चला, निराशा झटकू यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 04:59 PM2019-10-10T16:59:31+5:302019-10-10T17:00:06+5:30

जागतिक मानसिक आरोग्य दिन...

Come on, let the depression disappear! | चला, निराशा झटकू यात !

चला, निराशा झटकू यात !

Next

आजकाल आजूबाजूला घडणाºया घटना आणि समाज मनामध्ये होत जाणारे बदल, खूप निराश करून टाकतात. म्हणून सगळं संपलं आणि आपण विनाशाकडे जात आहोत असं म्हणून कसं चालेल? जगामध्ये एक टक्का जरी चांगुलपणा शिल्लक असला तरी सकारात्मकता जिवंत ठेवणे आवश्यक आहे. कुठून आणायची ही सकारात्मकता? ती विकत घेता येत नाही की, उसनीही आणता येत नाही. तर सकारात्मकता टिकवण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक काही करावे लागेल. जगात वाईट घडतेय म्हणून सतत वाईट जगासमोर आणतानाच, चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिले पाहिजे. आजकाल ‘माणुसकीच राहिली नाही, कोणावर विश्वास ठेवावा कळत नाही, काय होणार या पिढीचं’, हे आणि असली वाक्ये बोलण्यापेक्षा,आपणं प्रत्येकाने आपल्यापुरते बघूयात का? आला क्षण चांगला आणि सकारात्मक विचाराने घेऊया. खूप काही करण्यापेक्षा, सहज काय काय करता येऊ शकते याचा विचार करूया.

आयुष्यात अनेक भूमिकांमधून आपण जातो या भूमिकेशी प्रामाणिक राहून आपापली जबाबदारी पार पाडायला हवी. जर आपण विद्यार्थी आहोत, तर आपल्या स्वत:च्या आवडीनिवडी शोधताना स्वत:च्या क्षमता ओळखून त्यांना वाढवूया. लग्न केले आहे तर, जबाबदार पालक होऊया. उत्तम नागरिक आहोत तर शेजारपाजारांचे सहकारी होऊ या. व्यापारी आहोत तर उत्तम सेवा कशी देऊ शकेन यांचा विचार करूया. स्वत: जगूया आणि इतरांना जगण्यासाठी उत्साहित करुया. चुकणाºयाला सावध करूया, अडखळणाºयाला आधार देऊ या.
मानसिक, आरोग्य समस्या कमी करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी  या गोष्टी पुरेशा नाहीत काय? मन  करा रे प्रसन्न ,सर्व सिद्धीचे कारण. मन मन म्हणजे तरी नेमकं काय? कुठे असते ते! आणि त्यावर संस्कार करायचे म्हणजे काय करायचे? त्यांचे काही प्रमाण, मोजमाप आहे का?

नाही. संस्कार असे मोजून मापून, ठरवून होत नसतात. व्यक्ती ते ग्रहण करत असतो, स्वत:च्या बुद्धी आणि क्षमतेनुसार! मन कमकुवत आहे म्हणजे काय ? मन कुठे असते ? या प्रश्नापासून सुरुवात केली तर मनाचा हा कमकुवतपणा एका दिवसात तयार झालेला नसतो. लहानपणापासून मुलांमध्ये बिंबवत गेलेल्या मानसिक स्थितीचे ते एक रूपांतर असते. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगातील लोकसंख्येत दरवर्षी आठ लाख लोक आत्महत्या करतात.

अकाली मरण केव्हाही त्रासदायकच. त्यातून आत्महत्येचे अपयशी झालेले प्रयत्न संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर त्रासदायक ठरतात. नको असणारे प्रश्न, पोलीस चौकशा आणि  काय काय!! आत्महत्या ही त्रासदायक गोष्ट आहे. करणाºयाला ही आणि त्याच्या कुटुंबीयांसाठीही!! 

१० आॅक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो आणि या वर्षीची थीम आहे, ‘मानसिक आरोग्याचे जतन व आत्महत्या प्रतिबंध’ आज समाजात टोकाची मानसिक अस्वस्थता दिसून येत आहे. या अस्वस्थतेमधून समस्या उत्पन्न होत आहेत. मानसिक, सामाजिक वर्तनामध्ये सुधारणा घडविण्यासाठी, संवाद आणि मार्गदर्शन गरजेचे आहे. मुलांचे मानसिक आरोग्य सुदृढ व सक्षम राहायला हवे यासाठी समुपदेशक महत्त्वाची भूमिका बजावतात. ‘समुपदेशन म्हणजे समस्येवर साधलेला दोन्ही अंगाने होणारा संवाद!’ बºयाच गोष्टी संवादाने सुटू शकतात. तेव्हा बोलून,मत व्यक्त केले पाहिजे.

मनात येणारे नकारात्मक विचार झटकून ,सकारात्मक विचार केला पाहिजे. आपापसातील गैरसमज काढून टाकले पाहिजेत. बोलले पाहिजे. मत व्यक्त केलं पाहिजे. एवढं प्रत्येकाला करता आले पाहिजे. दहा आॅक्टोबर या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण प्रयत्नपूर्वक एवढे जरी करायला शिकलो तरी मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपण वचनबद्ध झालो आहोत असे म्हणता येईल. ‘मेंटल हेल्थ प्रमोशन अ‍ॅन्ड सुसाइड प्रिव्हेंशन २०१९’ च्या या टॅग लाईनवर काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.
- मृणालिनी मोरे
(लेखिका क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व समुपदेशक आहेत.) 

Web Title: Come on, let the depression disappear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.