Brother, don't worry about me! | भाऊ, माझी काळजी करू नको !
भाऊ, माझी काळजी करू नको !

परवा रक्षाबंधनाचा सण प्रत्येकाने यथाशक्ती साजरा केला. भावाबहिणीच्या प्रेमळ नात्याला घट्ट बांधून ठेवणारा धागा नाजूक असला तरी जन्मजन्माचं नातं घट्ट करणारा असतो. बसस्टँडला मी माझ्या ताईला पुणे गाडीत बसवलं, माझ्यासारखे असे अनेक भाऊ होते, बहिणीही होत्या, कानावर शब्द आले.. भाऊ, माझी काही काळजी करू नको. मी बरी हाय, थोडं दिवस गेलं की सारं नीट होईल. बहीण हळुवार शब्दांनी स्वत:ला व काळजीत असणाºया भावाला धीर देत होती. नशिबापुढं कुणाला जाता येतं होय. सारं ऐकताना भावनावश झालो. बहिणीचं खरं प्रेम कोर्टात बापाच्या संपत्तीचा अधिकार सोडतानाच्या सही देताना कळतं, असा संदेश मीडियातून पसरवला जातो. पण हे ऐकल्यानंतर अजून नात्यासाठी काळजातली ओल कायम असलेली दिसली. बरं वाटलं.

निश्चितच अनेक विदारक वास्तव आहे. बहीण-भाऊ सख्ख्या नात्यात बोलत नाहीत. प्रेमळ सुसंवाद नाही. अगदी किरकोळ कारणासाठी समज, गैरसमजुती व संपत्तीसाठीही मनं कटू होताना दिसतात. हे असे सण ते सारं दुरुस्त होण्यासाठी तर असतात. पण दुसºया बाजूला या प्रसंगासारखी जीव लावणारी, नातं जपणारी माणसंही आहेतच की.

आज अनेक भाऊ-बहीण खरंच जगाला हेवा वाटावा असं राहतात, परिस्थिती कशीही असू दे. नाती जपण्याची ताकत मिळवावी लागेल. दिलं घेतलं पुरत नसतं, पण वेळप्रसंगी धावून जाणं अधिक महत्त्वाचं असतं. आपल्या अवतीभोवती असे हजारो बहीण-भाऊ व असे संवाद आपणही पाहिले, ऐकले असतील मग संवेदना शून्यतेचाच अधिक बोलबाला का होताना दिसतो. घराघरांतून यथाशक्ती हा सण साजरा झाला. दिवसभर गाड्यावरून व गाड्यांमधून भावाबहिणींची धावपळ दिसली. राखी खरेदी करताना बहिणीचा अधिक सुंदरतेचा चाललेला अट्टाहास भावाची अधिकाधिक ओवाळणी वा भेटवस्तू देण्यासाठी चाललेला प्रयत्न हे सारं फार प्रेमाने चालू असतं. यात पूर्वीचा भाबडा भाव जरी कमी झाला असला तरी अत्याधुनिक काळातही तो टिकून आहे हे कमी नाही ना? 

ज्या घरात ही नाती परिपूर्ण नाहीत. उपलब्ध नाहीत किंवा आहेत तरीही ते मानसबंधू, वडीलबंधू, ईश्वरबंधू, गुरुबंधू तसेच सीमेवरती अहोरात्र परिश्रम घेणारे जवान, कामावरील पोलीस, अनाथाश्रमात बंधुभावाने हा सण साजरा करताना पाहून मन भरून येते आणि तेव्हाच शाळेतील प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत, या शब्दांचा अर्थ समाजात रुजताना दिसतो. असंच म्हणता येईल नाही का? सर्वच जातीधर्माचे लोक हा सण साजरा करतात. हे पाहताना मन सुखावून जायला हरकत नाही, नक्कीच असते. अनेक ठिकाणी नात्यात वाईट स्थिती, पण आपण चांगल्याच गोष्टींचा विचार करू या ना? 

आज शिक्षण, उद्योग-व्यवसाय, नोकरी यानिमित्ताने अनेक भाऊ-बहीण देश-विदेशात असले तरी आॅनलाईन रक्षाबंधन साजरे करताना दिसतात. प्रेमतर तेच असतं ना? बहीणभावाचं नशीबवान ते जे असा आनंद देण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो. खरंच बहिणींची काळजी करणारा, घेणारा भाऊ व कायम भावाचं योगक्षेम राहण्यासाठी देवाला हात जोडणारी बहीण यांचं नातं अधिक घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण खरंच अत्यंत पवित्र आहे. सर्वच भावा-बहिणींनी ते जपण्यासाठी धडपड करावीच.

सण सरुन गेला, मीही साजरा केला. पण कानात ते बहिणीची पाठवणी करणारा भावा-बहिणीचे शब्द. ‘भाऊ माझी काळजी करू नको..’ हे शब्द खूप वेळ घुमत होते. संवेदनाची सर्वोच्च अवस्था होती ती...
- रवींद्र देशमुख
(लेखक जि. प. शिक्षक आहेत.) 


Web Title: Brother, don't worry about me!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.