Alcohol produced at Rs.500 for two hundred rupees | पस्तीस रुपयांत तयार होणारी दारू चक्क दोनशे रूपयाला
पस्तीस रुपयांत तयार होणारी दारू चक्क दोनशे रूपयाला

ठळक मुद्देशिंदेवाडीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये एक व्यक्ती विदेशी दारूचे बॉक्स विक्री करताना आढळून आलीउत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलेमहामार्गावरील ढाबे, हॉटेल्समध्ये केली जाते विक्री

सोलापूर : जुन्या बाटलीत स्पिरीट, फ्लेवर अन् रंगांचा वापर करून साधारणत: ३४ ते ३५ रूपयांना तयारी होणारी दारू विदेशी व देशी ब्रँडमध्ये २०० रूपयांपर्यंत विक्री करणाºया टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. शिंदेवाडीत टाकलेल्या धाडीत तिघांना अटक करण्यात आली आहे. 

अरूण लक्ष्मण मसगुडे (वय ३८), सतीश बबन कदम (वय ३९, दोघे रा. शिंदेवाडी, माळशिरस), बिपीन मधुकर सातपुते (वय ३२, रा.गोखले हॉस्पिटल मागे, भीमनगर,नातेपुते, माळशिरस) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. माळशिरस येथे बनावट देशी व विदेशी दारू तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शोध घेत १४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजता शिंदेवाडी येथील हनुमान विद्यालयाच्या पाठीमागे धाड टाकली. 

शिंदेवाडीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये एक व्यक्ती विदेशी दारूचे बॉक्स विक्री करताना आढळून आली.  उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने हा माल सतीश कदम याच्याकडून घेतल्याचे सांगितले. सतीश कदम याच्या घरी गेले असता तो पळून गेला. त्याच्याकडून काही माल जप्त करण्यात आला. सतीश कदम हा एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे जाऊन सतीश कदम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा माल बिपीन मधुकर सातपुते (वय ३२) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. 

बिपीन सातपुते याच्या घरी जाऊन चौकशी केली असता तेथे मद्य तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट, विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या, त्यावर लावण्यात येणारे टोपण, बीअरच्या रिकाम्या बाटल्या आणि तयार केलेला माल आढळून आला. तिघांकडून १ लाख २८ हजार ९९३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांना न्यायाधीशांनी १७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्कचे क्षेत्रीय दुय्यम निरीक्षक एम.एम. मस्करे, जवान एम.एम. शेख, ए़ एम़ पांढरे, महिला जवान पी.बी.कुटे, दादा शिंदे, योगेश पाटील यांनी पार पाडली. 

महामार्गावरील ढाबे, हॉटेल्समध्ये केली जाते विक्री
- बनावट देशी-विदेशी दारू तयार करण्यासाठी स्पिरीटचा वापर केला जातो. स्पिरीटमध्ये बनावट फ्लेवर, रंग यांचा वापर करून कंपनीसारखी हुबेहूब दारू तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. विस्की, स्कॉचसारखी नियमित चालणारी विविध कंपन्यांसारखी बनावट दारू तयार केली जाते. जुन्या बाटल्यांवर नवीन लेबल व टोपण लावून पॅकिंग होते. कंपनीच्या मालासारखे बॉक्स तयार करून ते इंदापूर व अन्य ठिकाणी विक्रीसाठी नेतात. ही दारू राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे, हॉटेल्समध्ये कंपनीच्या किमतीपेक्षा कमी किंमतीत विकली जाते. १८0 एम.एल. बाटलीच्या विदेशी दारूसाठी ३४ ते ३५ रूपयांचा खर्च येतो. ती ग्राहकांना प्रत्यक्षात कंपनीच्या दरामध्ये विकली जाते. 


Web Title: Alcohol produced at Rs.500 for two hundred rupees
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.