याचे सांगत अनेक राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनी महावितरणच्या विविध कार्यालयांसमोर वीज बिल माफ करावे यासाठी आंदोलने, मोर्चे काढून निवेदनेही दिली. त्यानंतर राज्य सरकारने वीज बिलात सवलत देऊ, असेही सांगितले होते. मात्र कोणतीच घोषणा झाली नाही. त्यामुळे ग्राहक वीज बिलात सवलती मिळेल, यासाठी शासनाच्या घोषणेची वाट पाहत आहेत, असे मत सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

विजेचा वापर हा प्रत्येक वीजग्राहकांचा अधिकार आहे. परंतु, विजेच्या बिलाचा नियमित भरणा करणे, हेसुद्धा त्यांचे कर्तव्य आहे. तथापि, वापराच्या तुलनेत वीज बिलाचा प्रामाणिकपणे भरणा करणाऱ्यांची संख्या कमी आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे.

- ज्ञानदेव पडळकर,

अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल

Web Title: Corona exhausted eight lakh customers with electricity bills of Rs 5,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.