जिल्हाधिकारी म्हणाले; शक्तीदेवींच्या मिरवणुकांना बंदी; भक्तांना ऑनलाईन दर्शन घडवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 10:52 AM2021-10-07T10:52:53+5:302021-10-07T10:53:26+5:30

नियमांचे भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा

The Collector said; Ban on Shakti Devi processions; Visit devotees online! | जिल्हाधिकारी म्हणाले; शक्तीदेवींच्या मिरवणुकांना बंदी; भक्तांना ऑनलाईन दर्शन घडवा!

जिल्हाधिकारी म्हणाले; शक्तीदेवींच्या मिरवणुकांना बंदी; भक्तांना ऑनलाईन दर्शन घडवा!

Next

सोलापूर : सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या मंडपात पाचपेक्षा अधिक भक्तांनी गर्दी करू नये. शक्तीदेवीच्या दर्शनाची व्यवस्था ऑनलाइन करा. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला बंदी असून, नियमांचे भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी काढलेल्या आदेशात दिला आहे.

गुरुवार ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने नवरात्रोत्सव साजरा करताना काही प्रतिबंधक नियमावली जाहीर केली आहे. नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका, तसेच स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारा. हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असून त्यापद्धतीने मूर्तीची सजावट करावी. मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट, तर घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फूट असावी. शक्यतो मागील वर्षीप्रमाणे देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर मूर्तीचे पूजन करावे. मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे. घरी शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात. माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेची जनजागृती करावी. गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक शिबिरे, रक्तदान शिबिरे यांना प्राधान्य द्यावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट, फेसबुक आदी माध्यमातून करावी. आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर भारतीय दंड संहितानुसार कारवाई करण्यात येईल, तसेच साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायदे यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.
..................

रावण दहनाच्या कार्यक्रमांना गर्दी कमी करण्याचे आवाहन
आरती, भजन, कीर्तन हे धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक विसर्जनस्थळी जाणे टाळावे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी. रावण दहणाच्या कार्यक्रमासाठी कमीत कमी व्यक्ती उपस्थित राहतील याची व्यवस्था करावी.

 

Web Title: The Collector said; Ban on Shakti Devi processions; Visit devotees online!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.