Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवरायांच्या अष्टावधानी प्रेरणा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 01:32 PM2021-02-19T13:32:16+5:302021-02-19T13:32:22+5:30

चारित्र्य आणि चरित्र कसं असावं, हे शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांतून अनुभवावं लागेल

Ashtavadhani inspiration of Shivaraya ...! | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवरायांच्या अष्टावधानी प्रेरणा...!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवरायांच्या अष्टावधानी प्रेरणा...!

googlenewsNext

आई जिजांऊच्या आज्ञेवर, वडील शहाजीराजांच्या शौर्य, पराक्रमाच्या बाळकडूवर, रयतेच्या मनावर आणि तलवारीच्या पात्यावर, अष्टौप्रहर रणांगण गाजवणाऱ्या, अष्टावधानी प्रेरणादायी असणाऱ्या, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या, अष्टप्रधान मंडळाकडून रयतेचा कारभार करणाऱ्या बलवंत, यशवंत, नीतिवंत, कीर्तिवंत, प्रजाहितदक्ष, जाणता राजा शिवाजी महाराजांची जयंती आपण उत्साहाने साजरी करत आहोत...

बालशिवबांनी लहानपणीच माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारातून स्वतःला जाणून घेऊन, सोबतीला जिवाभावाचे मावळे घेऊन, रयतेचा खरा अर्थ जाणून घेतला व पुढे आयुष्यभर रयतेसाठी जिवाशी खेळत राहिले. इंग्रज, पोर्तुगीज, आदिलशहा औरंगजेब, डच, सिद्दी यांची सत्ता महाराजांपेक्षा कितीतरी पटीने प्रबळ होती. शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक लढत ही लक्षवेधी होती. मनुष्य जीवनात एखाद्या क्षेत्रात माणसाचं अवधान यशस्वी होऊ शकतं; परंतु शिवराय यासाठी अपवाद ठरले. जीवनातील सर्वच आघाड्यांवर यशस्वीपणे मात करत शून्यातून स्वराज्याचे विश्व निर्माण करणारा राजा म्हणून छत्रपती शिवरायांचा आदर्श जगापुढे आहे.

रयतेचा स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य, स्वातंत्र्य जिवंत राहण्यासाठी जिवाचं रान केलं. वतनदारी बंद करून वेतनदारी सुरू केली. पगाराची पहिली सुरुवात छत्रपतींनी केली. सर्व जातीधर्मांच्या जिवलग मावळ्यांना अष्टप्रधान मंडळात स्थान देऊन जनतेचा कारभार लोकप्रिय आणि न्यायप्रिय केला. जमीनमोजणी, सातबाराची पद्धत शिवरायांनी केली. पाणी आडवा, पाणी जिरवा... जलसंधारणाला उत्कृष्ट पायवाट घालून दिली. बत्तीस धरणे महाराजांनी बांधली. रायगडावर बंद गटार योजना, शौचालये बांधली. वनराईचे संवर्धन केले. अनेक किल्ले बांधले, अभेद्य असे जलदुर्ग बांधले. भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवरायांच्या दिशादर्शी कार्याचा सर्वांना सदैव पिढ्यानपिढ्या अभिमान वाटत राहील.

चारित्र्य आणि चरित्र कसं असावं, हे शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांतून अनुभवावं लागेल. परस्त्रीला माता म्हणणे ही सामान्य चित्ताची गोष्ट नाही तर हा शिवबांचा संस्कार आहे. भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी तेजोमय मार्गदर्शन आहे. शासन, प्रशासन, रयत अधिकाऱ्यांसाठी नसते तर सर्व काही रयतेसाठीच असते. अंतिमतः रयत हीच मालक आहे. बाकी सर्व विश्वस्त आहेत. त्यांनी रयतेशी प्रामाणिकच असलं पाहिजे, तरच त्यांना राज्यकारभार करण्याचा नैतिक अधिकार आहे. महाराजांची ही शिकवण म्हणजेच शिवनीती, शिवसूत्र होते. जे आजही सर्व व्यवस्थेला नितांत मार्गदर्शक व गरजेचे आहे.

छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्त्व सामान्यांना अनाकलनीय होते. अफजलखानालाही प्रश्न पडला होता... शिवरायांचा जीव कशात आहे? मंदिरे, गडकिल्ले, शेतकऱ्यांच्या धान्याचं नुकसान केलं तरी राजे निश्चल होते, खानाने माणसं कापावयास सुरुवात केली. शिवराय गहिवरले, द्रवले, बैचेन झाले. खानाने ओळखले... शिवरायांचा जीव माणसांत आहे, रयतेत आहे. राजे चतुर. समयसूचकतेने परिपूर्ण. अचूक नियोजनात हातखंडा. भाषा रसाळ व मधाळ. त्यांनी खानाला भेटीची विनंती केली. प्रतापगडावरील भेट ठरली. या भेटीतही शिवरायांनी खानाच्या शक्तीचा युक्तीने पराभव केला. शामियाना आकर्षक, रत्नजडित हिऱ्यामोत्यांचा केला. भव्यदिव्य स्वागत करून शिवरायांनी खानाला अगोदर मनात जिंकले, नतंर रणात जिंकले. हे शिवमानसशास्त्र पुढील पिढीसाठी अनंतकाळ मार्गदर्शक आहे. शिवरायांनी निर्माण केलेल्या राज्याचं नाव स्वराज्य ठेवलं, शिवराज्य नाही. स्वराज्य स्थापनेच्या या स्वधर्म यज्ञामध्ये शिवरायांना या मातीतील, मातीसाठी जागणारी, जगणारी आणि मातीसाठीच बलिदान देणारे मावळे, माणसं भेटली. माणसं, मित्र जोडताना जिजाऊंनीही शिवरायांना कधी विचारलं नाही की, यांच स्टेट्स काय? आपल्या राजावरील निष्ठा हीच शिवरायांच्या संवंगड्यांची प्राणप्रतिष्ठा होती. भगवा हाच मावळ्यांचा वाण आणि प्राण होता. सर्वांनीच तो हयातभर जपला, म्हणूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. ध्येयवादी मावळ्यांत त्याकाळात बंडखोरी, पाठिंबा मागे घेणे, वाटाघाटी, अपेक्षा, तडजोड, ही भावनाच नव्हती. राजांची प्रचार, प्रसारण यंत्रणा आजच्या मोबाइलपेक्षाही जलद होती. धूर काळा की पांढरा यावरून सांकेतिक खुणा तीनशे साठ किल्ल्यांवर एका तासात संदेश पोहोचत असे. रात्री प्रकाशाचा वापर तर दिवसा ध्वनीच्या साह्याने आपला मनोदय, सर्व सहकारी मावळे दऱ्याखोऱ्यातून बिनचूक पोहोचवत असत.

आजच्या धकाधकीच्या, अनिश्चित, ताणतणावाच्या काळातही, आनंदात राहण्यासाठी सकारात्मक जीवनाचा आदर्श म्हणून शिवचरित्राचा अभ्यास व अनुकरण अत्यंत गरजेचे आहे.

- ह.भ.प. रंगनाथ काकडे गुरुजी

Web Title: Ashtavadhani inspiration of Shivaraya ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.