लेडी ‘सिंघम’चा अजून एक दे धक्का; नवे ४३ पोलीस ट्रेनिंगच्या पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:53 PM2021-02-12T12:53:43+5:302021-02-12T12:53:49+5:30

२५ कर्मचाऱ्यांची आठवण ताजी : मुख्यालयाच्या प्रशिक्षणामध्ये देणार कर्तव्याचे धडे

Another push of Lady ‘Singham’; 43 new police training cages | लेडी ‘सिंघम’चा अजून एक दे धक्का; नवे ४३ पोलीस ट्रेनिंगच्या पिंजऱ्यात

लेडी ‘सिंघम’चा अजून एक दे धक्का; नवे ४३ पोलीस ट्रेनिंगच्या पिंजऱ्यात

Next

संताजी शिंदे

सोलापूर : जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ४३ पोलीस कर्मचाऱ्यांची पुन्हा सोलापुरातील ग्रामीण पोलीस मुख्यालयात रवानगी करण्यात आली आहे. लेडी सिंघम पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हा दुसरा धक्का दिला असून, त्यांना उजळणी पाठ्यक्रम प्रशिक्षणामध्ये कर्तव्याचे धडे देण्यात येणार आहेत. 

डिसेंबर २०२० च्या पहिल्या आठवड्यातच पोलीस अधीक्षकांनी ३० कर्मचाऱ्यांना मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. आदेश प्राप्त होताच संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ ३१ जणांना कार्यमुक्त केले होते. दोन महिन्यांनंतर त्यातील २२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या केल्या. आणखी ७ ते ८ कर्मचारी अद्याप मुख्यालयामध्येच आहेत. २२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात न होतात तोच दुसऱ्या टप्प्यात आणखी ४३ जणांना मुख्यालयात हलविण्यात आले आहे. पहिल्या धक्क्यातून बाहेर पडत असताना अचानक दुसरा धक्का दिल्याने जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. 

दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील माळशिरस, नातेपुते, बार्शी तालुका, माढा, वैराग, पांगरी, वेळापूर, पंढरपूर तालुका, पंढरपूर शहर, करकंब, करमाळा, टेंभुर्णी, कुर्डूवाडी, मंगळवेढा, अक्कलकोट दक्षिण, सोलापूर तालुका पोलीस स्टेशन, करमाळा, अकलूज, सांगोला, बार्शी शहर या पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना पोलीस मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. आदेश प्राप्त होताच संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्या कर्मचार्‍यांना तत्काळ कार्यमुक्त केले आहे. 

मुख्यालयातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे 
बदली झालेल्याची नावे व कंसात पोलीस स्टेशन बी. के. मोरे (करकंब), सी. व्ही. झाडे (पांगरी), एस. ए. हिंगमिरे (टेंभुर्णी), वाय. आर. चितळे (टेंभुर्णी), आर. एन. बाबर (मोहोळ), व्ही. एम. रणदिवे ( पंढरपूर तालुका), एस. एस. शेंडगे (पंढरपूर ग्रामीण), संजय राऊत (सांगोला), एस. के. धायगुडे, डी. बी. राठोड (अक्कलकोट दक्षिण), व्ही. टी. विभुते ( पंढरपूर ग्रामीण), ए. ए. मियावाले (सोलापूर तालुका पोलीस ठाणे), डी. एम. पवार, एस. एस. काळे ( मंद्रूप), ए. एल. मुंढे (कामती), ए. एस. राठोड (सोलापूर तालुका पोलीस स्टेशन), एस. के. पवार (बार्शी तालुका), बी. एच. घोळवे, एस. पी. गर्जे (करकंब), ए. ए. नलवडे (मंगळवेढा), एस. डी. हेंबाडे (पंढरपूर शहर), एस. जी. पंढेकर ( टेंभुर्णी) असे बदली झालेल्यांची नावे आहेत.

भानगडी करणारे पोलीस नको
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनवर बारीक नजर ठेवली आहे. काही कर्मचाऱ्यांना बाबत तक्रारी आल्या आहेत. गाव पातळीवरील लोकांकडून ही तक्रारी केल्याचे समजते. तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करून कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. भानगडी करणारे पोलीस पोलीस ठाण्यांमध्ये नको, असा पवित्रा पोलीस अधीक्षकांनी घेतला आहे. 

लेक्चर देण्यात येणार 
मुख्यालयात. ८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान उजळणी पाठ्यक्रम प्रशिक्षण होणार आहे. या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना कायद्याचे ज्ञान करून देणे, कर्तव्याची जाणीव करून देण्यात येणार आहे. यासाठी दररोज पोलीस निरीक्षक, पोलीस उपाधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक लेव्हलचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

अन्यथा अधिकाऱ्यांवरच कारवाई
पोलीस अधीक्षकांनी दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता तत्काळ ४३ कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. आदेशाचे पालन न झाल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा आदेशामध्ये देण्यात आला होता. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

Web Title: Another push of Lady ‘Singham’; 43 new police training cages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.